सौ. सुचित्रा पवार
☆ गुलाबी हवा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
डिसेंबरचा महिना होता,सगळीकडे ख्रिसमसची धूम होती. बाजारपेठा आकर्षक वस्तूने सजल्या होत्या. खेळणी, कपडे,खाऊ,केक,ख्रिसमस ट्री,सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साह भरलेला होता.पाईन -देवदारच्या गच्च फांद्यात निवांत झोपलेली हवा पहाट होताच चटकन उठली.सगळीकडे अजून अंधार होता. झाडाच्या एका फांदीला शरीराला पिळदार वळण देत लटकून तिनं आळोखे पिळोखे दिले, मग हलकेच झोका घेत फांद्याच्या आधाराने हळुवार ती जंगलातून बाहेर आली. गुलाबी फुलांचे ताटवे सगळीकडे बहरले होते. ती ताटव्यावर येऊन जरा पहुडली… इतक्यात पाखरांचा किलबिलाट कानावर आला,’आता आळस करून चालणार नाही,आपल्याला निघायलाच हवं ‘ ती स्वतःशीच पुटपुटली. गुलाबी ताटव्यावरून उठताच तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचा रंग गुलाबी झाला होता ! तिला खूप छान वाटलं. मंद मंद शीळ घालत ती वेळूच्या बेटातून हळुवार निघाली.
निशिगन्ध, शेवंती, जाई -जुई सर्वांना हलकेच स्पर्श करताच सर्व सुगन्ध तिच्या अंगाला लागला. तिला खूप प्रसन्न वाटले.मंद मंद हसत ती पुढे निघाली. भल्यामोठ्या बागेत एक पांढरी इमारत तिला दिसली. ती कुतूहलाने आत शिरली. भल्या मोठ्या गोल घंटेभोवती तिनं स्वतःला वेढले व हलकेच एक झोका घेतला तसे घंटा किणकिणू लागली. सर्वत्र दिवे झगमगत होते, फुलांची आरास होती. ती अजून आत गेली.सर्वत्र शांतता होती. समोर क्रुसाला लटकलेली शुभ्र मूर्ती होती.तिने मूर्तीला वळसा घातला अन पुन्हा घंटेजवळ आली. तिचा हलकासा स्पर्श होताच घंटा पुन्हा किणकिणू लागली. ती बाहेर आली.सूर्याची पिवळी,तांबूस सोनेरी किरणे वाट काढत बागेत लपाछपी खेळत होती. तिनं किरणांत प्रवेश केला. तिचं सर्व अंग गुलाबी -सोनेरी दिसू लागलं. तिला मज्जा वाटली.बागेतल्या तळ्यापाशी येऊन ती हलकेच विसावली.बदकांचा एक थवा पाण्यात सावकाश पोहत होता.पाण्यावर सोनेरी किरणं तरंगत होती. तिनं पाण्यावर हलकेच फुंकर मारली तसे किरणांनी पाण्यावर हेलकावे खायला सुरुवात केली. सोनेरी पाण्याचे ते तरंग हेलकावे खातानाचे मनोहारी दृश्य पाहून ती हरखून गेली.मग तिनं हळूच बदकांच्या थव्यावर फुंकर घातली. त्यांची मऊ पांढरी शुभ्र पिसे वाऱ्याने विस्कटू लागली अन ते हेलकावे खात खात आपोआप पाण्याच्या त्या तरंगावरून पुढे जाऊ लागले. तिला गंमत वाटली.
इतक्यात तिला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.ती पटकन तिकडे गेली.एक लहान मुलगा थंडीने कुडकुडत होता.ती त्याच्याजवळ गेली तिच्या ऊबदार स्पर्शाने लपेटले, त्या मुलाला बरे वाटले.ती आणखीन पुढं गेली. रस्त्याकडेला बऱ्याच झोपड्या होत्या.तिने एका झोपडीत हळूच डोकावले.फुंकर मारून मारून एक स्त्री चूल पेटवत होती, धुराने झोपडी गच्च झाली होती. तिच्या नाकातोंडात धूर गेला. तिला गुदमरू लागले,ती तशीच थोडावेळ डोळे बंद करून थांबली अन चुलीत जाळ पेटला ! जाळ होताच सर्व धूर बाजूला झाल, त्या स्त्रीला हायसे वाटले,हवा तिथून बाहेर पडली.
भटकत भटकत ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. उंच टेकडीवर एक मंदिर दिसले.पायऱ्या चढून ती वर आली अन पायरीवर विसावली अन आतले दृश्य पाहू लागली. देवाच्या प्रसन्न मूर्तीपुढं दिवा तेवत होता,मूर्ती फुलांच्या ताज्या हाराने सजली होती. ताज्या फुलांमुळे ती अजूनच सजीव वाटत होती.उदबत्तीचा सुगंध तिच्या शरीरावरील सुगंधासारखाच होता.एक तरुण जोडपे मूर्तीसमोर हात जोडून उभे होते.प्रार्थना संपताच ते बाहेर आले.बाहेर येताच तिला जवळ घेऊन तो हळूच काही पुटपुटला अन दूर गेला.तिच्या डोळ्यात अश्रू आले.ती तिच्याजवळ गेली अन गालांवर विसावली तसे तिचे गाल गुलाबी झाले. मग तो मागे फिरला अन कानात हळूच बोलला,” धीर धर,मी लगेच परत येईन,सीमेवर माझी आता गरज आहे,असा जातो न असा येतो “.तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले तसे हवा खुदकन हसली अन तिथून दूर गेली.
आता ती रानात गेली अन पिकांतून वाहू लागली.पिके आनंदाने डोलू लागली,पाखरे दाणे टिपू लागली, तीही आनंदाने बागडू लागली, पाखरांची गाणी ऐकून आनंदून गेली, मग फळांच्या झाडांवरून झोके घेत वेगवेगळ्या फळांना स्पर्श करू लागली.आंबट गोड सुवास तिच्या अंगाला लागला.शेतकरी शेतात काम करत होते. ती हळूच जवळ गेली. घामाने निथळलेल्या त्यांच्या शरीराला झुळुकीचा स्पर्श होताच त्यांना हायसे वाटले.
आता ऊन चांगलेच तापले होते. तिचा रंग लाल झाला.आंब्याच्या भल्यामोठ्या झाडाखाली तिनं विश्रांती घेतली.गार गार सावलीत तिला झोप लागली.
तिला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे मावळतीला गेली होती. आता तिला घरी परतायला हवं होतं.ती झपाट्याने चालू लागली; त्याच रस्त्याने भरभर ती परतली…. आनंदाने गीत गात, आणि पुन्हा तिच्या घरात जाऊन शांतपणे विसावली.
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈