सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ इंद्रधनुष्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
उन्हाळ्याचे दिवस ! काही दिवस अशा कडक उन्हाचे संपल्यावर वळिवाची चाहूल लागली. एकदम अंधारूनच आले, आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला ! आला आला तो पाऊस म्हणेपर्यंत बाहेर टप टप गारांची बरसात होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र गारांनी अंगण भरले. किती वेचू असं मनाला झालं !
उन्हाळ्यातला पहिला पाऊस ! तापलेली तृषार्त जमीन पाणी पिऊन घेत होती ! मातीचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. अंगणात छोटी मुले मस्त भिजून गारा वेचत आनंदाने बागडत होती. ते पाहून आपण उगीचच मोठे झालो असं वाटत होतं ! हवेतला लोभस गारवा खूपच सुखद होता. अर्ध्या पाऊण तासात सगळं वातावरण बदलून गेले. अशी हवा पडली की, मला गच्चीत जाऊन त्या निसर्गाकडे बघत राहावं असं वाटे !
आकाशाकडे पाहिलं आणि मस्तपैकी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर दिसू लागले ! सहज मनात आलं आणि आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे दिसू लागले. आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे इंद्रधनुचा एक एक रंग आहे. पावसाच्या थेंबावर सूर्याचे किरण पडले की आकाशाच्या पटलावर आपल्याला इंद्रधनुष्य दिसते ,तसेच आयुष्याच्या या टप्प्यावर मला भूतकाळ इंद्रधनुष्यातील रंगांसारखा दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आपल्या अवस्था इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या वाटतात…
ता – तान्हेपण, जन्माला आलेल्या बाळाचा तांबूस वर्ण आयुष्याची सुरुवात दाखवतो.
ना – नेणतेपण, छोटे बाळ आपल्या पायावर उभे राहते.. बोबडे बोल बोलू लागते पण ते अजाण असते. नुकत्याच उगवलेल्या बाल रवी सारखे त्याचे दिसणे असते!
पि – पौगंडावस्था, साधारणपणे आठ ते पंधरा वयातील मुले जी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात.. अजून कळीचे फुल व्हायचे असते. जीवनाविषयी प्रचंड कुतूहल दाखवणारी जिज्ञासू वृत्ती या वयात असते..
हि – हिरवेपणा, हे तर सुजनाचे, तारुण्याचे प्रतीक! प्रत्येकाचा हा काळ नवनिर्मितीचा, पूर्णत्वाकडे नेणारा काळ असतो. आयुष्यातील कर्तृत्वाचा हा काळ माणसाला सर्वात जास्त आवडतो.
नि – तारुण्याचा जोश उतरू लागतो आणि जाणीव होते ती निवृत्तीची! एकंदर आयुष्याचा विचार केला तर हा प्रवास उतारा कडे नेणारा असतो..
पा – वाढत्या वयाची दृश्य खूण म्हणजे पांढरे केस! ते आपल्याला जाणवून देतात की किती पावसाळे पाहिले आपण! अनुभवाच्या संचिताची शिदोरी घेऊन ही वृद्धत्वाकडे वाटचाल चालू असते.
जा – जाता जीव शेवटी शिवाकडे विलीन होणार या सत्याची जाणीव होते आणि तो खऱ्या अर्थाने जन्म ते मृत्यूपर्यंतच्या दीर्घ प्रवासाचा आढावा घेतो.
अशा या इंद्रधनुष्यी जीवनात आपण कालक्रमणा करीत असतो. प्रत्येक अवस्था तितकीच महत्त्वाची आणि मोहक असते. जीवनाचा आस्वाद घेत हा मनुष्य जन्म चांगल्या कामासाठी व्यतीत करून पुन्हा अनंतात विलीन करणे हेच त्या इंद्रधनुष्याचे काम ! त्याची वक्रता जीवन क्रम दाखवते. लहानपणापासून ते मध्यापर्यंत वाढत जाणारी ही कमान उतरत्या क्रमाने जाते, ती जीवा शिवाची भेट होण्याची उतरती रंगसंगती दाखवत !
पहिल्या पावसाच्या मातीच्या गंधाने भरलेल्या त्या वातावरणात माझं मन इंद्रधनुष्यी बनलं होतं ! विविध विचारांच्या रंगात गंधात न्हाऊन गेलं होतं !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈