सौ राधिका भांडारकर
☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
२०२२— वर्ष संपलं.
आज वर्षाचा शेवटचा दिवस.
उद्यापासून नवे वर्ष सुरू.
नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा, नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!
मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना, मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे. काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?
कालचक्र अव्याहत फिरत असते. कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत. बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे. काय बदलतं?
कसे गेले हे वर्ष?
राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..
त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला. काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले. गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!
आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.
पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली. कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?
डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”
जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय. कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय. कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी अनेक आशा, स्वप्नं, सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग! विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..
असावे सकारात्मक..
असावे आशादायी…
बाकी नम्रपणे वंदन—त्या कालचक्राला…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈