श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझी फजिती !

सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !

आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.

‘अभी अभी तो आयीं हो

अभी अभी जाना है ।’

असे सगळे होते.

मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या.  घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !

थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.

त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’   त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.

माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.

भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !!  खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता….. 

…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत  असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.

मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !

ह्या आझाद पंछीला जिने  पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !

(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)…. 

“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला

मैने एक लडका हेरून ठेवला

उडता पंछी पिंजडेमे बंद केला

आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ …. 

– इति मंगल टिल्लू

लेखक : श्री सुहास टिल्लू

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments