डॉ. स्वप्ना लांडे

परिचय 

पीएच.डी. – “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निबंधांतील स्त्रीविषयक चिंतनाचा तौलनिक अभ्यास”

अधिव्याख्याता – य. च. मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र एल.आर.टी. कॉलेज अकोला

सचीव – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मंगरूळपीर,जि.वाशिम

स्थानिक तक्रार समिती अध्यक्षा – (कामाच्या ठिकाणी स्त्रियांची होणारी लैंगिक छळवणूक कायदा २०१३)

स्तंभलेखिका – दै.मातृभूमि २०१९-२०

विभागीय महिला संपर्क प्रमुख – (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

लेखन- अनेक दिवाळी अंकांमध्ये तसेच शैक्षणिक मासिकांत लेखन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘लढा ‘ हे मुखपत्र असलेल्या मासिकात एक वर्ष लेखन.  अकोला आकाशवाणीवर मुलाखती आणि व्याख्याने.स्त्री सक्षमीकरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्याने,गेल्या पाच वर्षांपासून ग्रंथोत्सवात वक्ता म्हणून सहभाग.महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यावर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने,अनेक वृत्तपत्रांत प्रासंगिक लेखन, मासिके यांत लेखन.

? मनमंजुषेतून ?

☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆ 

“भिमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे”

असं वामनदादा कर्डक म्हणून गेलेत. दि. १४ एप्रिल १८९२ रोजी क्षितीजावरील लाली एक निराळाच संदेश घेऊन आली. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, मानववंश शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धर्मशास्त्रज्ञ, समाज क्रांतिकारक …. आणखी काय अन् किती सांगावं! 

या सर्वांसोबत आणखी महत्त्वाचं …. ‘ बा भिमा! तू समस्त स्त्री वर्गाची माऊली आहेस. इतकं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं इतक्या छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यावं लेकीच्या ! इतके सन्मानाचे जिणे  बहाल करावे ! सारं विस्मयकारकच … !  केवळ आईच करू शकते हे. जशी एखादी पुरोगामी आई लेकीला विचारांचे धन देते ना, छान समजाऊन पण सांगते, अगदी तस्सं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब लग्न झालेल्या आपल्या लेकींना सांगतात, ” लग्नानंतर पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे, ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये.”  लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामाप्रमाणे वागविल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल, त्यावेळी तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे, हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलांच्या संगोपनाचा भार स्त्रीलाच होतो. तेव्हा मुले केव्हा आणि किती होऊ द्यावयाची हा निर्णय तिचाच असला पाहिजे. राष्ट्र संकल्पनेचे आधुनिक प्रारूप घडवायचे तर स्त्रियांनाही समान अधिकार, आर्थिक सक्षमता आणि वेळ आल्यास कुटुंब नावाची रचना जाचक ठरू लागल्यास विभक्त होण्याचे अधिकार असणे गरजेचे आहे, असे बाबासाहेब म्हणत. स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात, हे बाबासाहेबांनी हेरले होते. म्हणूनच “मुलींची लग्ने लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका.” तसेच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा मुलींना अधिकार असावा असे ते म्हणत.

भारतीय स्त्री हजारो वर्षे अज्ञान दारिद्र्य, देवभोळेपणा ,अंधश्रद्धा यांच्या दुष्टचक्रात अडकलेली होती. स्त्रीला माणूस म्हणून जगता यावं याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले. मनुस्मृती नावाचे अधर्मशास्त्र जाळून, मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातीची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद , त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे मग ते आपोआप बंड करतील, या आंबेडकरांच्या विधानातील गृहीत हे सबंध मानवमुक्तीच्या सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत तत्त्व होते. जोवर या देशातील प्रत्येक व्यक्ती ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त करू शकत नाही, तोवर या देशात एकात्मता निर्माण होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच या देशातील स्त्रीला तिच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन, देशाच्या विकासात तिचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे भारतीयांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब म्हणतात, “आईबाप मुलाला जन्म देतात कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही. आईबाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर, आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.

मनुस्मृतीने चातुर्वर्ण्याची निर्मिती करून माणसामाणसांमध्ये उच्च-नीचतेचे बीज पेरले. स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीने अतिशय कठोर कायदे केले होते. त्यामुळे तिला जगणेही असे झाले होते. मनुस्मृतीने स्त्रियांच्या बाबतीत घेतलेली भूमिका कमालीच्या असंस्कृतपणाची आहे. धर्म कोणताही असो पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. परंतु स्त्रीच्या प्रगतीवर मानव जातीचे हित अवलंबून आहे, हे बाबासाहेबांना माहीत होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणसिंग फुंकले. रमाईंना पाठविलेल्या एका पत्रात ते म्हणतात, “स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे.” दिनांक २७ डिसेंबर १९२७च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस जवळजवळ पाच हजार स्त्रियांची सभा बाबासाहेबांनी घेतली होती. स्त्री व पुरुष यांनी मिळून समाजाच्या, संसाराच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पडण्यास त्यांना फार अवधी लागेल. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले, तर त्यांना त्या कामात लवकर यश प्राप्त होईल. याच सभेत बाबासाहेबांनी दलित स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल प्रबोधन केले. मुला-मुलींना शिक्षण देण्यास सांगितले. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर दिला. दि. २० जुलै १९४२ साली नागपूरला दलित स्त्रियांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत वीस पंचवीस हजार स्त्रिया उपस्थित पाहून बाबासाहेबांना आनंद झाला. ते म्हणाले “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो.”

परंपरागत कायद्यांनी अमानुष परंपरांनी जखडलेली स्त्री बाबासाहेबांनी संविधानात विकासाचे स्थान दिल्याबरोबर शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अभेद्य असे एक सुरक्षा कवच तयार केले. ते म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करीत जाणे होय आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रासाद बांधल्यासारखे होय. हिंदू सहितेला मी हे महत्त्व देतो. बाबासाहेबांनी हे उद्गार हिंदू कोड बिलाच्या मसुद्यावरील सर्वसाधारण चर्चेच्या वेळी काढलेले आहेत. हिंदू कायद्याच्या संहितीकरणाविषयीच्या विधेयकाला बाबासाहेबांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण त्यायोगे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून त्या अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता. या कायद्याला बराच विरोध झाल्याने बाबासाहेबांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. आज स्त्रीला घटस्फोटानंतर कायद्याने  स्त्रीधन वापस मिळते, वारसाहक्काने संपत्तीचा हिस्साही मिळतो. तिच्या जीवनाला एक प्रकारचे बाबासाहेबांनी स्थैर्य करुन दिले. पण बहुजन स्त्री काय करते? देवाच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचा काही भाग  देवाच्या पेटीत देणगी म्हणून टाकते. पण ज्या पित्याने  आपल्या प्रकृतीची चिंता न करता, आपल्या सर्व लेकींसाठी अहोरात्र झटून कायदा केला, प्रसंगी मनस्तापही सहन केला. हिंदू कोड बिल संपूर्ण मान्य केले नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा बहुजन स्त्रीला विसर पडावा ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती ! आज जेव्हा मी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे पाहते, अनेकींचे संसार चांगल्या रीतीने फुललेले पाहते, तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी डोळ्यांत अश्रू गर्दी करतात आणि नकळत मी नतमस्तक होते.”बा भिमा! कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळयांतले पाणी नव्याने वहावे.”

©  डॉ. स्वप्ना लांडे

अकोला. 

मो ७५०७५८११४४. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments