सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
माझी आजी डोळ्यासमोर येते तेव्हा तिच्या आयुष्याच्या दोन चित्रमालाच डोळ्यासमोर येतात. एक तिचे स्वातंत्र्यपूर्व आयुष्य आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचे!
राधाबाई कृष्णाजी पेंडसे, आजोबांची दुसरी बायको ! पहिली फारच लवकर गेली आणि त्यानंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. कोकणातली आई – बापा विना आजोळी वाढलेली दहा-बारा वर्षाची ती मुलगी आजोबांबरोबर लग्न करून थेट लांब कराची ला गेली ! नव्हता शिक्षणाचा गंध, नव्हता श्रीमंतीचा साज ! केवळ घराला जड होऊ नये म्हणून कोणीतरी लग्नाचा विचार केला आणि ती बोहल्यावर चढली. अशी ही साधीसुधी मुलगी कोकण सोडून दूरवर गेली एका मोठ्या बंगल्याची मालकीण म्हणून ! आजोबांची सरकारी नोकरी होती. ते ऑब्झर्वेटरीत नोकरीला असल्याने कराची जवळील मनोरा बेटावर त्यांचे वास्तव्य होते. दूरवरून येणाऱ्या बोटी, मचवे ह्यांना हवामानासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम असे. मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे इतक्या लांब ठिकाणी ते नोकरीसाठी गेले. आजी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कराचीला गेली. घरी नोकर चाकर होते. दहा-बारा खोल्यांचे घर होते, पण संसार मांडायला लागणारा आधार कुणाचा नव्हता ! आपल्या आपण सर्व शिकायचे. नवऱ्याच्या कडक शिस्तीत राहायचे आणि आज्ञा पालन करायचे एवढेच तिला माहिती ! कधीतरी कोकणात जायला मिळे, पण प्रेमाची माणसे कमीच होती. माहेरची चितळे.. परशुरामाच्या घाटीत राहणारी.. भाऊ वहिनी होते, पण परिस्थिती
बेताचीच ! दारिद्र्य सगळीकडेच होते, पण भात आणि कुळीथाच्या पिठल्याला कमी नव्हतं ! घाटी उतरायची, चिपळूणला जायचं, काय असेल ते आंबे, फणस, रातांबे विकायचे. चार पैसे मिळत त्यातच बाजार करायचा ! अशा पद्धतीने कोकणातल्या कुटुंबांचा व्यवहार चालत असे.
लग्नानंतर आजी कराचीला गेली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दर दोन वर्षांनी एक बाळंतपण होत होतं. सहा मुलं झाली. तीन मुली, तीन मुलगे. सर्वांना एका ठिकाणी राहणं परवडणारे नव्हते ! मग दोन मुलं सातारला काकांकडे वाढली तर चार मुले कराचीला वाढली. माझे वडील सर्वात मोठे! त्यांचे बालपण ऐषारामात गेले. कारण आजोबांची नोकरी मानाची होती. मोठ्या मोठ्या इंग्रज साहेबांचा वावर भोवती असे.
राहणीमान चांगले ठेवता येई. कपातून चहा प्यायला मिळे. साहेब लोकांशी संपर्क असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आजोबांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. विशेष करून इंग्रजीची आवड होती. घरामध्ये पुस्तकांचे शेल्फ भरलेले असे. कराचीजवळचे मनोऱ्याचे घर म्हणजे लौकिक अर्थाने चांगले, सुसंपन्न स्थितीतील घर होते. शिक्षणाची मनापासून आवड असल्यामुळे आजोबांनी आजीलाही लिहा वाचायला शिकवले होते. घट्ट नऊवारी नेसणारी आमची आजी नाकी डोळी नीटस, उंच, शिडशिडीत बांध्याची होती. मनोऱ्याला काही मराठी कुटुंबही होती. मोजकीच ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे ही मंडळी एकमेकांना धरून असत. वडिलांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. युद्धाचा काळ असल्याने सेन्साॅर ऑफिसला नोकरी मिळाली होती. लवकरच लग्न होऊन त्यांचे बिऱ्हाड कराचीमध्ये झाले. त्यांच्याबरोबर माझे काका, आत्या ही मंडळी कराचीत घर करून राहिली. आजी मनोरा ते कराची अशा फेऱ्या मारत संसार करत होती.
याच दरम्यान भारताच्या फाळणीच्या गोष्टी सुरू होत्या. आजोबांची रिटायरमेंट झाली, त्यांना कराचीमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी कराचीला मोठे घर घेतले. आणि सर्व मंडळी त्या घरात राहू लागली पण १९४७ च्या सप्टेंबर मध्ये फाळणीनंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व पेंडसे कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले आणि भारतात आपल्या मूळ गावी आयनी मेटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे निर्वासित म्हणून यावे लागले. इथून आजीच्या आयुष्याचा दुसरा कालखंड सुरू झाला ! कराचीचे, मनोऱा बेटावरचे साहेबी जीवन संपले आणि कोकणात आयनी- मेट्याजवळील पाटील वाडी या ठिकाणी आजोबांनी जागा घेतली. त्या जंगलात झोपडीवजा घर बांधून आजी- आजोबा राहू लागले .मोठ्या बंगल्यात राहणारी आजी आता आजोबांबरोबर झोपडीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी चिपळूणला बिऱ्हाड केले होते. पाटील वाडी आणि चिपळूण अशा फेऱ्या करत पुन्हा एकदा आजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आजोबांना डायबिटीस होता. कोकणातील कष्टकरी जीवनात आणि निर्मळ वातावरणात त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला होता. माझी आजी या सगळ्याला तोंड देत मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी झटत होती. कष्टाची तर तिला कायमच सवय होती. डोक्यावर आंब्याच्या, फणसाच्या पाट्या घेऊन आजी खेडला विक्रीसाठी येत असे. ती दिवसाकाठी आठ दहा मैल सहज चालत असे. आसपासच्या लोकांना ‘निर्वासित म्हणून आलेले पेंडसे’ परिचयाचे होते. काही जण आपुलकीने त्यांना मदत करत असत.
अशीच जीवनाच्या खाचखळग्यातून आजीची वाटचाल ७० सालापर्यंत चालू होती. १९७० साली आजोबा गेले आणि पुन्हा एकदा आजी एकटी पडली.. ती अधूनमधून आमच्याकडे, काकांकडे, आत्याकडे येत जात असे, पण तिला तिथे जास्त काळ करमत नसे. स्वतंत्र विचाराची, कणखर स्वभावाची अशी आजी कोकणात एकटी घरी राही. एकदा ती घरात एकटी आहे असे पाहून चोरांनी कडी काढायचा प्रयत्न केला पण आजी इतकी धीट की तिला जाग आल्याने हातात काठी घेऊन ती दाराजवळ आली आणि चोराच्या हातावर काठीने मारले. चोर पळून गेले. पण त्यानंतर मात्र तिच्या भाच्याने तिला आपल्या घरी रोज रात्री झोपण्यासाठी नेण्याचे ठरवले. काही काळ असा गेला. पुढे माझ्या भावाला मुलगा झाला आणि आजीला पंतवंड झाले. त्यानिमित्ताने तिला पुण्यामध्ये आणले आणि परत कोकणात तिला जाऊ दिले नाही.
आयुष्याचे असे दोन कालखंड… एक कराचीचा आणि एक कोकणातला – दोन परस्पर विरुद्ध
तिने अनुभवले. नकळत या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. कधीतरी ती मनाने मनोऱ्याच्या घरी असे तर कधी कोकणात असे ! आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. संकटांना तोंड देऊन ती थकली होती. तिच्याआधी माझे वडील गेले, त्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख ती विसरू शकत नव्हती. आठवड्यातील सात दिवसातले चार-पाच दिवस तरी तिचा उपासच असे. पण कष्ट केलेले तिचे शरीर या सगळ्याला तोंड देत होते. शरीर झिजले होते पण तिला कोणताही आजार नव्हता त्यामुळे थकत गेलेली आजी हळूहळू या सगळ्या मोहमायेतून बाहेर पडली. झाडाचे जीर्ण पान जसे अलगदपणे गळून पडते, तशी माझी आजी म्हातारपणामुळे अनंतात विलीन झाली. माझ्या आत्त्याने पेंडसे कुटुंबाच्या आठवणींचे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारे मला माझ्या आजीचे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते !
तिच्या स्मृतीला माझा शतशः प्रणाम !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈