सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ प्रकाश भाऊजी – एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
शनिवार २१/१/२३ .. प्रकाश भाऊजींना जाऊन बरोबर पंधरा दिवस झाले ! कै. प्रकाश विनायक सहस्रबुद्धे, माझे धाकटे दीर ! आठ डिसेंबरला त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. आणि सात जानेवारीला हे वादळ संपुष्टात आले. बरोब्बर एक महिना अस्वस्थतेत गेला !
गेल्या 45 वर्षाचे आमचे दीर-भावजयीचे नाते ! १९७६साली लग्न होऊन सहस्त्रबुध्द्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा पाहिलेले हसतमुख, उमदे, खेळकर, खोडकर स्वभावाचे प्रकाशभावजी डोळ्यासमोर उभे राहतात ! आम्ही दोघेही तसे बरोबरचे, मी एक वर्षाने लहानच, त्यामुळे आमचे दिर- भावजयीचे नाते अगदी हसत खेळत निभावले जात होते.
पुढे १९८१ मध्ये आम्ही सांगलीला आलो. प्लॉटवर शेजारी शेजारी जवळपास बत्तीस वर्षे राहिलो ! एकमेकांची मुले- बाळे खेळवली. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र आलो. माझी मुले त्यांच्या मुलींपेक्षा दहा-अकरा वर्षांनी मोठी, त्यामुळे प्रथम माझ्या मुलांचं बालपण आणि पुढे त्यांच्या मुलींचे बालपण जोपासण्यात आमचेही बालपण, तरूणपण टिकून राहिलं !
बी.कॉम. झाल्यावर नोकरी न करता १९७८ साली मार्चमध्ये चैत्र पाडव्याला त्यांनी दुकान सुरू केले… तेव्हा ” केदार जनरल स्टोअर्स ” असं दुकानाला त्यांनी नाव दिलं, तेव्हापासूनच त्यांची केदारबद्दलची आत्मीयता प्रकट झाली ! फारसं भांडवल नसतानाही प्रथम पत्र्याची शेड दुकानासाठी उभारली. तयार घराच्या दोन खोल्यात आईसह राहिले. सायकलवरून सामान आणत. दुकानाची सुरुवात झाली. भरपूर कष्ट घेत दुकानाचे बस्तान बसवले. गोड बोलून गिऱ्हाईकांचा विश्वास संपादन करून, गव्हर्मेंट कॉलनीमध्ये त्यांनी चांगले नाव मिळवले. लग्न झाल्यावर दीप्तीची साथ मिळाली आणि संसाराची गाडी रुळाला लागली. प्रथम मोपेड, नंतर स्कूटर आणि मग मोटरसायकल असा गाड्यांचा प्रवास सुरू झाला !
“उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी” या उक्तीप्रमाणे दीप्ती आणि प्रकाश भाऊजींनी लक्ष्मी घरात आणली. किराणा दुकान आणि कापड दुकान दोन्हीही छान सुरू होते. प्राजक्ता, प्रज्ञाच्या जन्माने घरात आनंदी आनंद झाला. मुली हुशार ! आई-बाबांच्या कष्टाचं चीज करणाऱ्या ! दोघी इंजिनियर झाल्या, नोकरीला लागल्या. दोघींनीही आपापले जीवनसाथी चांगले शोधले ! प्राजक्ता- ओंकार जर्मनीला काही वर्षे राहून परत भारतात आले. प्रज्ञाने निखिलसह संसार थाटला ! २०१९ च्या दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना पुण्यात आणले आणि तीनही कुटुंबांचे एक संकुल वाकडला तयार झाले. त्यातच प्रज्ञाला मुलगा झाला आणि शर्विलच्या आगमनाने प्रकाशभावजींचा आनंद आणखीनच खुलला ! लहान मुलांची त्यांना खूप आवड ! निवृत्तीचे आयुष्य असे आनंदात चालले होते.
प्रकाशभावजींना लोकसंग्रह करण्याची फार आवड ! वाकडला नव्याने आले तरी शाखेच्या गोतावळ्यात रमून गेले. इतरही अनेक ओळखी करून घेतल्या. बोलका स्वभाव, खेळकरपणे प्रसंग हाताळणे, व्यायाम, खेळाचे महत्व मुलांना पटवणे यासाठी संस्कार वर्ग सुरू केले. त्यात ते इतके रममाण झाले की सांगलीचे आयुष्य बदलून वाकड मध्येही ते तितकेच रमले ! गुलाब फुलांची आवड असल्याने विविध रंगांचे कलमी गुलाब त्यांच्याकडे पाहायला मिळत. फुले आणि मुले दोन्हीची आवड जोपासली. एकंदरीत ते इथे आल्यावर वाकडच्या त्यांच्या घरी हा सर्व आनंद पाहून आम्ही खुश झालो.
सांगलीच्या त्यांच्या आठवणी तर असंख्य आहेत ! पण त्यांची खवैयेगिरी तर जास्तच लक्षात आहे. कोणत्याही आवडलेल्या पदार्थाचे तोंड भरून कौतुक करून खात असत, मग तो कोणी बनवला याच्याशी त्यांना कर्तव्य नसे. गुलाबजाम जास्त आवडत असत. पैज लावून जेवायला आवडत असे. एकदा संपूर्ण जेवणाबरोबर उकडीचे मोठमोठे २१ मोदक त्यांनी संपवले. एका बैठकीला सात आठ पुरणपोळ्या आरामात खात असत! आम्ही सांगलीत असताना छोट्या छोट्या ट्रिप खूप होत असत. बरेच वेळी पाहुणेमंडळी आली की सर्व कार्यक्रम एकत्रच होत असत. शुकाचार्य, ब्रम्हनाळ, नरसोबाची वाडी, कागवाड, हरिपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आम्ही ट्रीपला जात असू. सुट्टीत मुलांना पोहायला नेणे, भरपूर सायकलींग करणे, उसाचा रस, भेळ तर कधी खास भाकरी, ठेचा, दही धपाटे असे बेत होत असत. यामुळे सगळ्यांचे एकत्रीकरण तर होईच आणि मुलांना सांघिक कामाचे वळणही लागत असे.
शाखा हा त्यांचा वीक पॉईंट होता.” संघावाचून कोण पेलणार काळाचे आव्हान ” हा संघ मंत्र सतत त्यांच्या तोंडात असे. आमच्या सांगलीच्या घरात मुलांना त्यांचा खूप आधार वाटत असे. काकाने काही सांगितले की ते प्राचीला लगेच पटणार ! लहानपणी प्राची थोडी अशक्त होती. बाबांनी औषध दिले , पण तिचे मानसिक टॉनिक काकाच होता ! केदार तर काकांची काॅपीच ! केदार, प्राची, प्राजक्ता, प्रज्ञा ही चारी मुले सांगलीच्या घराच्या सावलीत वाढली आणि पुण्यात सर्वांचे कर्तृत्व बहरले !
२०१९ साली दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना दुकान बंद करून पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. आता सर्व छान सुखात चालू होते. पण काही वेळा नियतीला हे बघवत नाही की काय असे वाटते ! डायबेटीस, बीपी असा कोणताही आजार नसलेल्या प्रकाशकाकांना अचानक हार्ट अटॅक येतो, हेच मनाला पटत नव्हते ! त्यानंतर झालेली बायपास सर्जरी, त्यातच वरचेवर होणाऱ्या खोकल्याचा, कफाचा त्रास आणि न्युमोनिया पॅच या सर्वांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. मुली- जावई आणि सर्वांनी जीव ओतून त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. चार जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. ७० वर्षे पूर्ण झाली. तो मनाप्रमाणे साजरा करून त्यांनी जगण्याची आशा दाखवली पण….. काळापुढे इलाज नाही.. शेवटच्या एक-दोन दिवसात तब्येतीने साथ दिली नाही. आणि अखेर “आई, काका गेला गं ” हे केदारचे शब्द फोनवरून सात जानेवारीला सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता माझ्या कानावर आले. डोकं बधीर झालं ! तब्येत खालावली आहे हे ऐकणं वेगळं आणि प्रकाश काका आता पुन्हा दिसणारच नाही हे सत्य पचवणं फार अवघड आहे. तरीही कालाय तस्मै नमः!
त्यांच्या स्मृती तर आम्ही ठेवूच, पण जाणीव होते की आपलीही सत्तरी आली. ” मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…” हे मनात ठेवून येणारा प्रत्येक क्षण आपण चांगला जगू या असे वाटते, एवढे मात्र खरे ! कै. प्रकाश भाऊजींना माझी मनःपूर्वक श्रद्धांजली !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈