सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पोच पावती… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते, ” ह्याची पोचपावती मिळेल ना ?”

बरेचदा मीही हिला सांगतो ‘ acknowledgment म्हणून जपून ठेव ग !!! ‘

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…… 

….. पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ?? 

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना ‘ appreciation ‘असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा. 

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “ छान झाला बरं का आजचा कार्यक्रम. ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो !

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते. एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा.. अगदी मनापासून… बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं. 

आमच्या घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड ! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला, की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत ” प्रमिला काय मस्त दिसते आहेस. चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा खूप खुश होतात त्या. लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते…… एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात ” छान निबंध लिहिलास हो ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो. 

ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असंही काही नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं 

” काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले. “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, आणि ही दखल घ्यायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच.…. काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही …..  तसं करूही नये.  

… कारण पोचपावती जितकी उत्स्फूर्त, तितकीच जास्त खरी !! 

पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून, कधी कृतीतून, तर कधी स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं, तशी तशी ती पोचवावी … कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, कधी अगदी ” च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या “, अशी वेगळ्या भाषेतूनही यावी. 

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उत्स्फूर्त. 

महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच..  ह्या मुलांच्या भाषेत cool dude ..  हवा. 

ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…

….. आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी फारसं काही लागत नाही….  लागतं फक्त मोकळं आणि स्वच्छ मन … !!!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद !!!

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments