सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
१९८७ साल असेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करून ३-४ वर्षं झाली होती. आम्हा तीन पार्टनरपैकी एक पार्टनर विलास भावे छोट्याश्या ऑपरेशनचे निमित्त होऊन गेला. मोठा धक्का होता. पण शो मस्ट गो ऑन. मी आणि माझा पार्टनर श्रीहरी ह्या धक्क्यातून सावरलो. एक वर्षात नवीन जागा घेतली आणि तिथे स्थलांतर करून व्यवसाय वाढवायला सुरवात केली. नव्या जागेत जाताना, आज विलास हवा होता ही खंत होतीच. पण परमेश्वरी इच्छा वेगळीच होती. व्यवसाय वाढत होता. कामगार आणि स्टाफ वाढला, १८-२० पर्यत गेला. संख्या वाढली तशी दर महिन्याच्या ओव्हरहेडचे गणित आणि बँकेचे हप्ते जुळवणे सुरु झाले. ऑर्डर होत्या, पण त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात म्हणून व्यवसायाला शिस्त आणि सिस्टीम लावणे सुरु होते. आम्हा दोघांचे वय तिशीचे आणि बहुतांश नोकर आमच्यापेक्षा २-३ वर्षेच लहान. दोघे-तिघे तर वयाने मोठेच होते. कधी कधी ताण येत असे. त्या काळात फोनचा नंबर लागायला १०-१० वर्षे लागत. नव्या जागेत OYT special कॅटेगोरीत तब्बल १०हजार रुपये भरून फोन कनेक्शन घेतले. या दहा हजाराची जुळवाजुळव अनेक महिने चालू होती. एकंदर घडी बसत होती. कॉम्प्यूटर नव्याने येऊ लागले होते. त्यासाठी लागणारे UPS आम्ही बनवत होतो. डिमांड होती. डीलर नेटवर्क होते. महिना सधारण ४०-५० UPS विकले जात. इतरही काही प्रॉडक्ट होती. electronic product असल्याने आवश्यक components सहज मिळत नसत. इम्पोर्ट करण्यास बंदी असल्याने अनेक गोष्टी राजरोसपणे स्मगल करून येत. कोणास ठाऊक कसे? पण
लघुउद्योगांना त्या मिळत. अर्थात विक्रेते सांगतील त्या किमतीत. सभोवताली उद्योगास अनुकूल असे कोणतेच वातावरण नव्हते. पण तरुण वय, काहीतरी करायची जिद्द त्यामुळे जाणवायचं नाही. उद्योग हा अशाच प्रतिकूलतेत करायचा असतो, अशीच ठाम धारणा. त्यामुळे ठीक चालले होते. कधी कधी ताण यायचा पण पुन्हा सर्व विसरून काम सुरू व्हायचे.
नव्या ऑफिसच्या केबिनमध्ये आम्हा दोघा पार्टनरांची टेबले शेजारी होती. दोन खुर्च्यांमध्ये एका स्टुलावर फोन असे. फोनचे मध्ये असणे ही दोघांची सोय होती. एक दिवस सकाळी १०चा सुमार असेल, मी फोनवर कोणाशी तरी बोलत होतो. माझे बोलणे काहीसे लांबत चालले होते. श्रीहरीला देखील कोणाशी तरी बोलायचे असल्याने माझे संपण्याची वाट बघत होता. तेवढ्यात समोर एक भगवी कफनी घातलेले साधारण पन्नाशीचे गृहस्थ येऊन उभे राहिले. ‘कुलकर्णी आहेत का?’ असे विचारते झाले. त्यांना मी हाताने खूण करून थोडे थांबण्यास सांगितले व फोनवरचे बोलणे सुरूच ठेवले. त्यांनी मला उलटी खूण केली- ‘तुमचे चालू द्यात, मी थांबतो. काही घाई नाही.’ कदाचित मी कुणावर तरी रागावलो होतो, आवाज जास्तच चढत होता. फोनवर एका सप्लायरवर उशिरा मटेरियल देण्याबद्दल बहुदा रेशन घेत होतो. बोलता बोलता ५ मिनिटे झाली, १० झाली, १५ मिनिटे झाली. आमची नजरानजर झाल्यावर गृहस्थ शांतपणे ‘असूद्या असूद्या तुमचं चालू द्यात’ अशी खूण करत. मी बोलता बोलता मनात विचार करत होतो- ‘भगवे कपडे घातलेले माझ्याकडे कशाला आले असतील? काही देणगी वगैरे मागायला असतील बहुदा. देणगी मागितली तर यांना कसे कटवता येईल?’ आत येताना त्यांनी माझे नाव घेतल्याने श्रीहरीनेदेखील त्यांना कशासाठी आलात? काही मदत करू का? असे विचारले नाही. त्याच्या डोक्यातही भगव्या कफनीमुळे असाच काहीसा संभ्रम झाला असावा. माझे बोलणे संपले. मी फोन ठेवला, तर श्रीहरीने झडप घालूनच उचलला कारण तो फोनसाठी फार काळ ताटकळला होता. फोनवर मी तावातावाने बोलताना का कुणास ठाऊक उगाचच उभा राहून बोलत होतो. माझा बोलणे झाले, तोच त्या गृहस्थांनी मलाच बसायला सुचवले. ‘माझ्याच केबिनमध्ये मला बसायला सांगणारे हे कोण?’ असा मनात मी विचार करत होतो. तोच ते म्हणाले “नमस्कार कुलकर्णी, शांत झालात का?” मी थोड्या गुर्मीतच “होय” असे म्हटले. त्यानंतर ते गृहस्थ म्हणाले. “कुलकर्णी आपण व्यवसायाचं नंतर बोलूयात का? मी बराच वेळ तुम्हाला फोनवर कोणाशीतरी बोलताना ऐकतोय. तुम्हाला एक सांगू का? अहो गरज नाहीये एवढे रागावण्याची. तुम्ही कोणाशी बोलत होतात हे तुम्ही मला सांगू नका. त्याची गरजही नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असा विचार करा की तुमच्या सभोवतालची सर्व माणसे तुम्हाला परमेश्वराने खेळायला दिली आहेत. खेळताना आपण रागावतो का? खेळताना आपण खिलाडूवृत्तीने खेळायचं. इतकं रागवायची गरज नसते.” मी एका सप्लायरबरोबर बोलत होतो, त्याने माल वेळेत न दिल्याने आमची डिलिव्हरी वेळेत होणार नव्हती. मी त्यांना म्हणालो “ अहो यांना Advance देऊनही वेळेत माल देत नाहीत. मी कस्टमरला काय सांगू. तुम्ही माझ्या जागी असाल तर काय कराल.”
बाबा शांतपणे म्हणाले “ तुम्ही रागावलात. आता ते वेळेत माल देणार का?”
“अहो नाही ना. वेळेविषयी बोलतच नाहीत”…मी
“ हे बघा तुमच्या रागाने ते डिस्टर्ब झाले. त्याचीही काही मजबुरी असेल. तुमचा राग ते दुसऱ्यावर काढतील. बाकी वेगळे काय घडेल? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खिलाडूवृत्तीने बघा. अहो हे तुमचे शेजारी बसलेले पार्टनर, बाहेर काम करत असलेला तुमचा स्टाफ, तुमची बायको, मुलं, आई-वडील, सप्लायर, कस्टमर, सरकारी अधिकारी, आता तुमच्याशी बोलत असलेला मी– हे सगळंसगळं खेळायला दिलंय अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे बघा. बघा कशी मजा येते ते. या खेळात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे भिडू मिळतील. गीता हेच सांगते. ”
महाराज बोलत होते त्यात तथ्य वाटत होते. कुठेतरी मी आतून हललो होतो. कुठेतरी प्रकाश पडत होता.
“बरं आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन सांगू का? मला माझ्या मुलासाठी एक UPS घ्यायचाय. मला तुमचे नाव श्री. अमुक यांनी सांगितले. ते म्हणाले कुलकर्णीचा UPS घ्या. मी २ वर्षे वापरतोय उत्तम आहे.”
“ बापरे, बसा ना. सर सॉरी मी तुम्हाला बसा देखील म्हटले नाही.” …मी. समोर उभे असलेले गृहस्थ देणगी मागायला आलेले साधू नसून माझे कस्टमर आहेत हे कळल्यावर माझी होणारी सहाजिक प्रतिक्रिया.
“ असू देत. मी माझी ओळख करून देतो. मी शितोळे. पुण्यातले प्रसिद्ध सरदार शितोळे तुम्हाला माहित असतील तर त्यांच्यापैकी. कसब्यात एकमेव उत्तम स्थितीत असलेला दगडी वाडा आमचाच. मोठे ऐतिहासिक घराणे आहे आमचे. पेशव्याचे सरदार होतो आम्ही. अर्थात आजची ती ओळख नाही. मी अमेरिकेत योग शिकवतो. गेली अनेक वर्षे देशात परदेशात योगाचा प्रसार करतो. माझे बहुतांशी वास्तव्य अमेरिकेत असते. या भगव्या कपड्यांवर जाऊ नका. तो माझा व्यावसायिक युनिफार्म आहे. तसा मी सांसारिक आहे. मुलाला कॉम्पुटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, त्याच्या कॉम्पुटरसाठी UPS हवा, हे आपल्या भेटीचे प्रयोजन. मला घाई नाही. UPSची किंमत सांगा. तुमचे सर्व पैसे आत्ताच देऊन टाकतो. तुम्ही म्हणाल तेव्हा मुलगा येऊन UPS घेऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून थोडा उशीर होणार असे दिसतेच आहे. हरकत नाही. पण उत्तम वस्तू द्या.”
मी अवाक होऊन बघत होतो. माझ्यासमोर एक योगी गुरुस्वरूप होऊन उभा होता. माझ्या करंटेपणामुळे त्यांना ओळखले नाही. माझे हे गुरु जाताजाता मला मंत्र देऊन गेले “ कुलकर्णी भगवंताने हे सर्व जग तुम्हाला खेळायला दिलं आहे. अनेक भिडू तुम्हाला मिळतील, येतील आणि जातील सुद्धा. तुमचा डाव आहे तोपर्यंत खेळायचं. आणि आनंदी राहायचं, आनंद द्यायचा आणि घ्यायचा देखील. बघा जमतंय का? जमलं तर मिळणारा आनंद तुमचाच. कोणी हिरावून घेणार नाही.”
शितोळेगुरूंना मी नंतर आजतागायत भेटलो नाही. पण “ कुलकर्णी, भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय ”
हे शब्द मात्र कायम कानात घुमतात. आयुष्यातले अनेक प्रसंग मी ह्या मंत्राने निभावून नेले आहेत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सहज या गुरूंची आठवण झाली म्हटलं लिहून काढावं. जगण्याचा साधा मंत्र आहे- सर्वाना सांगावा.
लेखक : श्री श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈