मनमंजुषेतून
☆ थंड हवेचं ठिकाण – पुणं — … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆
…. होय मंडळी. एकेकाळी पुणं चक्क थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. मुंबईचे रहिवासी उन्हाळ्यात हवापालट म्हणून पुण्याला येत असत. खोटं वाटत असेल तर विद्यापीठात चक्कर टाकून या. उगाच नाही ब्रिटिश गव्हर्नरनं एवढा आलिशान राजवाडा बांधला स्वतःसाठी… उन्हाळ्यात मुंबई इलाख्याचा गव्हर्नर मुक्कामाला पुण्यात असायचा.
पूर्वीचं सोडा. अगदी आपल्या लहानपणीही वाडे होते. त्यातली थंडगार शहाबादी फरशी…. भर उन्हातून सायकल मारत आलं, की बाहेरच्या नळावर हात-पाय वगैरे धुवून सरळ त्या गारेगार शहाबादी फरशीवर आडवं पसरायचं….. माठातलं वाळामिश्रित थंडगार पाणी…. क्वचित पन्हं…. घराबाहेर असलो, तर कुठेतरी रसवंती गृहात बसून मस्त बर्फ टाकलेला उसाचा रस .. नाहीतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोकड्यांमध्ये विक्रीला असलेली “निरा” प्यायची. कुठे हातगाडीवर ताडगोळेही विक्रीला असत. एरवी बेचव, गिळगिळीत वाटणारे ते ताडगोळे उन्हाळ्यात मात्र अमृतासमान वाटायचे….. उरलेल्या निरेपासून “हातभट्टीची” बनवतात अशी एक कथाही प्रचलित होती…. खरं खोटं परमेश्वरालाच माहीत….
पूर्वी पुण्यात रस्त्यावर चिंच, वड, पिंपळ असे डेरेदार वृक्ष होते. “रस्तारुंदी” या गोंडस नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली गेली. ( आणि पुन्हा वाहतुकीचा बोजवारा उडतोच आहे).
पूर्वी उन्हाळ्यात पुण्यात पाहुण्यांचं स्वागत कैरीचे पन्हं देऊन व्हायचं. त्यात मस्त वेलची, मिरपूड घालून चटपटीत चव आणलेली असायची. संध्याकाळी सारसबाग, कमला नेहरू पार्क वगैरे ठिकाणी जाऊन भेळ खायची. हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. लाकडी पॉटमध्ये हँडल फिरवून फिरवून मॅंगो आईस्क्रीम बनवण्याची मजाच काही वेगळी होती. ( मला वाटतं ही आइस्क्रीम पॉटस् भाड्याने मिळण्याची सोयही काही ठिकाणी होती ). सारसबागेबाहेर काडी असलेलं “जम्बो आइस्क्रीम” मिळायचं. शिवाय माझ्या लहानपणी खाऊ म्हणजे “लॉलीपॉप”.- काठीला लावलेली गोल गोड चकती चाटत बसणं ही एक
” मेडिटेशन ” होती…..
तेव्हा पुणं सगळ्याच अर्थांनी शांत होतं. सुंदर होतं. रमणीय होतं. कुठच्याही टेकडीवरून खाली पाहिलं की हिरव्यागार झाडीत लपलेलं पुणं दिसायचं. थंडीत तर पुण्यात चक्क धुकं पडायचं. पण पुण्यातला उन्हाळाही सुंदर होता. शहाबादी फरशीवर आडवं लवंडून रेडिओवर “वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा….” “माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी….” किंवा “ये रे घना ये रे घना…..”
यासारखी अवीट गोडीची गाणी ऐकत निद्राधीन व्हायचं…. तेव्हा वाड्यांमधल्या काहीशा अंधारलेल्या स्वयंपाक घरांमधून येणारे वरण, मुगाची खिचडी, कांदेपोहे वगैरे वासही अप्रतिम वाटायचे.
चहाबाज मस्त ब्रूक बॉण्ड, फॅमिली मिक्स्चर, आसाम वगैरे चहा प्यायचे. जवळच्या साने, सावरकर, खन्ना या डेअरीचं म्हशीचं दाट दूध असायचं. त्याच्या विरजणापासून घरीच भरपूर लोणी तूप बनायचं…
कॉलेजात गेल्यावर अगदीच “मागासलेले” वाटायला नको म्हणून क्वचित कॅम्पमध्ये “मार्झोरिन” मधे जाऊन सॅन्डविच खा, चॉकलेट कुकीज खा, सहजच “कयानी” मधून “श्रूसबेरी” बिस्किटं घेऊन या, अशा लीला चालायच्या. पण खरी मजा म्हणजे “संतोष” किंवा “हिंदुस्तान” चे पॅटीस…. रविवारी सकाळी नाश्त्याला चहाबरोबर हे पॅटीस खायचे…. रात्री भूक लागली तर “पॅराडाईज”,. “लकी”, किंवा “नाझ” या ठिकाणी क्रीम रोल खायचे….. मंडळी, हे काही नुसतं खाण्याचं वर्णन नाही…. पुणेकर या थोड्या थोड्या गोष्टींवर समाधानी होते…
लिहिण्याचा उद्देश एवढाच की आता सुबत्ता आली, गाड्या – परदेशप्रवास, हॉटेलिंग… सगळं काही आहे….
पण ते साधं पुणं वेगळंच होतं….
ते ज्यानं अनुभवलं, त्यालाच पुणं खरं “कळलं” ….
बाकीचे नुसतेच “पुण्यात राहिले….”
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈