? मनमंजुषेतून ?

☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

वडिलांबरोबर पहिल्यांदा मी या महोत्सवाचा आनंद लुटला. त्यातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही.दोन्ही हातात दोन व्यक्तींचा हात धरुन पंडित भीमसेन जोशी रंगमंचावर अवतरले. मला गद्यात बोलता येत नाही मी गाण्यात बोलतो त्यामुळे आता काही बोलत नाही असं काहीतरी म्हणून ते आत गेले.आणि मग वसंतराव आणि पु. ल.या दोन देशपांडे कलावंतानी मैफिल ताब्यात घेतली. पेटीवर पु. ल. यांचा सफाईदार हात फिरत होता.तबल्याचा ‘ठेका नाना मुळे यांच्याकडे होता. स्वरांची आरास बांधत हजारो रसिकांना त्या हिंदोळ्यावर झुलवत वसंतराव आनंदाच्या क्षणाचे मुक्त हस्ते वाटप करत होते. कसे विसरु हे ? 

शास्त्रीय संगीत आणि पुणे यांचे नाते तसे खूप जुने.सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्या कसब्यातल्या वाड्यात गणपतीत देशभरातील मोठे कलावंत येवून आपली कला पेश करत.केसरी वाड्याच्या गणपती उत्सवातही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली,अजूनही लावतात.लक्ष्मी क्रिडा मंदिर या छोटेखानी व्यासपीठावर. नुमवि शाळेच्या पटांगणावर अनेक स्वर्गीय मैफिली रंगल्या. बी जे मेडिकल आर्ट सर्कलने ही अनेकवेळा कानसेनांना तृप्त केले.

पण या सर्वांमध्ये सवाई गंधर्व महोत्सव वेगळा ठरतो.याचे मुख्य कारण म्हणजे इथे उल्लेख केलेले संगीत महोत्सव;काही खासगी,काही सार्वजनिक, पण फार मोठ्या संख्येने रसिकांना सामावून घेणारे नव्हते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही मोजक्याच रसिकांची, अभिजनांचीच मिरासदारी राहिली. दिवाणखान्यात,खाजगी मैफिलीत  रमलेल्या शास्त्रीय संगीताला पंडित भीमसेनजीनी भल्या मोठ्या  मोकळ्या मैदानात आणलं.अभिजानांएवढेच सर्वसामान्य श्रोतेही रसिक आहेत,किंवा काकणभर जास्तच रसिक आहेत हे गुपित सवाईने उघड केले .शास्त्रीय संगीताचे केलेले हे लोकशाहीकरण  हे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. 

वर्षातून किमान तीन वेळातरी महाराष्ट्रातून ,देशातून आणि परदेशातूनसुद्धा अनेक भाविकांचे पाय पुण्याकडे वळतात.जून महिन्यात आळंदी आणि देहूहून सुरु होणाऱ्या पंढरीच्या वारीसाठी,दुसऱ्यांदा आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी गणपती उत्सवात.आणि तिसऱ्यांदा  ’सवाई गंधर्व महोत्सवात स्वराभिषेकात न्हाऊन  निघण्यासाठी. मिळेल ती एसटी ,रेल्वे पकडून या  गान पंढरीचा वारकरी आपल्या आयुष्यातल्या काही i रात्री स्वरांच्या संगतीत व्यतीत करतो. 

कॉलेज जीवनात; पुण्यात माझी राहण्याची दोन ठिकाणे झाली. एक ५७१ ,शनिवार पेठ ,होय प्रभा विश्रांती गृह ज्या जागेत आहे आणि जिथे सई परांजपे यांनी आपल्या ‘कथा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले तो साळुंखे यांचा वाडा.दुसरी जागा ३५८ ,शनिवार पेठ. वीराची तालीम चौकात . दोन्ही जागा रमणबाग शाळेच्या परिघात .सवाई मधली ओळ न ओळ ,प्रत्येक तान,वाद्यांचा झंकार, पदन्यासाची    छमछम आपसुक  कानावर पडायची त्या दोन्ही जागेत.  

१९५२ साली पंडित भीमसेन जोशी यांनी आपली गुरुभगिनी गंगुबाई हनगळ,पंडित फिरोझ दस्तूर यांच्या सहकार्याने सुरु केलेली ही गानयात्रा,आपले गुरु सवाई गंधर्व यांना दिलेली एक अक्षय्य अशी गुरुदक्षिणाच आहे. इथे किती दिग्गज ऐकायला मिळाले, किती वादकांनी हृदयाच्या तारा छेडल्या,आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.  मुंबई दूरदर्शनच्या माझ्या ५ वर्षांच्या काळात अनेक नावाजलेले, बुजुर्ग कलावंत जवळून ऐकले.त्यांच्या ध्वनीचित्रमुद्रणाचाही अनुभव घेतला. पण सवाईची  मजा औरच.   

गुलाबी थंडीला अधिक देखणे करणाऱ्या शाली पांघरुन  हजारो प्रेक्षक तल्लीनतेने श्रवणानंद लुटताना पाहणे हाच मुळात एक सुंदर दृश्यानुभव ठरतो.या महोत्सवाने आणखी एक गोष्ट दिली ती म्हणजे युवा कलाकारांना व्यासपीठ .या महोत्सवात   सामील करून त्यांना कला प्रवासाच्या हमरस्त्यावर आणून सोडले. हवसे ,नवसे ,गवसे साऱ्याच उत्सवात असतात.याला सवाई सुद्धा अपवाद नाही . सवाई ला चाललो आहे असे म्हणून अनेक तरुण तरुणींनी या उत्सवाच्या पेंडॉलला आपले संकेतस्थळही केले. पण हे गोड अपवाद सोडले तर या मंतरलेल्या रात्री म्हणजे गायन ,वादन ,नृत्य यांची लयलूटच असते.

मल्लिकार्जून मन्सूर, गिरिजादेवी ,माणिक वर्मा, हरिप्रसाद चौरासिया ,किशोरी आमोणकर,जितेंद्र अभिषेकी, राजन साजन मिश्र,वीणा सहस्रबुद्धे ,उल्हास कशाळकर ,राशीद खान  या श्रेष्ठ कलावंतानी  सवाईचा मंडप आपल्या स्वराविष्कारानी अनेकवेळा उजळून टाकला  आहे.  आप्पासाहेब जळगावकर या ज्येष्ठ संवादिनी वादकांनी तर ५७ वर्षे या उत्सवात आपल्या बोटांची जादू पेश केली आहे . 

कुमार गंधर्व यांनी सादर केलेला राग भटियार,पंडित रवी शंकर यांनी झंकारलेला  ललत, प्रभाताई अत्रे यांची  ‘तन मन धन तोपे वारू’ ही कलावती रागातील बंदिश , जसराज जी यांचा दरबारी , आलापी आणि तानांनी नटलेली;अनेक नयनरम्य वळणे घेत परवीन सुलतानानी सादर केलेली  ‘गुजरी तोडी या रमलखुणा मनावर गोंदल्या गेल्या आहेत.

मालिनी राजूरकर यांचा बहारदार टप्पा,आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी अभिसारिका साकार करणारा अश्विनी भिडे यांचा बागेश्री,कौशिकी चक्रवर्ती हिने सादर केलेली ‘याद पियाकी आये’ ही आर्त ठुमरी काय काय म्हणून आठवावे? 

शिवकुमार शर्मा यांनी  संतूरच्या सुरावटींनी काढलेली रागेश्रीची रांगोळी,’ ही सगळी मनात चिरंतन जाऊन बसलेली स्वरशिल्पं आहेत . कंठ संगीताचा अनुभव देणारे गाणारे व्हायोलीन वाजवणाऱ्या एन.राजम या विदुषीच्या बोटातली जादू याच सवाईनी आम्हाला दाखवली. वैजयंतीमाला या भरतनाट्यम नृत्यांगनेचे ‘संत सखू’  हे नृत्यनाट्य पाहणे म्हणजेच एक मनोहारी उत्सव..सवाई नसते तर कुठं पाहिलं असते हे आम्ही ?

गाणे हे आनंदाचे कारंजे असते, इंद्रधनुष्य असते हे भान माझ्या वडिलांच्या संगीत प्रेमाने मला दिलेली फार मोठी इस्टेट आहे .रेणुका स्वरुप शाळा आणि रमणबाग शाळा या दोन्ही ठिकाणी हा नेत्रदीपक सोहोळा, गानयज्ञ याची देही याची डोळा आणि श्रवण इंद्रीयांने अनुभवण्याचे भाग्य माझ्या भाळी लिहिणाऱ्या त्या अज्ञात शक्तीचे आभार मानावेत तितके कमी आहेत. 

डिसेंबर मधल्या त्या रविवारी पुण्यात येणाऱ्या सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांना ‘जो भजे हरी को सदा’ या पंडितजी यांच्या भैरवीच्या आर्त स्वरांनी अनेकवेळा कृतकृत्य केले आहे. ‘जमुना के तीर’ या स्वतः सवाई गंधर्व यांनी गायलेल्या ठुमरीचे स्वर ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून कानात आणि मनात साठवत रसिक या गान पंढरीला  निरोप देतात. माथी बुक्का ,गळ्यात तुळशी माळ नसलेले, पण विठ्ठलाचे स्पष्ट दर्शन झालेले हे हजारो  वारकरी; हीच आपल्या  शास्त्रीय संगीत विश्वाची खरी दौलत आहे…. कधीही न संपणारी . 

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments