☆ मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
एक लेख वाचून वाचकाने फोन केला, “लेख आवडला पण ” गढवापुढे गायली गीता… असं मुलगा आईला म्हणतो ते खटकले.”
“आई मुलात मोकळेपणा असल्यावर म्हणू शकतो. त्याने म्हण वापरली. आईला थोडेच गाढव म्हटला?”
लिहिताना असा विचार मनात येत नाही, लोक कसा विचार करतील वगैरे… कल्पनेतली पात्रे घेऊन लेखन करताना कधी कधी एकतर्फी पना येतो. मग वाचक असे कान धरतात. अशा वाचकांचा खूप आदर वाटतो. प्रत्येकाने जाब विचारायलाच हवा. प्रश्न पडायलाच हवेत.
आई मुलाचे नाते वात्सल्यचे असते. एकमेकांचा आदर प्रेम असते म्हणून मुलाने काही सांगू नये का? मुलगा का नाही आईला नव्या विचारांची शिकवण देऊ शकत?
आपल्या शेतकरी, कुनब्यांच्या घरी शिक्षणाची गंगा आता कुठे वीसतीस वर्षांत आलीय. शिकलेली मुलं सांगतात आईला वैज्ञानिक गोष्टी. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, सण, व्रते यांच्यातील फोलपणा त्यांना समजलेला असतो. अशिक्षित, अर्धशिक्षित आईला तो सांगू शकतो. नव्हे सांगतातच!!
शिकले तरी शिक्षणात देव, धर्म, अंधश्रद्धा याबद्दल कुठे काय शिकवतात. मुळात विचार करायला, प्रश्न उपस्थित करायला शिकवत नाहीत. प्रश्न विचारणारा उद्धट ठरतो. आज्ञा पालन करणे हाच सद्गुण ठरतो. नवे काही शोधून काढणाराला विरोध सहन करावा लागतो.
बाईच्या बुद्धीवर सण, देव, धर्म, व्रते यांची एवढी झापडे बांधली आहेत की, या जगात वेगळे काही असू शकते यावरच ती विश्वास ठेवत नाही. ज्या देवीची ती पूजा करते त्या शक्तिशाली देवीचा आपण अंश आहोत हे वैज्ञानिक सत्य तिला कुणी सांगितले नसते, शिकवलेले नसते. पूजा, कर्मकांडे करत राहणे म्हणजेच खरी भारतीय नारी असणे असं शिकलेल्या बाईला ही वाटते.
साधं कुंकवाचा करंडा सांडला तरी तिला सतत अशुभाची चुटपुट काही दिवस लागून राहते. हातात बांगडी नसणे तिला अशुभ वाटते. केस कपण्याबद्दल तर इतक्या टोकाच्या अंधश्रद्धा आहेत, याची शहरी लोक कल्पनाही करू शकणार नाहीत. आताच्या काळात ही.
‘केस कापल्याने तिच्या नवऱ्याचे आयुष्य कमी होते.’
केसांचा कितीही त्रास झाला, जटा आल्या तरी बाई केसाला कात्री लावत नाही.
कुलाचार कुलधर्म या नावाखाली तर बाई वर्षभर पिळवटून जाते. पूर्वीसारखे घर भरलेले नसते. एक किंवा दोन मुले. ती ही शहरात. मग एकट्याने सगळे रेटायचे. भीती पोटी. आपली पोरं असतील तिथे सुखरूप ठेव म्हणून देवापुढे भाकणुक करायची. सणाला नाट लावायचा नाही. अशावेळी आईला होणारा त्रास पाहून कुठलाही शहाणा समंजस मुलगा सात्विक संतापाने , पोटतिडकीने सागणारच की. मग सांगताना आईनेच शिकवलेल्या म्हणी ओठावर येणारच की….
हेच तर जिव्हाळ्याचे नाते असते. आपल्या लोकांना शहाणे करून सोडण्याची कळकळ असते. आता हे बोलताना वडील असते तर भाषा थोडी वेगळी असली. पण आई ही जन्मताच मैत्रीण असते. बाळ तिच्याशी सगळे मोकळेपणाने बोलते. सांगते. मनात काही ठेवत नाही. मैत्री अशीच असते ना…
आईसारखी मैत्रीण कुठे असणार? आईला तरी मुलासारखा विश्वासाचं मित्र कुठे मिळणार?
आईने शिकवलेल्या पायावरच असे प्रश्न निर्माण होतात. गणपतीला आणायची पत्री आता कुठे मिळते का? साध्या दुर्वा मिळणे मुश्कील झाले आहे. पेपरात येते या पत्री औषधी असतात म्हणून वाहा. पण त्या बाईची किती त्रेधतिरपीट उडत असेल. कारण तिलाच पुण्य मिळवायचं असते पोरा बाळांसाठी….
असे महिन्यातून एक दोन तरी सन व्रते असतात. हे करा म्हणजे ते होईल. असे करा म्हणजे तसे होईल…
एका अमेरिकेतल्या माणसाचा व्हिडिओ आला. सगळे सण कसे आम्ही मंत्र पाठणात करतो. वगैरे…
त्या काहण्यात काय असते, शंकर पार्वतीला सांगतो, ” हे व्रत खूप श्रेष्ठ आहे. जसे चार वरणात ब्राम्हण श्रेष्ठ तसे सगळ्या व्रतात हे व्रत श्रेष्ठ आहे. हे व्रत करणाराला अखंड सौभाग्य प्राप्त होते. पण जे करत नाहीत त्याला वैधव्य, दारिद्य्र येते.”
हे ऐकूनच डोके सटकले. अज्ञानी असताना हे सगळे मी करत होते पण अताही अशा कहाण्या ऐकूण व्रते करायची. तेही अमेरिकेत… व्वा व्वा… तिथे सौख्य मिळवायचे. आम्ही भारतीय परंपरा सांभाळतो याचा झेंडा मिरवायचा.
कशाने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि कशाने दारिद्र्य येते हे यश प्राप्तीची पुस्तके वाचून कळू येईल. पण परंपरा, संस्कृती याची नशाच भारतीयांना अतोनात आहे. वैज्ञानिक साधने वापरून परंपरा सांभाळतात. पण अशा परंपरा सांभाळण्यासाठी आपण काही साधने निर्माण करावी असं काही भारतीयांना वाटत नाही. पत्री औषधी आहेत ना तर का नाही करत डोंगर, टेकड्यांवर याची लागवड???
सुबाभूळ, गुलमोहर, सप्तपर्णी, असे झटपट वाढणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करायचे आणि चिमण्या सारख्या पाखरांना दाहीदिशा वनवास आणायचा. संस्कृती, परंपरेचा डांगोरा पिटत रह्याचे.
थोडे विषयांतर झाले. मुलाचे आणि आईचे नाते हा विषय होता.
जात, धरमदेव, परंपरा या मानवाने निर्माण केल्या आहेत. त्याची भीती बाळगू नये असं मुलगा आईला सांगू शकतो. पण आईला लगेच पटत नाही. तिची मानसिकता (त्यालाच म्हणतात निष्ठा) एवढी लवचिक नसते. वाद घालतो मुलगा. आधुनिक विचारांच्या मुलांची घुसमट होते. सण व्रते हे कसे थोतांड आहे. हे सांगताना नवीन पिढीची दमछाक होते. मग मुलगा म्हणतो, ” गढवापुढें वाचली गीता….”
मी माझ्या लेकसुनेला टिकली लावण्याबाबत सक्ती करत नाही. तिने मंगल सूत्र घातले की नाही याची चौकशी करत नाही. शिकल्या सवरल्या पोरींना कशाला अशी बंधने घालायची. कितीही शिकले , नोकरी केली, बिझनेस केला तरी त्यांना चूल मूल सुटत नाही. आणखी ही जोखडं त्यांच्या खांद्यावर का द्यावीत?
मेल्यावर आमचे म्हाळ वगैरे घालू नयेत असे मी मुलाला स्पष्ट सांगणार आहे. तेवढे मैत्रीचे नाते आहे आमच्यात. अशा गोष्टींवर वाद घालतो आम्ही.
© सौ. सावित्री जगदाळे
१८/९/१८
१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈