☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र वैशंपायन ☆
नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी केवळ दातांच्या इलाजासाठी खर्च होतात असं नक्कीच म्हणता येईल. मी चक्रावलोच. रूट कॅनाल सारख्या साधारणतः सोप्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा जर हा खर्च असेल तर बाकीच्या अवयवांच्या त्या मानाने अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा खर्च तर माझ्या विचार करण्यापलीकडे गेला. म्हणजे अगदी पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाची किंमत काढायचं ठरवलं तर एक मनुष्यदेह किती किमतीचा असेल? माझं कुतूहल अधिक चाळवलं गेलं आणि जरा अधिक माहितीसाठी गुगल महाराजांना विचारलं की केसाचं ट्रान्सप्लांट होतं त्यावेळा एक केस ट्रान्सप्लांट करण्याचा काय खर्च आहे? उत्तर आलं एका केसाला ३ डॉलर ते ९ डॉलर. त्याची सरासरी धरली तर उत्तर ६ डॉलर. सामान्यपणे माणसाच्या डोक्यावर सरासरी दीड लाख(१,५०,०००) इतके केस असतात. म्हणजे याचाच अर्थ माणसाच्या डोक्यावरच्या केसांचीच किंमत साधारणपणे ९ लाख डॉलर इतकी आहे. मी अधिकच चक्रावलो. या संख्या डोळ्यासमोर आल्या आणि एकंदर मनुष्यदेहाची किंमत किती येईल हे गणितही माझ्याच्याने पूर्ण होईना.
विचार करताना शरीराची सगळी आकृती समोर उभी राहिली. हात, पाय, त्यांची बोटं, डोळे, कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, फुफुस, हाडांचा सापळा, हृदय, यकृत, प्लिहा, लहान आतडं मोठं आतडं, जननेंद्रिय, रक्त, इतर एन्झाइम्स आणि सर्वात महत्वाचा मेंदू… काय चमत्कार आहे शरीर म्हणजे. मी एका ठिकाणी वाचलं होतं की माणसाच्या शरीरात चालणाऱ्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, यांची शरीरात चालणाऱ्या अचूकतेने प्रतिकृती करायची म्हटली तर कमीत कमी पाच एकर इतका मोठा आणि अतिशय क्लिष्ट यंत्रांनी बनलेला कारखाना निर्माण करावा लागेल. आणि हेच काम निसर्गाने म्हणा, ईश्वराने म्हणा सहा फूट लांब दीड फूट रुंद अशा मानवी देहात करून दाखवलं आहे. एका तज्ज्ञाने सांगितलेलं मी ऐकलं आहे की शरीरातील अवयव हे साधारणपणे 150 ते 200 वर्ष पर्यंतसुद्धा सक्षमपणे काम करू शकतात आणि म्हणूनच एका शरीरातून दान केलेले अवयव दुसऱ्या शरीरात पुन्हा व्यवस्थित आयुष्यभर काम करतात. माणसाच्या देहाची ही शक्ती आहे, हा चमत्कारच नाही का? चमत्कार म्हणजे वेगळा अजून काय असू शकतो?
मनात आलं, फुकट मिळाला म्हणून कसा देह वापरतो आपण. देहाचा प्रत्येक अवयव संपूर्ण आयुष्यभर माणसाने केलेल्या अत्याचाराचा भडीमार सहन करत करत शक्य होईल तितकी साथ देण्याचा प्रयत्न करतो आणि माणूस देहाला पायपोस असल्यासारखं का वागवतो? काहीही खातो, कधीही खातो, काहीही पितो कधीही पितो, कधीही झोपतो, कधीही उठतो. व्यसनं करतो आणि काय काय. का असं? ज्या परमेश्वराने हा चमत्कार प्रयेक मनुष्याला बहाल केला आहे त्याची किंमत आहे का आपल्याला? आपण ३००० रुपयाचा साधा चस्मा, त्याची किती काळजी घेतो त्याला नीट केसमध्ये ठेवतो पण तशी डोळ्यांची काळजी घेतो का? कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी काळजीपूर्वक दररोज रात्री सोलुशनमध्ये बुडवून ठेवतो पण डोळ्यांसाठी दिवसातून एकदातरी नेत्रस्नान करतो का? जसं डोळ्याचं तसंच इतर अवयवांचं. आपल्या संस्कृतीत अष्टांगयोग आणि आयुर्वेद हे दोन अमृतकुंभ या देह नावाच्या चमत्काराचा सांभाळ करण्यासाठीच दिले आहेत. शरीरात बिघाड होऊच नये म्हणून अष्टांगयोग आणि काही कारणांनी झालाच तर पुन्हा पूर्ववत शरीर करण्यासाठी आयुर्वेद. या दोघांचा किती सुंदर मेळ आपल्या संस्कृतीत घालून दिलेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी शरीर नावाची सुंदर भेट आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. त्याचा निदान योग्य तो सांभाळ करण्याची जबाबदारी आपली नाही का?
मी लहानपणी एक प्रार्थना शिकलो की जी मी दररोज रात्री निजण्याअगोदर म्हणतो. ती प्रार्थना अशी;
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो ।
जिव्हेने रस चाखतो, मधुरसे वाचे आम्ही बोलतो।
हाताने बहुसाळ काम करितो, विश्रांतीही घ्यावया ।
घेतो झोप सुखे, फिरोन उठतो, ही ईश्वराची दया ।।
मी ही प्रार्थना हात जोडून म्हणतो. पण मला वाटतं या प्रार्थनेचं अधिक महत्व पटण्यासाठी आणि मनावर याचा गांभीर्याने परिणाम होण्यासाठी मी ही प्रार्थना खिशात हात घालून म्हटली पाहिजे. कारण तरच दररोज आठवण राहील की या देहाची एकूण कॅपिटल व्हॅल्यू किती! किती अमूल्य आहे हा देह. आणि खिशात हात घालून प्रार्थना केल्यामुळे याचीही आठवण राहील की माझ्या शरीराची मीच जर काळजी नाही घेतली तर त्याच खिशातून एकेक केस परत मिळवण्यासाठी सहा डॉलर बाहेर काढायला लागतील कधीतरी…
© श्री राजेंद्र वैशंपायन
मो. +91 93232 27277
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈