सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
हे ईश्वरा ,
तुझ्या असण्याविषयीच्या भोव-यात गुंतण्यापूर्वी
नि तुझ्या बासरीच्या सुरांनी मोहित होण्यापूर्वी ….
विचारायचा आहे तुला एक प्रश्न !
पुन्हा पुन्हा अवतार घेताना..
एकदाही तू स्त्रीचा जन्म कसा नाही घेतलास ?
तिच्या दुर्दैवाचे दशावतार भोगायला का कचरलास ?
सोपे होते रे तुझे कुब्जेला सुंदर करणे ….
…. नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे !
जगून तरी पाहायचे त्यांचे अपमानित जगणे !
मोरपिसाच्या स्पर्शाने बुजतात का क्षणात ….
…. सा-या जखमांचे व्रण ?
नि शिळा जिवंत होताच सरते का रे …. तिचे अपराधीपण ?
हे सर्वज्ञा ,
जन्माचे रहस्य तूच जिच्याकडे सोपवलेस ,
तिच्या मनाचा थांग तुला कसा नाही लागला ?
लेखिका – डॉ. नीलिमा गुंडी
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈