सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

तुमच्याबाबतीत असं कधी घडलं आहे का, की आपण आवर्जून एखादं पुस्तक वाचायला घेतो. बसल्या बैठकीत वाचून काढायचं असं पण मनाशी ठरवतो. उत्साहात १००-१५० पानंसुद्धा वाचून झालेली असतात. मध्येच काही कारणाने खंड पडतो आणि तेवढ्यातच दुसरं एखादं नवीन आपणच मागवलेलं पुस्तक आपल्या पुढ्यात येतं. झालं! आता नवीन पुस्तकानं आपलं मन वेधलेलं असतं. त्यात काय असेल ते वाचण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसते. मन अगदी उतावीळ होतं‌. मन काय आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायला तयारच असतं. लगेच बहाणा शोधतं.‌ आता या पुस्तकात इतकं वाचून झालंय तर थोडा ब्रेक घेऊया म्हणजे पुढचं वाचताना नवं काही सापडेल का ते पाहता येईल, त्याच्यावर चिंतन करता येईल. आणि मग परिचय लिहिताना आपल्याला काही अवांतर मुद्दे सुचतील. सतत एकाच विचारानंं सगळं वाचण्यानं, वाचताना पण मोनोटोनस झाल्यासारखं वाटतं. तसं न वाटता प्रत्येक पान फ्रेश विचारातून वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे मग पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने उमगेल वगैरे वगैरे. 

असा विचार करून पुढ्यात आलेलं नवं पुस्तक थोडं वाचूया म्हणून ते उत्साहाने हातात घेतलं जातं. पाहता पाहता आपण त्याच्यामध्ये रमून जातो. त्याचीही शंभर एक पानं होतात. आपण ठरवलेलं टार्गेट बऱ्यापैकी पूर्ण करत आलेलो असतो पण ते ठरवलेल्या पुस्तकाबाबत नव्हे. कालांतराने दोन्ही पुस्तकं सारखीच प्रिय होतात आणि मग कुठलं पूर्ण करावं यावर मनात द्वंद्व सुरू होतं. 

पहिल्या पुस्तकातल्या एखाद्या पात्रानं मनावर पकड घेतलेली असते आणि त्याचवेळी दुसऱ्या पुस्तकातल्याही एखाद्या पात्रानं मनावर पकड घ्यायला सुरुवात केलेली असते. आता मनाच्या आणि पात्रांच्या आपसातल्या युद्धात कुठलं पुस्तक विजयी ठरणार हे आपल्याला समजत नसतं. अशावेळी नाईलाजानं जास्त ताण घेऊयात नको म्हणून दोन्हीही पुस्तक बाजूला ठेवली जातात. आणि या आधीच वाचून काढलेलं ज्याच्यावर चिंतन, मनन वगैरे सगळं करून झालं आहे असं तिसरंच पुस्तक आपण हाती घेतो. 

पण आता हे तिसरं पुस्तक वाचताना आपलं मन त्याच्यात अजिबात गुंतलेलं नसतं. आधीच्या दोन्ही पुस्तकांतली आपल्याला आवडलेली दोन्ही पात्रं या तिसऱ्याच पुस्तकात मध्येच डोकावत असतात आणि आपली स्वतःची वेगळीच गोष्ट घुसडण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात आल्यावर आपण ते तिसरं पुस्तक निमूटपणे बाजूला ठेवतो. 

या सगळ्या गडबडीत दिवस संपून जातो. खरी मजा  झोपताना येते. आपल्या दोन्ही अर्धवट राहिलेल्या पुस्तकांची कथा आता सतावत असते. एखाद्या पात्राचा उत्कंठावर्धक प्रवास तर दुसऱ्या पात्राचा गुढ प्रवास उलगडायचा राहिलेला असतो. एखाद्याचा तरी प्रवास पुढे नेऊयात म्हणून आपण अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी ते पुस्तक दामटून वाचायला घेतो. वाचता वाचता दोन्ही पुस्तकातली पात्रं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये घुसून आपली तिसरीच गोष्ट निर्माण करतात. 

‘टार्गेट असद शाह’ आणि ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या दोन पुस्तकांतील पात्रं एकमेकांच्या दुनियेत शिरली आणि त्यांनी प्रचंड धमाल केली. टार्गेट असद शाह मधल्या कबीरनं ‘मायसेलियम’ म्हणजे झाडांच्या बुरशीच्या जाळ्याच्या सहाय्यानं इंटरनेटवरून गम्बोला अरबाज़च्या ठिकाणाविषयी माहिती दिली. आणि त्याला पाइनच्या जंगलात पकडलं. अरबाज़ जंगलात आला तेव्हा जंगलातल्या सर्व वृक्षांनी एक विषारी वायू जंगलात सोडला आणि त्यामुळे तिथे लपलेल्या कवचकुंडलच्या आर्मी ऑफिसर्सना त्याचा पत्ता लागला. असं बऱ्यापैकी भन्नाट कथानक तयार झाल्यावर आपण गुंगीत असलो तरी नंतर लक्षात येतं आपण काहीतरी भलतंच वाचतोय आपल्याला जे वाचायचंय ते हे नाही. अजून एक दोनदा प्रयत्न केला जातो पण तसंच घडायला लागल्यावर मग निमुटपणे हातातलं पुस्तक बाजूला ठेवून दिलं जातं आणि आपण झोपेच्या स्वाधीन होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी आपल्या टेबलवर पडलेली ती दोन पुस्तकं आपलं टार्गेट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे अतिशय आशेने पाहत असतात आणि त्यावेळी पुन्हा मनात आज यापैकी कुठलं निवडावं याचं द्वंद्व सुरू होतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments