सुश्री सुलू साबणे जोशी
☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवीन टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत, त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅटमध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की, जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो ! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते.
नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित?) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.
ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली कोणी घरी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सल मागवून खातात.
हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तीत जास्त तीन सदस्य!) घरी पाहुण्यारावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेला बाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?
ज्या लोकांचे १९८५ ते ९५ सालापर्यंत घेतलेले फ्लॕट आहेत, ते लोक नवीन फ्लॕट बघायला जातात, तेव्हा तिथले किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते.
मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ.चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या – साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील, हेही मान्य करूया. पण भारतीय संस्कृतीमध्ये घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच करणे अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?
पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की, हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.
सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला महत्व व प्राधान्य द्यावे.
घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये.
लेखक : श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈