सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ फुंकर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो,  फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.

… फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.

☆ फुंकर … ☆

धनी निघाले शेतावरती

बांधून देण्या भाजी भाकर

चुलीत सारून चार लाकडे

निखार्‍यावरी घाली फुंकर।

माय जाणते दमले खेळून

बाळ भुकेले स्नानानंतर

बशी धरूनी दोन्ही हातानी

दुधावरती हळूच फुंकर।

कुसुम कोमल तान्हे बालक

चळवळ भारी करी निरंतर

ओठ मुडपुनी हसे, घालता

चेहर्‍यावरती हळूच फुंकर।

खेळ खेळता सहज अंगणी

डोळ्यात उडे धूळ कंकर

नाजूक हाते उघडून डोळा

सखी घालते हळूच फुंकर।

राधारमण मुरलीधर

धरूनी वेणु अधरावर

काढीतसे मधु मधूर सूर

अलगुजात मारून फुंकर।

किती दिसांचा वियोग साहे

रागेजली ती प्रिया नवथर

कशी लाजते पहा खरोखर

तिच्या बटांवर घालून फुंकर।

सीमेवरूनी घरधनी येता

अल्प मिळाला संग खरोखर

रात जाहली पुरेत गप्पा

दिवा मालवा मारून फुंकर।

संसारातील जखमा, चटके

सोसायाचे जगणे खडतर

सुसह्य होते कुणी घालता

सहानुभूतीची हळूच फुंकर।

अटल आहे भोग भोगणे

कुणी गेल्याचे दु:ख भयंकर

पाठीवरती हात फिरवूनi

दु:खावरती घाला फुंकर।

कितीक महिने गेले उलटून

मित्र भेटही नाही लवकर

मैत्रीवरची धूळ झटकुया

पुनर्भेटीची घालून फुंकर।

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments