सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

कतंच संवादु- अनुवादु पुस्तक हाती लागलं आणि भराभरा वाचत सुटले. पुस्तक प्रकाशित होऊन ५-६ वर्षे झाली पण माझ्या हातात पडेपर्यंत इतके दिवस गेले. त्याला कारणही माझ्या मर्यादाच होत्या. माझ्या आजारपणामुळे घराबाहेर पडता न येणं, नंतर करोनामुळे ग्रंथालये बंद असणं, तो संपेपर्यंत पुन्हा आजारपण, या सार्‍यातून तावून सुलाखून बाहेर पडेपर्यंत इतका काळ गेला.

सुप्रासिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे हे आत्मकथन. या पुस्तकाबद्दल मला उत्सुकता वाटण्याची दोन कारणे. पहिले म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कन्नड साहित्याचे मराठीत दर्जेदार अनुवाद केले आहेत. या पुस्तकाद्वारे, त्यांनी त्यांच्या अनुवादाची प्रक्रिया, अनुवादाच्या वेळचे अनुभव, त्या मागचे विचार- चिंतन उलगडून दाखवले असणार, याची खात्री होती. दुसरे कारण म्हणजे, उमाताई छुटपुटत्या काळापुरती माझी चुटपुट मैत्रीण होती. ही मैत्री एकमेकींना अगं-तुगं  म्हणण्याइतकी प्रगाढ होऊ शकली नाही, ही चुटपुट मनाला नेहमीच लागून राहिली. अजूनही रहाते. पण या चुटपुटत्या मैत्रिणीचं हे आत्मकथन, म्हणूनही मला या पुस्तकाविषयी कुतुहल होतं. ही चुटपुटती मैत्रीदेखील मी आपणहून तिच्याकडे जाऊन ओळख करून घेतली आणि तिला चिकटले, यातूनच झालेली.

त्याचं असं झालं –

साधारण १९९५ साल असेल. कोल्हापूरला प्रा. अ. रा. तोरो यांची एकदा भेट झाली. ते साहित्याचे उत्तम वाचक. कन्नड साहित्याचे जाणकार. मराठी- कन्नड स्नेहवर्धन चळवळीचे कार्यकर्ते. नुकतीच त्यावेळी मी ‘ डोंगराएवढा’ ही कादंबरी वाचली होती. मला ती खूप आवडली होती. अनुवादही. आणखीही उमाताईंनी केलेले अनुवाद वाचले होते. मग त्यांच्याबद्दल बोलणं झालं. मी म्हंटलं , ‘या लेखिकेची भेट व्हावी, असं अगदी मनापासून वाटतय.’ ते म्हणाले, ‘जरूर जा. तुम्हाला आवडेल त्यांच्याशी गप्पा मारायला!’ मग त्यांनी उमाताईंचा फोन नंबर दिला. त्यानंतर मी पुण्याला गेले, तेव्हा फोन करून उमाताईंकडे गेले. मनात म्हणत होते, ‘मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल, पण त्यांचं काय? त्या नामवंत लेखिका… ‘ पण आमचं छान जमलं. मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि मी त्यांना एकदा चिकटले ती चिकटलेच. पुण्यात गेले की त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारून यायचं हे ‘मस्ट’च झालं माझ्यासाठी. हा प्रत्यक्ष भेटीचा आणि गप्पांचा सिलसिला दोन –चार वर्षासाठीच फक्त टिकला. कारण नंतर माझं पुण्यात जाणं कमी झालं व आमच्या भेटी जवळ जवळ थांबल्याच.  म्हणून मी, ती माझी चुटपुट मैत्रीण म्हणाले. तर तिचं हे आत्मकथन. म्हणून मला विशेष उत्सुकता होती.

अनुवादित साहित्य मला वाचायला आवडतं. वेगळा प्रदेश, वेगळा परिसर, वेगळं लोकजीवन, त्यांची वेगळी विचारसरणी, वेगळी संस्कृती यांची माहिती त्यातून होते आणि एक वेगळाच आनंद मिळतो. उमाताईंची ओळख आणि मैत्री व्हावी, असं मला मनापासून वाटत होतं, त्याचं एक कारण त्या उत्तम अनुवादिका आहेत, हे होतं. वाचता वाचता मीही या क्षेत्रात थोडीशी लुडबूड केली होती. अजूनही करते आहे. मला ज्या कथा – कादंबर्‍या, लेख आवडले, त्यांचा मी अनुवाद केला. केवळ वाचण्यापेक्षा त्या साहित्यकृतीचा अनुवाद केला, तर ती जास्त चांगली समजते आणि त्यातून मिळणारा आनंदही अधीक असतो, असं मला वाटतं. उमाताईंनीही आपल्या पुस्तकात ही गोष्ट आवर्जून नमूद केलीय. ’मुकज्जी’चा अनुवाद त्यांनी ती कादंबरी स्वत:ला नीट कळावी, म्हणून केला होता. त्यातून त्यांना आपण चांगला  अनुवाद करू शकू, हा आत्मविश्वास मिळाला. पुढे त्यांनी कन्नड साहित्यातील अनेक दिग्गज लेखकांच्या निवडक साहित्याचा मराठीत अनुवाद केला आणि त्या नामांकित अनुवादिका झाल्या. अनुवादासाठी उत्तम पुस्तकाची निवड करणं, त्यातील आशय समजावून देणं, अनुवादाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार करणं, हा सारा व्याप विरुपाक्षांनी केला. एवढंच नाही, तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची अनुवादाची प्रक्रिया मी ऐकली, तेव्हा तर मी चक्रावूनच गेले. त्या म्हणाल्या, त्यांना कन्नड वाचताच येत नाही. फक्त समजतं. लिपी येत नाही. त्यांच्यासाठी विरुपाक्ष पुस्तकाचं एकेक प्रकरण टेप रेकॉर्डवर वाचतात. नंतर सावकाशपाणे सवडीने ते ऐकत उमाताई त्याचा मराठीत अनुवाद करतात. थोडक्यात काय, तर स्वैपाकाची अशी सगळी सिद्धता विरुपाक्षांनी केल्यावर प्रत्यक्ष रांधण्याचे काम मात्र उमाताई करतात.  संसारा-व्यवहाराप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचे सहजीवन चालू आहे. पुढे गप्पा मारता मारता असंही कळलं, विरूपाक्षांनीही मराठीतील निवडक पुस्तकांचे, लेखांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत. त्यात सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’, सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’, ही पुस्तके आहेत. काही लेखही आहेत. ‘संवादु… ‘ वाचताना कळलं, त्यांची २५ अनुवादीत पुस्तके कन्नडमध्ये प्रकाशित झाली आहेत. उमाताईंची पुस्तके साठीच्या उंबरठ्यावर आहेत.  

उमाताईंनीही आपल्या पुस्तकात, आपण भावानुवाद करत असल्याचे सांगून त्याबद्दलचे विश्लेषण अनेक अनुभव देऊन केले आहे. त्या अनुवादासाठी पुस्तकाची निवड, अनुवादाच्या पुस्तकाचा, आशय, वातावरण, लेखकाची शैली आशा विविध अंगांनी सखोल विचार करतात, हे त्यांनी जागोजागी केलेल्या विवेचनावरून दिसते. सुरुवातीचा काळात पुस्तकाच्या अनुवादाचे, आपण पाच- सहा खर्डे काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे दोन –तीन खर्ड्यांवर काम भागू लागले. त्यांच्या या परिश्रमतूनच त्यांची पुस्तके अधिकाधिक परिपूर्ण आणि समाधान देणारी झाली आहेत. 

संवादु…. अनुवादु’ वाचता वाचता मी त्यांना एकदा फोनवर म्हंटलं, ‘अनुवादाच्या कार्यामुळे तुम्ही खूप श्रीमंत झालात, नाही का?’ त्या म्हणाल्या, ‘हो. अगदी बरोबर!’ अनुवादामुळे त्यांची शिवराम कारंत, भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, अनंतमूर्ती, वैदेही अशा मोठमोठ्या साहित्यिकांशी ओळख झाली. जवळीक जुळली. सहवास लाभला. त्यांच्याशी चर्चा करत स्वत:ला अजमावून पाहता आलं. शिवराम कारंत, भैरप्पा यांच्याविषयी तर त्यांनी अगदी भरभरून लिहिले आहे. अनेक प्रसंग, अनेक अनुभव त्यांनी यात दिले आहेत. एकदा शिवराम कारंत पुणे विद्यापीठात चर्चासत्रासाठी आलेले असताना त्यांच्याकडे उतरायला आले, त्यावेळी त्यांना झालेल्या अपरिमित आनंदाचे वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे. ते वाचून मला आठवलं, सांगलीत अनुवादावरच्या एका चर्चासत्रासाठी उमाताई आल्या होत्या , तेव्हा त्या माझ्याकडे उतरल्या होत्या. मी त्यांना फोनवर म्हंटलं, ‘ कारंतांच्या येण्याने तुम्हाला झालेला आनंद आणि तुम्ही माझ्याकडे येण्याने मला झालेला आनंद एकाच जातीचा आहे.’ त्यावेळी फोनवरून ऐकलेलं त्यांचं हसणं, मला प्रत्यक्ष पहाते, असं वाटत राहीलं.

अनुवादामुळे त्यांचे केवळ कन्नड साहित्यिकांशीच स्नेहबंध जुळले, असं नाही तर मराठी साहित्यिकही त्यांचे आत्मीय झाले. डॉ. निशिकांत श्रोत्री, डॉ. द.दी. पुंडे त्यांच्या गुरुस्थानीच होते. पु.ल.देशपांडे, अनिल अवचट, प्रभाकर पाध्ये, कमल देसाई अशी अनेक मंडळी  त्यांच्या अंतर्वर्तुळात होती. त्यांच्याही अनेक हृद्य आठवणी यात आहेत.

कमलताई देसाईंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सांगलीत एक कार्यक्रम करायचे ठरले. या कार्यक्रमाला उमाताई आल्या होत्या. त्या भेटल्या. पण नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्या नाहीत. ‘नवीन काय’ एवढंच विचारणं झालं. उत्तर देणं आणि ऐकणं, त्या भरगच्च कार्यक्रमात होऊ शकलं नाही. घरी येणं वगैरे तर दूरचीच गोष्ट.  कार्यक्रम अतिशय हृद्य झाला.

पुन्हा एकदा डॉ. तारा भावाळकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सांगलीत आल्या होत्या. तेव्हाही असाच, व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असा भरगच्च आणि संस्मरणीय कार्यक्रम झाला होता. तेव्हाही उमाताई भेटल्या. पण याही वेळी नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्याच नाहीतच.  त्यानंतर म. द. हातकणंगलेकरसरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्याख्यान द्यायला उमाताई सांगलीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही एका दालनात लावलेले होते. इथेही व्याख्यातीभोवती वाचकांचा गराडा असल्याने आमचं बोलणं नाहीच होऊ शकलं. अशा त्यांच्या चुटपुट लावणार्‍या भेटी होत गेल्या. त्या भेटत राहिल्या पुस्तकातून. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या बातम्यातून.

शिवराम कारंत आणि भैरप्पा म्हणजे त्यांच्या ‘मर्मबंधातली ठेव.’ विविध प्रसंगातील त्यांच्या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी पुस्तकात दिल्या आहेत. त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक व्यक्तींबद्दल त्यांनी अगदी मनापासून लिहिले आहे, अगदी आपल्या कामवाल्यांबद्दलसुद्धा त्यांनी प्रेमाने लिहिले आहे.

उमाताईंच्या अनुवादामध्ये कारंतांचे ‘डोंगराएवढा’, ‘तनामनाच्या भोवर्‍यात’, भैरप्पांचे ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘काठ’, ‘तंतू’, पूर्णचंद्र तेजस्वींचे, ‘कार्वालो’,, गूढ माणसं’, ‘चिदंबररहस्य’, गिरीश कार्नाडांचे, ‘नागमंडल’, ‘तलेदंड’ अशी अनेक महत्वाची पुस्तके आहेत. किंबहुना त्यांनी महत्वाच्या वाटणार्‍या पुस्तकांचेच अनुवाद केले आहेत. साहित्य अ‍ॅकॅडमीने अनुवादीत पुस्तकांना पुरस्कार द्यायचे ठरवले आणि पाहिला पुरस्कार उमाताईंना मिळाला. ‘वंशवृक्ष’ या भैरप्पांच्या कन्नड कादंबरीच्या अनुवादासाठी १९८९साली त्यांना तो मिळाला होता. नंतर त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे ग्रंथालयाचा ‘वर्धापन पुरस्कार’, महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष पुरस्कार, ‘वरदराज आद्य पुरस्कार ( मराठी व कन्नड समाजातले साहित्यिक- सामाजिक बंधुत्व वाढवण्यास हातभार लावल्याबद्दल ), आपटे वचन मंदिरचा म. बा. जाधव पुरस्कार ( पारखासाठी), स.ह. मोडक पुरस्कार (पर्वसाठी) इ. अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले.

क्रमश: – भाग १

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments