श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

आमच्या घराजवळ एक शाळा आहे. शाळेच्या बाहेर २-३ बाकं आहेत. परवा दुपारी एका मित्राची वाट बघत तिथे बसलो होतो. प्राथमिक शाळा सुटली. पालकांची, व्हॅन काकांची, रिक्षावाल्यांची, मुलांची गर्दी उसळली. निम्मे पालक पुढे ५० मीटरचा वळसा नको म्हणून माझ्या समोरून रॉंग साईडने गाड्या घालून मुलांना घेऊन गेले. झेब्रा क्रॉसिंगला कोणीच थांबत नव्हतं. ‘शाळेसमोर हॉर्न वाजवू नये’, या ऐवजी, ‘हॉर्न वाजवणं कंपल्सरी आहे’, असं वाटत होतं. १० मिनिटात परत शांतता झाली. मी बसलो होतो त्या बाकामागे ४-६ मुलं ज्यांच्या व्हॅन/पालक यायचे होते, ते शिल्लक होते. मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं.                                                  *                                               

एक म्हणाला, 

“आमचे व्हॅनकाका इतके भारी आहेत की, आज सकाळी उशीर होत होता, तर त्यांनी सरळ सिग्नल तोडला.”

दुसरा : “हे तर काहीच नाही.. आमचे व्हॅनकाका तर रोजच सगळे सिग्नल तोडतात.”

तिसरा : “आणि कसले भारी शिव्या देतात ना!”

चौथा : “अरे, माझे बाबा तर उशीर झाला ना, तर सरळ नो एन्ट्रीमधून बाईक घालतात.”

पहिला : ” माझ्या बाबांचं तर ठरलेलं आहे.. जर पोलिसांनी थांबवलं तर बाबा त्यांचं पाकीट गाडीतच ठेवतात. आईकडून एक ५०० ची नोट चुरगळून मुठीत कोंबतात आणि पाच मिनिटात पोलिसाला भेटून परत येतात.. कुठे पण पकडू देत आम्हाला.”

यापुढे मात्र मला राहवलं नाही. माझ्यातला सुज्ञ का कोण तो नागरिक जागा झाला. तसं हल्ली मी कोणालाच काही समजवायला जात नाही, तरी पण मुलांना समजवावं असं वाटतं, कारण तीच उद्याची पिढी असते… काही बदल घडवू शकणारी.                                                           

 मी मुलांकडे गेलो. आपण कुठल्यातरी चुकीच्या गोष्टी प्रमोट करत आहोत, याचा जरासुद्धा अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांनी ‘आता कोण हे काका लेक्चर द्यायला आले?’ असा लूक दिला. 

मी त्यांना म्हणालो, 

“आता गव्हर्मेंट एक नवीन रूल आणणार आहे… व्हॅनचे नंबर्स आणि जे आई/बाबांबरोबर येणाऱ्यांसाठी त्यांच्या गाड्यांचे नंबर्स मुलांच्या रोल नंबर्स बरोबर लिहून घेणार आहेत. आता सगळीकडे चौकाचौकात CCTV आहेत. त्यात रूल मोडला तर गाडीचा नंबर कॅप्चर होतोच. त्यावरून कुठल्या मुलाच्या आई/बाबांनी किंवा व्हॅनकाकांनी रूल मोडला ते रेकॉर्ड होईल. एकदा रूल मोडला की ५ मार्क्स कमी. वर्षाच्या शेवटी तुम्हाला जितके मार्क्स मिळाले त्यातून जेवढ्या वेळा तुम्हाला शाळेत सोडताना/परत नेताना रूल मोडला ते इंटू  (*) ५ इतके मार्क्स कमी आणि ते तुमचे फायनल मार्क्स! “

भीषण शांतता पसरली. सगळी मुले विचारात पडली. मला माझेच कौतुक वाटले आणि स्वतःचीच आयडिया खूप आवडली (खरं तर मला हे पटत नाही.. सगळ्याच गोष्टी कशाला मोजायला पाहिजेत.. चांगुलपणा / नियम पाळणे / देशभक्ती या काय मोजायच्या गोष्टी आहेत. पण हल्ली डेटा आणि क्वांटिटेटिव्ह या शिवाय आपण जगूच शकत नाही.. असो तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे). मी परत येऊन बाकावर बसलो. दोन मिनिटेच गेली असतील आणि ती यंग ब्रिगेड माझ्याकडे आली…  

एक : “काका, याच्याकडे भन्नाट आयडिया आहे, तो म्हणतो मी बाबांना सांगीन की, काकांच्या गाडीवरून सोडत जा म्हणजे त्याच्या चुलत भावाचेच मार्क कमी होतील.. नाही तरी फार शायनींग खातो.” 

दुसरा : “येड्या, त्यापेक्षा डुप्लिकेट नंबर प्लेट लावायची.”

तिसरा : “काका.. त्या दुसऱ्या शाळेची आमच्या शाळेशी खूप खुन्नस आहे.. समजा, त्यांच्या प्रिन्सिपॉलनी आमच्या व्हॅनकाकांना पैसे दिले आणि मुद्दाम सिग्नल तोडायला सांगितले तर म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना कमी मार्क्स पडतील आणि आमची बदनामी होईल… तर?”

माझ्या शेजारच्या बाकावर बसलेला बोलला, “आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत ना..”

तेवढ्यात पी-पी करत रॉंग साईडने त्यांच्या व्हॅन आल्या आणि मुले गेली. मी वाचलो. कारण त्या मुलाच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण हा स्मार्टपणा नक्की नाही. ८-१० वर्षांच्या त्या मुलांमध्ये हे असले विचार येतात कुठून? सगळ्यात पळवाटा शोधायच्या, फाटे फोडायचे, सारखी कुरघोडी करायची, चूक मान्य करण्याऐवजी तिचे उदात्तीकरण करायचे, इतके नकारात्मक विचार एवढ्याश्या मेंदूत येतात कुठून? आणि तेही इतक्या लगेच? मुलांची काहीच चूक नाही. ते आजूबाजूला जे ऐकतात, बघतात, वाचतात, त्यातून तर शिकतात. का त्याही पलीकडे, ही अशी नकारात्मक वृत्ती हल्ली अनुवंशिकतेतूनच त्यांच्याकडे जाते की काय कोण जाणे?

एक वेळ मार्क्स कमी करून त्यांना नियम पाळायची जबरदस्ती करता येईलही. पण त्यांच्या मनातल्या नकारात्मक, फाटेफोडू विचारांचे ट्रॅफिक कसं रुळावर आणायचं? मुलांची ही मानसिकता, नकारात्मक वृत्ती, पळवाटा काढायची सवय हे जास्ती भीतिदायक आणि काळजी करायला लावणारं आहे…. 

बाकी काही नाही जमलं, तरी याला “स्मार्टनेस” म्हणू नका आणि त्याचं कौतुकही करू नका, उदात्तीकरण करू नका. (असले मेसेजेस, रील्स, स्टोऱ्या फॉरवर्ड आणि शेअर नाही केलं तरी खूप आहे).. “चूक हे चूकच आहे” हे मान्य करा, ठणकावून सांगा, परत परत सांगा आणि उगाच चूक क्वांटिफाय करत बसू नका. कदाचित हीच बदलाची सुरूवात असेल. प्रजासत्ताक दिन येतोय, चला आपापल्यापुरती तरी सुरूवात करूया.  

✍️

योगिया

ता.क :

हा लेख लिहिला. FB वरही टाकला. कौतुकाने माझ्या बाबांना वाचून दाखवला. हसले. मी विचारलं, “कसा झालाय?” म्हणाले “छान झालाय.” 

“मग हसलात का?”

“सहजच.”

आता मी त्यांना गेली ५० वर्षे ओळखतो…

ते सहज हसणं नव्हतं. त्याला खेदाची किनार नक्कीच होती.

मी परत विचारलं, “का, काय झालं?”

ते म्हणाले, “असंही लिहू शकला असतास की, ज्या मुलांचे आई /बाबा , व्हॅनकाका नियम पाळतील त्यांना २ टक्के जास्त मार्क्स देण्यात येतील, ते कटच कशाला करायला पाहिजेत?”

खजील व्हायला झालं…! 

खरंच आमच्याच पिढीपासून हा प्रॉब्लेम झालाय…! नकारात्मक वागण्याचा/लिहिण्याचा/विचार करण्याचा!

मुद्दाम लेख एडिट करत नाहीये.. राहूदे ही बोच मनाला…! 

पण तुम्ही जर पुढे शेअर कराल, कोणाला सांगाल तर मात्र हा बदल जरूर करा.

लेखक : श्री योगिया  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments