सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
एका सीमावासीय “आलूर” गावातील माझी स्वतःचीच कथा तुम्हाला सांगत आहे. आता सीमावासीय म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमा ही झाली राज्याची , सोलापूर उस्मानाबाद – कलबुर्गी या झाल्या जिल्ह्याच्या सीमा. तर अक्कलकोट – तुळजापूर – आळंद या तालुक्याच्या सीमेवर वसलेले उमरगा तालुका,उस्मानाबाद जिल्ह्यातील आलूर माझं गाव .
आता एवढ्या सीमा म्हटल्यावर १९७५ सालच्या काळात विविध संस्कृती व जातीभेद होताच. आमचा पारंपरिक व्यवसाय कातडी कमावणे. परंतू आमचे आजोबा हे शेती व्यवसायिक होते, तर माझे वडील एकुलते एक होते. त्यांचे शिक्षण त्याकाळी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांना शिक्षकाची नोकरी आली होती म्हणे. पण ते नोकरी नाकारून घरची शेती पाहात असत. त्यामुळे आमचे कुटुंब शेतकरी म्हणूनच ओळखले जायचे.
वडीलांची उठक-बैठक गावातील पोलीस पाटील शंकरराव पाटील, मलप्पा व्हट्टे सावकार, भारसिंग दादा रजपूत, दत्तोपंत कुलकर्णी, स्वातंत्र सैनिक बोळदे काका, तुक्कण्णा वाकडे सावकार यांच्याबरोबर असायची.
आमचे वडील एकुलते एक असले तरी आम्ही मात्र पाच भाऊ दोन बहीण असे सात जण होतो. मी सर्वात लहान. मला कळायच्या आतच मोठे भाऊ सोलापूरला नोकरी निमित्ताने राहायला गेलेले व मोठ्या बहीणीचे लग्न झालेले. ते पण सोलापूरला स्थाईक झालेले. एक भाऊ वरच्या वर्गात शाळेत आणि दोन भाऊ समवयस्क असल्याने ते एकाच वर्गात शाळेत शिकत असत. आई व एक बहीण शेतावर कामाला जात असत. त्यामुळे माझ्याकडे लक्ष देण्यास घरी कुणी नसत. त्यावेळी आमच्या घरात गावातल्या शाळेतले कांबळे गुरुजी आमच्या दोन खोल्यात सहपरिवार रहात असत . मी एकटा घरात बसलेले पाहून न राहवून त्यांनी मला माझा जन्म १९६५ चा असताना १९६२ करून पहिलीमध्ये माझे नाव दाखल केले व त्यानीच माझ्या शाळेच्या जीवनाचा प्रवास सुरू केला. तेच मला शाळेत घेऊन जात व घरी घेऊन येत.
त्यावेळी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा गावाच्या मध्यभागी होती. एका बाजूला भीमराव कुलकर्णी(गुरुजी) व नारायणराव कुलकर्णी(गुरुजी) यांचे घर तर दुस-या बाजूला अल्लाउद्दीन यांचा भलामोठा दगडी वाडा व समोर कल्लय्या स्वामी (आमच्या घरचे ) गुरु यांचे घर. आमच्या घरचे गुरु म्हणजे त्या वेळी अशी पध्दत होती की घरी कुठलेही कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नसत व शेतामध्ये मुगाच्या शेंगा, हरब-याचा ढाळा, ज्वारीचा हुरडा अथवा इतर कुठलेही पीक आल्यावर त्यांना दिल्याशिवाय वडील आम्हाला धाटालाही हात लाऊ देत नसत.
पुढे कांबळे गुरुजी यांची बदली आमच्या गावावरून दुसरीकडे झाली व आता मी ही चौथीतून पाचवीत आलो. दिवस जात होते. चौथी इयत्तेपर्यंत शाळा गावातच होती. पुढे मात्र पाचवी ते दहावी गावापासून दीड दोन किलोमीटर लांब होती.
तसा मी लहान असताना जरा बरा दिसायचो. हळूहळू गावातील मुलांशी मैत्री जमू लागली . राजकुमार खद्दे, रघुनाथ भांडेकर, परशुराम धोत्रे , मुकुंद क्षिरसागर , सुहास पारडे, आप्पशा मलंग, सारंग कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक पाटील, विठ्ल चौधरी, नेपालसिंग रजपूत, अशोक बब्बे, गुंडू बि-हाडे, श्रिशैल गुंडगे, मल्लु जिरोळे, अशोक बोळदे, गुर्लींग पालापूरे, अशोक कुलकर्णी, मोतीराम राठोड, राम राठोड, एम. एच. शेख हे गावातील मित्र. तर दत्तु ,अंबादास , भीम, सुभाष, सुरेश ,राजू ,नवनाथ इंगळे हे भावकी (गल्लीतील) मित्र होते. तरी प्राथमिक शाळेच्या शेजारील घरातील प्रविण कुलकर्णी व माझी चांगलीच गट्टी जमली व मी आता शाळा नसतानाही त्यांच्याच घरी राहायला लागलो . त्या काळी ब्राम्हणाच्या घरी राहणे वगैरे शिवता शिवत मानली जात असे, पण मला कोणीही कधी काही म्हणालेले आठवत नाही. कधी कधी अभ्यासाच्या निमित्ताने मुक्कामही करत होतो.
त्या काळी गावात बाराबलुतेदारी होती. शेतीच्या अवजाराची कामे लोहार ,सुतार करत असत .हणमन्त काकाच्या दुकानात बसून आम्ही हक्काने चप्पल बनवून घेत असू .
गावामधे कटींग करणारे तर होते, पण आम्हाला मात्र त्यांच्याकडे घरचे जाऊ देत नसत. त्या वेळी आमची हजामत (कटींग ) घरीच व्हायची. त्यामुळे डोक्यावर केस असूनसुध्दा व्यवस्थित नाहीत असे नेहमी वाटायचे पण इलाज नव्हता. गावातील मुले छान कटींग करुन केस विंचरुन रुबाबात फिरत असत .मला नेहमी वाटायचे की आपणही गावात कटींग करुन घ्यावी. पण मनात असूनही शक्य होत नसे. त्या काळी घरी पाहुणे आले की जाताना ते काही पैसे लहान मुलाच्या हातावर ठेवत. असे काही पैसे मी जमवले होते. मग मी विचार केला की हे पैसे देऊन आपण कटींग करुन घ्यायची.
त्यादिवशी मी घरी न सांगताच मनाचा हिय्या करुन कटींग करणाऱ्या हडपे काकाच्याकडे गेलो . त्यावेळी त्यांच्याकडे आधीपासूनच एक गिऱ्हाइकाचे काम चालू होते. त्यांनी मला बसायला सांगितले. त्याकाळी बसण्यासाठी सोय म्हणजे एखादा दगड शोधून बसायचे व हजामत करणा-यांचा बसायचा दगड आपल्यापेक्षा थोडा उंच असायचा. एखादी कात्री , वस्तारा , व हातमशीन, आणि पाचशे एक बारचा साबण, तांब्यात पाणी एवढी सामग्री असे .
हातातले काम संपल्यावर तोंडातली तंबाखुची पिचकारी मारत हडपेकाकांनी मला हजामतीसाठी बोलावले.
मी मान खाली घालून त्यांच्यासमोर बसलो . आधी त्यानी माझ्या डोक्याला भरुन पाणी लावले व केसावर कात्री चालवायला सुरु केली. एका बाजूचे अर्धे केस कापायचे संपत आले असतील तोच माझ्या वर्गात शिकणारा हडपे काकाचा मुलगा तिथे आला व त्याने वडलांना कानडीत विचारले, ” इंवदू याक त्यली माडलूतीरी ” (याची का कटींग करत आहात.) व त्याने त्यांच्या कानात माझी जात सांगितली. तसे त्यांनी माझ्या अंगावर खेकसत हातातली कात्री फेकून दिली व अर्धवट झालेल्या कटींगसह मला हाकलून दिले . भिजवलेले डोके व एकीकडचे कापलेले अर्धवट केस अशातच मी रडत रडत घर गाठले . माझा हा असा अवतार बघून वडीलानी विचारपूस करुन मला शांत बसवले व माझी राहलेली अर्धी कटींग केली व पुन्हा असे न करण्याची समज दिली. मी असे काय केले की त्यानी माझी कटींग अर्धवट सोडली असेल बरे? प्रश्नाचे उत्तर कळत असूनही माझ्या बालमनाला पटत नव्हते.
पुढे गावामध्ये कुणीतरी गायकवाड नावाचे तलाठी यांची नेमणूक झाली होती . त्यांना हा विषय समजला. मग त्यांनी गावातील नाभिक समाजाला समज दिली, की त्यांनी जातीभेद न मानता सर्वांचीच दाढी हजामत करावी . अन्यथा शेतीचे सात बारे मिळणार नाहीत . तेंव्हा कुठे आमच्या गावात सर्व समाजाची कामे सुरळीत सुरु झाली.
पण मी अर्ध्या कटींगचा एवढा धसका घेतला होता, की पुढे कटींग करण्यासाठी आमच्या गावापासून तेरा किलोमीटर चालत मुरुम येथे जाउन कटींग करुन येत असे .
लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर.
सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈