सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
खुळ्या कळ्या…
पूजेसाठी आलेल्या फुलपुड्यामध्ये निशिगंधाच्या काही कळ्या आल्या. आणि मग त्यांना नीट फुलायला मिळावं म्हणून मी एका हिरव्या बाऊलमध्ये थोडसं पाणी घालून त्यांना खिडकीत ठेवलं. किती प्रयत्न केला पण त्या काही उभ्या राहात नव्हत्या. सारख्या आडव्या होत होत्या. मग मला जाणवलं की त्यांची अजूनही त्यांची नीज उतरली नाहीये. हा मंदधुंद श्वास जणू त्यांच्या गोड झोपेची साक्षच !…. काय बरं स्वप्नं पहात या निजल्या असतील. आपण आपल्या हिरव्या आईच्या कुशीत नाही आहोत हे कळलं असेल का त्यांना... उठल्यावर जेव्हा त्या बघतील की आपण भलतीकडेच आहोत तेव्हा त्या काय विचार करतील… दुःख होईल का त्यांना… काय बरं वाटत असेल या कळ्यांना…..
… आणि वाटीतल्या कळ्या उमलल्या नाही तरी.. माझ्या मनात मात्र त्या कळ्या उमलू लागल्या…
साध्या भोळ्या शब्दांत फुलूही लागल्या…….
हिरव्यागार वाटीत
निजवलं होतं कळ्यांना
किती वेळ झोपावं
कळेनाच की खुळ्यांना
झोपेतही चालू होता
त्यांचा मंद मंद श्वास
अन् घरभर दरवळला
त्यांचा निरागस सुवास
इवलुसा देह त्यांचा
इवलुसं हे जगणं
इवलुशा या जीवांचं
इवलुसंच स्वप्नं
असू कुठेही आपण
फांदीत अथवा मातीत
दुःखी नाही व्हायचं
नि:स्वार्थतेनं जगायचं
सोनुले किरण आले की
त्यांच्या संग खेळायचं
वाऱ्यासंगे सुगंधाला
सुरेल गुणगुण द्यायचं
कधी पडायचं परडीत
कधी सजायचं वेणीत
कधी गुंफायचं हारात
तर कधी झुलायचं दारात
इवलुसं हे आपलं आयुष्य
सदा घमघमत ठेवायचं
अखेरच्या क्षणीदेखील
अत्तर होऊन जगायचं …
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈