डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराईलेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले

महिलादिनाबद्दल लिहायला घेतलं आणि ती आठवली !!!!!

मी तिला सांगितलं,तुझ्याबद्दल लिहायचं आहे. तर अंगभूत स्थितप्रज्ञतेने म्हणाली …… 

“ इतकं कौतुक आवश्यक आहे का? आणि जर करायचंच असेल तर माझ्या कामात मी एकटी नाही.  माझ्यासोबत माझा नवरा,शेखर आहे आणि या कामात आम्हा उभयतांचे विचार आणि कृती आहेत.”

तर….तिची आणि त्याची गोष्ट ऐका………

ती किलबिलीने उठते… तिनेच जपून वाढवलेला, मोठ्या केलेल्या झाडांवरचे पक्षी तिला उठवतात

कमीतकमी पाणी वापरून ती आन्हिक उरकते .. संततधारी नळ चालू न ठेवता. ती नेमक्या वेळी नेमकेच पाणी वापरते.

आंघोळीच्या वेळी ती साबण लावत नाही. वर्षानुवर्ष ती पाण्याचे रासायनिक प्रदूषण टाळून फक्त हळद-चणापीठ-तांदूळपीठ-मीठ वापरते आहे.

भांडी घासायचे,कपडे धुवायचे साबणही ती रसायनविरहित वापरते.

ती तशीच आहे…. अस्सल आणि  निर्विष. तिच्या घरातून बाहेर जाणारे सांडपाणीसुद्धा तसेच आहे …. 

अस्सल आणि निर्विष. तिचे सांडपाणी मुठेला अशुद्ध करत नाही. 

ती प्लास्टिक वापरत नाही आणि जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर आवर्जून करते.

तिच्या घरच्या ओल्या कचऱ्याचं काळ सोनं होतं…. काही काळाने त्या काळ्याचं-हिरवं होतं.

म्हणून तर तिच्या गच्चीत आणि परसात जादुई-हिरवी उधळण आहे, आणि हिरव्याने परिधान केलेली लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, केशरी रंगबरसात आहे. 

तिथेच फुलपाखरांच्या जन्मकहाण्या लिहिल्या जातात. मधमाश्या,भुंगे,चतुर आणि असंख्य पक्षी प्रणयाराधन करतात .. आणि तिच्या ऋणमुक्तीसाठी सकाळी गीत गातात. तिच्या गच्चीत मधमाश्यांच्या पेट्या तर असतातच, पण क्वचित बागेत सापही सापडतात. आलाच एखादा आगंतुक साप घरात, तर ती अविचल राहून situation handle करते …. झुरळ पाहून किंचाळणाऱ्या मला ती क्षणोक्षणी प्रभावित करते. 

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तिच्या घरात उन्हाळ्यातही पंखा लागत नाही. प्रशस्त खिडक्या आणि भोवतालची झाडं हीच तिची वातानुकूलित यंत्रणा असते.

स्त्री-मुक्तीच्या दांभिक कल्पनांना, ही मुक्ताई फाटा देते. उन्हाळ्यात ती पारंपारिक वाळवणं घालते

आणि घरच्या गच्चीतून मिळालेल्या हळदीचं लोणचंही घालते. लोणच्यापासून ते थेट जिलबीपर्यंत सगळं घरी करते. जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवते….. बागेतल्या वाळलेल्या फूलपाकळ्यांनी रांगोळीचे रंग बनवते.

गणपती उत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळासुद्धा घेते…..  

… आणि हे सारे काही करताना ती स्थितप्रज्ञ असते. आपण काही विशेष करतोय असा तिचा अभिनिवेश नसतो. तिचे श्वास, तिचे उच्छ्वास, तिचे शब्द, तिचं वावरणं… हे सगळं एखाद्या सुखदुःखापल्याड पोचलेल्या अभोगी योगिनीसारखे असते. ज्या निसर्गाच्या घरी आपण साठ-सत्तर वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलोय त्याला आपण माघारी जाताना काय काय देऊन जायचे ह्याचा तिचा सशक्त-विचार तयार आहे.

… म्हणून तर निवृत्तीपूर्वीच निवृत्त होऊन तिने च..क्क….चाळीस एकरांचं एक जंगल विकत घेतलं आहे..

जं..ग..ल….

त्या जंगलाला तिने प्राणपणाने जपलंय, वाढवलंय. तिथे आंबा-काजू अशी कोकण-स्पेशल लागवड नाही.

तिथे तिने निसर्गाला हवं-तसं,हवं-तेवढं वाढू दिलंय. छोट्या-मध्यम-महाकाय वेली, छोटी-मोठी झुडुपे,

छोटे-मध्यम-महाकाय वृक्ष …… 

सूक्ष्मकिड्यापासून ते फुलपाखरापर्यंत आणि  साळिंदरापासून ते गव्यापर्यंतचे सगळे प्राणी त्या जंगलाला आपलं-घर मानतात….. तो हिरवा-जंगल-सुगंध मी घेतलाय. तिथली ती शाश्वत शांतता.. तिथे साधलेला स्व-संवाद.. सृष्टीची खोल गाभ्यापर्यंत पोचलेली हाक मी ऐकली आहे.

तिने निसर्गाला घातलेल्या सादेला त्याने भरभरून दिलेलं हिरवगच्च प्रतीउत्तर मी त्या जंगलात पाहिलं आहे.

हे सगळं कल्पनेपलीकडचं आहे असं म्हणत आपण आपलंच खुजेपण कुरवाळत राहायचं का? ह्यातलं थोडतरी आपण करू शकतो का???

… शहरात राहणारी, उच्चविद्याविभूषित असलेली, कॉर्पोरेट महिला, एका जीवावर बेतलेल्या अपघातानंतर पुन्हा उभी राहून हे सगळ करत असेल तर आपण ‘आम्हाला नाही बुवा असलं काही जमणार’  हा मंत्र जपणार का? …. आपण तिच्यासारखा शाश्वत-वसा घेऊ शकतो का?? …. घ्यायची इच्छा तरी आहे का?? …. एखादी तरी कृती त्यादिशेने होईल का?…. 

… तिने चाळीस एकर जंगल जपलंय !!! मी दहा स्क्वेअरफुटात काही हिरवं लावेन का??

… मी प्लास्टिक वापरण सोडीन का??

… जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर करीन का??

…. पाणी कमीत कमी वापरून बघेन का???

… आठवड्यात दोन दिवस बिनासाबणाची आंघोळ नाक न मुरडता करेन का???

… मी निसर्गाचे देणे मानेन का???

… त्याची ऋणजाण पावलोपावली ठेवेन का???

… प्रश्नांची घुसळण मनात येते आणि… ते प्रश्न-काहूर माझ्या मनात आठ मार्च जवळ आला की जास्तच उधळतं. कारण तेव्हा मी शोधत असते…. ऑफिसच्या महिला-दिनाची पाहुणी.  पण ते कुठेही शोधायची गरज नसतेच.  

… कारण…ती जी कुणी आहे ना….  ती कायमच असते…….. माझ्या मनातल्या महिला-दिनाची पाहुणी..

जिचं नाव असतं …….. शिवांगी चंद्रशेखर दातार !!!!!!

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments