डॉ.सोनिया कस्तुरे
मनमंजुषेतून
☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
संक्रांतीनिमित्त पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरे केले जातीत. पण हळदीकुंकू समारंभाच्या या दुसऱ्या बाजूचा विचार कधी केलाय का? ‘हळदीकुंकू हे स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे, असं मला वाटतं. काळानुरूप विचारही बदलला पाहिजे’, हे सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ —
माझा हळदीकुंकू या संकल्पनेला विरोध आहे. विचार करायला लागल्यानंतर मी हळदीकुंकू बंद केलं. अनेकदा विचारलं जातं की, ही परंपरा स्त्रिया का चालू ठेवतात?
पुरुषांच्या व्यवस्थेने जे जे सांगितलं ते ते सर्व माझ्यासकट सगळ्यांनी पूर्वीपासून स्वीकारलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हळदीकुंकू हा पुरुषांसाठीच स्त्रियांनी केलेला पारंपरिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पुरुष आहेत. हे म्हणजे चोराच्या हाती जामदारखानाच्या किल्ल्या देण्यासारखा प्रकार आहे. हळदीकुंकू करायचं स्त्रियांनी आणि समाजातलं स्थान बळकट होणार ते पुरुषांचं.
हळदीकुंकवाच्या सणात फक्त सौभाग्यवतीला मान असतो. काही भारतीय संस्कारांमध्ये किंवा कर्मकांडांमध्ये स्त्री ही सौभाग्यवती आणि अपत्यवती असणं आवश्यक असतं. त्यातही मुलगा असेल तर ती तिथे सर्वांत श्रेष्ठ असते.
स्त्री सौभाग्यवती आणि अपत्यवती असण्याचे जे काही रूढ निकष आहेत त्यात तिचं ‘अस्तित्व’ महत्त्वाचं नाही. तिचं अस्तित्व दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. तिला नवरा असला पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यापासून मूल असलं पाहिजे. हे हळदीकुंकू परंपरेचे निकष आहेत.
नवऱ्याशिवाय ओळख का नाही?
हळदीकुंकवात कोण सौभाग्यवती, कोण विधवा, कोण परित्यक्ता, कोण ‘टाकलेली’, कोण अविवाहित असे जे भेद केले जातात त्याला माझा विरोध आहे. त्यातही अविवाहितांमध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया मोडतात. ज्यांना स्वखुशीने लग्न करायचं नाही अशा आणि ज्यांना लग्न करायचं आहे पण अजून झालं नाही अशा. या सर्वांना हळदीकुंकू परंपरा नाकारते.
ज्या स्त्रियांच्या आयुष्यात ‘नवरा’ नावाचा पुरुष नाही त्यांची काहीच ओळख नाही का? हळदीकुंकू या परंपरेच्या व्याख्येत तिची स्वतंत्र ओळख नाही. नवऱ्याच्या ओळखीवरून आणि नवरा असल्यानेच ती ओळखली जाणार, हे अयोग्य आहे. स्त्रियांना न्याय देणारं नाही.
अनेकदा स्त्रियांची ओळख करून देताना अमूक अमूक यांच्या सौभाग्यवती किंवा श्रीमती अशी ओळख करून देतात. याविषयी मी अनेकदा व्यासपीठावर बोलले आहे. एखाद्या स्त्रिला व्यासपीठावर बोलावताना तिचं म्हणणं ऐकायचं म्हणून बोलवता मग ती सौभाग्यवती, श्रीमती किंवा कुमारी असली तर काय फरक पडतो? तुम्ही माझ्यासोबतच्या पुरुषांना विचारता का? तुम्ही विवाहित आहात का, मुलं आहेत का? हे प्रश्न पुरुषांना विचारले जात नसतील तर स्त्रीला का विचारावेत?
बाईची ओळख नवऱ्याच्या ओळखीपलीकडेही असावी.
मी पूर्वी हळदीकुंकवाला जात असे. वयाच्या साधारण पस्तीशीपर्यंत मी व्रतवैकल्यं, पूजा, मंगळागौर या सगळ्या रूढी परंपरा पाळल्या आहेत. मध्यमवर्गीय पारंपरिक चौकटीत जगत असताना मीही त्यात चक्क रमले आणि डुंबले होते. पण मी जसजशी विचार करायला लागले, तसं त्यातली व्यर्थता आणि निरर्थकता माझ्या लक्षात आली. आणि मी हळदीकुंकू करायचं बंद केलं.
बदलाचं पाऊल
मी तसा विचार करणारा ‘माणूस’ कधीच नव्हते. म्हणूनच जरा उशीर झाला. बाहेरच्या जगाची ओळख झाली. वाचायला लागले. मित्रमैत्रिणींशी संवाद व्हायला लागला. आणि मग प्रश्न पडायला लागले. आपण काय करतोय याचं भानही आलं. असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच आपण बदलाचं एक पाऊल पुढे टाकतो.
मला एक हळदीकुंकू पक्क आठवतंय. पन्नास वर्षं झाली असतील. तेव्हा माझी मुलगी लहान होती. मुलीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या आईची ओळख होण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं होतं. पण रूढार्थाने ते हळदीकुंकू नव्हतं. तर तिळगुळ समारंभ होता.
हळदीकुंकवाऐवजी तिळगुळ समारंभ
तरीही मला वाटतं हळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभाचा उत्सव झाला पाहिजे. पण त्यातलं कर्मकांड बाजूला काढू या. स्त्रियांच्या मनात रूढ झालेली कर्मकांडाची प्रथा म्हणून असलेलं त्याचं स्वरूप बदललं पाहिजे.
मकरसंक्रांतीचं जसं हळदीकुंकू असतं तसं चैत्रगौरी, वटसावित्री, मंगळागौरीच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. किती छान संधी आहे ही. मला असं वाटतं की, सणाच्या निमित्ताने स्त्रियांशी संवाद साधला पाहिजे.
सगळंच वाईट नाही, पण…
आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे सण योजणं ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आणि कल्पक अशी गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे सणाला, परंपरांना नावं ठेऊन चालत नाही तर त्यातील पर्याय शोधावे लागतात.
ज्येष्ठागौरीचं नवं रूप – वसंतोत्सव
गेली दहा बारा वर्षं मी वसंतोत्सवाचं बोलावणं करते. माझ्या काही मित्र-मैत्रिणींसाठी अगदी छोट्या स्वरूपात एक समारंभ करते. जेष्ठागौरीला दिलेलं हे वेगळं रूप आहे. या मोसमात कैऱ्या आलेल्या असतात. त्यामुळे पन्हं देता येतं. आंब्याची डाळ करते. फळं, फुलं सोबतीला असतात. बदलत्या ऋतूचा आस्वाद घेत वसंतोत्सवाच्या निमित्ताने गप्पाही रंगतात. मग हळदीकुंकवाचा प्रश्नच राहात नाही.
जुन्या धाग्याला नवं रूप
अशा प्रकारे लोकांना भेटण्याचं माध्यम तयार केलं, तर आपण संस्कृतीचा धागाही पुढे नेतो आणि सण अधिक व्यापक स्वरूपात करतो. लोकामंध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सर्वांत आवश्यक गोष्ट असते ती- संस्कृतीतला जुना धागा घ्यायचा आणि त्याला नवं रूप द्यायचं. याच दृष्टीने हळदीकुंकवाकडे बघावं, असं मला वाटतं आणि या निमित्ताने स्त्रियांशी बोललं जावं.
लग्न झाल्यावर मुली हल्ली नावं बदलत नाहीत, हे स्वागतार्ह आहे. पण हळदीकुंकू का करायचं, हे त्या स्वतःला विचारत नाहीत. टिकल्या आणि कुंकवाला माझा विरोध नाही. त्यामागे विचार दिसत नाहीत.
आधुनिक विचार फार कमी लोकांच्या मनात रुजतो. मला माहीत आहे की, विचार करणारी माणसं कमी असतात आणि बहुसंख्य समाजाचा चालत आलेल्या परंपरा पुढे चालू ठेवण्याकडेच कल असतो. कारण त्यात त्यांना सुरक्षितता वाटत असते.
जुन्या मूल्यांचा देखावा
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हळदीकुंकवासारख्या सणाच्या निमित्ताने अधिक जाणवतो. जागतिकीकरणानंतर लोकांची मानसिक अवस्था आणि मूल्यव्यवस्था बदलून गेली आहे. सगळीकडे बाह्य आवरणामधली अस्थिरता आहे. त्यामुळे जुनी जी मूल्य होती ती देखाव्याच्या स्वरूपात जाणवतात.
उदाहरणार्थ, लग्न एकदाच करतो असं म्हणत आई-वडील, मुलं- मुली वारेमाप खर्चाचा आग्रह धरतात. 25 हजारांची शेरवानी, पैठणी खरेदी करतात. भपकेबाजपणाचं त्यांना आकर्षण वाटत असतं. थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मूल्यसंस्कृतीला धक्का बसलाय. संस्कृतीचा जो गाभा होता त्याला स्पर्शही करायचा नाही, पण वरवर दिसेल अशी संस्कृती जपायची, देखावा करायचा. हा विरोधाभास आहे.
हळदीकुकवाचं राजकारण
त्यात राजकीय प्रचारासाठी स्त्रियांचा वापर होणं, यात नवल नाही. हळदीकुंकवाचे कार्यक्रम आज राजकीय अजेंडा राबवताना दिसतात. या राजकीय पुढाऱ्यांना फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार पचणारा नाही.
मंदिरप्रवेशावर गेल्या वर्षी चर्चा होत असताना एक राजकीय महिला पुढारी म्हणाली, ‘महिलांना मंदिरात प्रवेश नसेल तर ती जुनी परंपरा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे.’ तेव्हा मी जाहीरपण म्हटलं होतं- कित्येक वर्षं स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाकारला गेला होता. पण तुम्ही परंपरा मोडलीच ना.
भेदाभेद नसणारा सण हवा
याचाच अर्थ असा की काही परंपरा लोकानुनयासाठी दाखवायच्या आणि काही सोयीने मोडायच्या. हा परंपरांच्या बाबतीतला विरोधाभासच आहे.
समतेचा विचार मानणाऱ्यांनी महिलांचा मेळावा घ्यावा. त्यात विधवांनाही सहभागी करून घ्यावं. हा विचार सोपा नाही. पंरपरेच्या विरोधातला आहे. मी अनेक मंडळांमध्ये भेदाभेद नको म्हणून आवाहन करते. पारंपरिक हळदीकुंकू नको पण मकरसंक्रांतीचा भेदाभेद नसणारा सण-समारंभ हवा.
लेखिका : सुश्री विद्या बाळ.
(विद्या बाळ या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी बीबीसी मराठीसाठी हा लेख लिहिला होता.)
संग्राहिका : डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈