मनमंजुषेतून
☆ काही टाकायचे आहे पण टाकणार नाही… –– सुश्री योगिनी पाळंदे ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆
मधुचंद्रहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र ….. नाही नाही….ती..वाली रात्र नव्हे….
त्या रात्रीचा पहिला स्वैपाक……
शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.
(कोकणस्थ) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती
मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र….. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला …
मी लाजून चूर..मनाने कायशिशी मोहरून गेले… अजूनही आमचा माफक रोमान्स चालू होता ना.
माझे गाल लाल व्हायला लागले…. सॉरी…मी गोरी नाही..सबब..माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले !!
तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो साक्षात सासुमा… “ शेजारी गॅस चालू आहे ना,मग नवीन काडी कशाला पेटवली??”
त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले.
सासूमानी मला दुसरी काडेपेटी दाखवली, ज्यात जळलेल्या काड्या होत्या.. एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही.. जळलेल्या जुन्या काडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा.
आता कुकरचा अतीप्रशस्त-ओबेस देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा? …. मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्याखाली.. अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.
तोपर्यंत मी गॅसवर होते, कारण कर-कटेवरी घेऊन सासुमा माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या.
दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभेउभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली.
त्या लांबलांब-तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं…” हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेलं आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत.”…. आज मनात येतं, नवीन पिढीची सून असती तर त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोडसुद्धा घेतला असता.
सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वैपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती !!
चिंधीवालीकडे अंतर्वस्त्र विकली जातात हा ज्ञानसाक्षात्कार मला त्यांनीच घडवला. जुने परकर,ब्लाऊझ,साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वैपाकघरात होत असे.
घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला, हात पुसायला आणि स्वैपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे deputation पाय पुसणे म्हणून होत असे.
आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे. दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता…..त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं?
त्यात सासुमाच्या प्रभातफेरीतील पुष्पचौर्य-कथा लपलेल्या असत. जास्वंदीच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा कळीदार प्रवास त्या पिशवीतून होत असे… त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत… दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या दूधपिशवीच्या पालखीतूनच घरी येत. हनुमानजयंतीचा सुंठवडा त्यातूनच येई आणि….. रामा-शिवा-गोविंदा ह्या मानकऱ्यांचे प्रसादसुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.
त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत, तर एखादी फाटलेली पण खपवायची असलेली दहा रुपयांची नोटही असे…. कहर म्हणजे एकदा तर बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासुमांनी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.
जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची. आणि केवळ सासुमाच नव्हे तर तिच्या पिढीने हाच पुनर्वापरमंत्र जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडीवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची… अश्या कित्येक गोष्टी !!
चहाच्या कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे, त्याच क्रोकरी सेटच्या (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे… तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे… रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरणप्रेमाचे एकत्र नोबेल का बरं देऊ नये?
पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून एक्सपायरी डेटलेल्या सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासुमांचा तिळपापड होत असे… “वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली?आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.” एक्सपायरी डेट नसलेले अमर आयुर्वेदिक काढे त्यांना भारी प्रिय.
वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासूमांनी त्या कल्पनेची अम्मल बजावणी कितीतरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे. भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत… त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे कचरासंवर्धन केले.
लाकूड,प्लास्टिक,काच आणि कपड्यांचेच नव्हे, तर तव्यावरच्या उष्णतेचेसुद्धा रीसायकलिंग केले !!!
पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे काम नसेल तर क्वचित त्या तव्याचा शेक दुधाच्या पातेल्याला देणे. वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची-वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते.
भांड्याच्या बिळात लपलेले तूप गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांडं घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासुमांची पिढी आता राहिली नाही.
” काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही? सगळं फेकून द्या ” हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल. आणि त्या मंडळींनीही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल…. आम्हीही शोर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची,भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोरपणाने फेकली आहेत.
जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी…. पण वस्तू ,तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागतं, ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल, पण त्या विचाराचं आचरण मात्र आवर्जून केलं. ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच …. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्याशिवाय त्या पिढीतल्या कुणी मरणही पाहिले नाही. सासुमासुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.
आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसलं तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाही देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या,आणि अकाली टाकलेल्या वस्तूंसारखाच आमच्याही शरीराचा आणि आयुष्याचाही अकाली शेवट होईल आणि आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल असं वाटत राहतं.
लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे
संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈