डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
पैशाने खरेदी करता येत नाहीत… अशा गोष्टी ज्याच्याकडे जास्त, तो खरा श्रीमंत !
ज्याच्या घरात अजूनही वृद्ध आई बाबा राहतात तो खरा श्रीमंत…. !
निसर्गाने आणि समाजाने, याचना करणाऱ्या लोकांसाठी काम करण्यासाठी माझी निवड केली…. आणि त्यामुळे या कामात मला किमान दोन-तीनशे आई, दोन तीनशे बाबा, दोन तीनशे आजोबा, दोन तीनशे आज्या मिळाल्या आणि या वयात मला शे दोनशे पोरंही झाली…. !
मग मीही श्रीमंतच की !
उन्हात बसलो असताना आजीने डोक्यावर धरलेला पदर, घामाच्या धारा निथळत असताना एखाद्या आजीने चार बोटं बुडवून आणलेल्या उसाच्या रसाचा ग्लास, शिळ्या चपातीचा काला करून भरवलेला घास, ८० वर्षाच्या, रस्त्यावर पडलेल्या आजीला गमतीने काहीतरी चिडवल्यानंतर, ‘मुडद्या तुला हाणू का चपलीनं ?’ म्हणत तिने घेतलेला गालगुच्चा… माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसणारा तो मळलेला…. तरीही सुगंधी पदर…. मी हातात घेतलेले सुरकुतलेले मायेचे हात…!
….. पैसे खर्च न करता जमा झालेल्या या मौल्यवान गोष्टी मी रोज माझ्या झोळीत घरी घेवून येतो.
रात्री झोपण्याआधी दिवसभरातल्या आठवणींची ही झोळी उघडून बघतो आणि जाणीव होते… जगातला सर्वात श्रीमंत मीच असेन ! …. माझ्यावर विश्वास ठेवून श्रीमंत होण्याची ही संधी समाज म्हणून आपणच मला दिली आहे.
आजवरच्या कामात एक लक्षात आलं, आपण स्वतःसाठी काही केलं की होते ती “प्रगती”…. परंतु स्वतः सोडून जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करायला लागतो, त्यावेळी होतो तो “विकास”… !
स्वतःच्या प्रगती बाहेर येऊन ….दुसऱ्यांचा विकास व्हावा ही मनोमन इच्छा धरणाऱ्या… आपल्या सर्वांच्या विचारांना माझा साष्टांग नमस्कार … !!!
* रस्त्यावर राहणारे एक पती-पत्नी सन्मानाने राहू इच्छितात. परंतु व्यवस्था त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. तीन नोव्हेंबर रोजी या पती-पत्नीला फुल विक्रीचा व्यवसाय आपण टाकून दिला आहे. पत्नी अपंग आहे, तिला व्हीलचेअर दिली आहे. हार आणि गजरे तयार करून /विकून दोघेही पती पत्नी सन्मानाने जगत आहेत.
….. तिकडे ते फुलं विकत आहेत आणि इकडे माझे हात सुगंधी झाले…!
* “ती” पलीकडे बसलेली ताई दिसते का तुम्हाला ? हां तीच…. ती खरं तर अपंग आहे…. ! या जगात तिला कोणीही नाही…. रस्त्यावर राहते ….अनेक गिधाडं तिच्यावर टपून आहेत…. ! दुर्दैव असं …. की ती उठून उभी राहू शकत नाही…. ती पळणार कशी ?
आता थोडसं त्या बाजूला जाऊ…. ही पाहा, ही दुसरी ताई….. हिची सुद्धा अवस्था तशीच… ही सरपटत घसरत एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते…
ही तिसरी ताई बघितली ? हिची आई ८० वर्षाची असेल… काम करण्याची तयारी आहे, परंतु कामं मिळत नाहीत… सोपा उपाय म्हणून ती आता भीक मागायला लागली आहे.
आता थोडं इकडे यावं…. ही चौथी ताई बघितली ?
ही पूर्णतः अंध आहे ! पूर्वी रेल्वेमध्ये चिक्की विकायची…. कोविडनंतर तो व्यवसाय बंद पडला
…… या चौघी सुद्धा तरुण आहेत ! रस्त्यात एखादा घास पडला असेल तर तो उचलण्यासाठी किमान ५० कावळे टपून असतात..,… या चौघींच्या आसपास फिरत असलेले हे कावळे बघताय तुम्ही ?
यातील तिघींना व्हीलचेअर आणि कुबड्या देऊन, वजन काटा दिला आहे, चौथ्या ताईला भाजी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. वजन काट्यावर, वजन करून लोक यांना पैसे देतात, भाजी घेतात….
या चौघीही आता परावलंबी नाहीत… स्वावलंबी झाल्या आहेत … साध्या अशा एका चाळीमध्ये का होईना, परंतु रस्त्यावर न राहता घरामध्ये राहत आहेत… !
… काठी न वापरता कावळ्यांना हुसकावून लावलं आहे आणि चारही “चिमण्या” आता घरट्यात सुरक्षित आहेत !
* पाचवी एक ताई …. घरात कोणाचा आधार नाही … तीन मुले आहेत…. शिवणकाम येते, परंतु भांडवल नाही.
हसबनीस नावाचे माझे ज्येष्ठ स्नेही, यांनी या ताईला स्वतःकडील शिलाई मशीन दिले आहे, आता ही ताई साडीला फॉल पिको वगैरे करून स्वतःच्या संसाराला हातभार लावत आहे.
…. फाटलेला संसार ती धाग्या धाग्याने पुन्हा विणत आहे.
– क्रमशः भाग पहिला.
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈