? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 2 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते. इथून पुढे —

ते म्‍हणाले, ” सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो , परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे.” 

मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार. म्‍हणून मी एक युक्ती केली. जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती. आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, ” सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या.”  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो. 

आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची ! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो.  या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता ! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले, ” सर, लवकर चला. पेशंटला बघा चला.” मी लगेचच जाऊन पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती. 

माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.

त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. “मी प्रयत्न करतो!” या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे “ डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली?” मग मी त्‍यांना सांगितले की, “ पेशंट ज्‍यावेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा. त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला, पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहिनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढून घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. “  अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते. 

पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो. माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनीही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वरचरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला. पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.

आता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलावून घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य ! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरंच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले “ हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना?” तर तो म्हणाला, ” यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड.” आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यातील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून  ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. ” ही इज अ बॉर्न फायटर ! तुमचा मुलगा सुखरूप परत आला !” आणि आम्‍ही लढाई जिंकली होती ! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती

हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिस्चार्ज र्होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की, इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.

खरंच ! आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !

हीच खरी दिवाळी  

— समाप्त —  

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments