सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – अपूर्व योग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी)
१ जून….. शास्त्रीय संगीतातील विदुषी श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांचा स्मृतिदिन. त्यांची एक सुरम्य आठवण ……
१८ ऑगस्ट २००० चा दिवस. टीव्हीवरील एका मराठी मालिकेचं छानसं गाणं मी मुंबई विद्यापीठाच्या ‘क्लबहाऊस’ या रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करत होते. इतक्यात तिथं एक ओळखीचा चेहरा समोर दिसला. ओळखीची खूण पटली. तरी नेहमीप्रमाणे नक्की नाव काय, ते आठवेना. बाई ठेंगणी ठुसकी, गोल चेहरा, गोल मोठं कुंकू. कुठं पाहिलंय बरं? नेहमीचंच कोडं ! पण आदरणीय किशोरीताईंच्या सोबत कुठं तरी नातं जुळतंय, एवढा मात्र धागा लागला. रेकॉर्डिंगचं मनावरचं दडपण अधिकच वाढलं. बाई समोरच्या रूममध्ये, खाली बसल्यानं, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मला नंतर दिसेना. परंतु अस्तित्व जाणवत असल्याने आता मात्र लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक उत्तमच गायचं, अशी मनाशी खूणगाठ बांधून एका टेकमध्ये गाणं ओके करून, मी रेकॉर्डिस्टच्या रूममध्ये आले. गाणं कसं झालं असेल? या कुतूहलमिश्रित तणावामध्ये मी त्या खोलीत प्रवेश केला. रेकार्डिस्टसह निर्माता, दिग्दर्शक, सर्वजण खुशीत दिसत होते.
त्या बाईंनी अगदी आनंदानं माझं स्वागत केलं, अन् म्हणाल्या, “अगं, आज तुला अगदी आनंदाची बातमी द्यायची आहे. काय देशील तू मला? ” मीही अगदी थाटात म्हटलं, “ तुम्हाला जे आवडेल ते ! ” मीही त्यांचा हात हातात धरून त्यांचं नाव आठवायचा प्रयत्न करत होते.. त्या म्हणाल्या, “ संगीत क्षेत्रातल्या दिग्गज विदुषी, धोंडूताई कुलकर्णी यांनी मला परवाच सांगितलं, की ‘अगं शिल्पा, मला नं, त्या पद्मजा फेणाणी जोगळेकरचं गाणं अत्यंत मनापासून आवडतं.’ धोंडूताई कधी कुणाचं असं कौतुक करीत नाहीत. पण अगदी मनापासून त्या मला सांगत होत्या की, “आजच्या पिढीतली ‘पद्मजा’ म्हणजे माझी सर्वात आवडती गायिका ! तिला मी तानपुऱ्यावर केदार रागातली बंदिश गाताना एन.सी.पी.ए.मध्ये प्रत्यक्ष ऐकलंय. काय तिचा आवाज, किती गोड नि लवचिक ! अगदी पाण्यासारखा सरसर वळतो. मला खूपच आवडते ती ! ‘
…. “पद्मजा तू त्यांना एकदा भेटून नमस्कार करून ये बरं…”
हे सारं मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक श्रीमती शिल्पा तेंडुलकर यांच्याकडून ऐकून तर मी गारच पडले ! धोंडूताई म्हणजे शास्त्रीय संगीतातील विशुद्ध शास्त्राचा परिपाक ! आणि त्यांनी माझ्याविषयी हे उद्गार काढावेत! सहसा, शास्त्रीय संगीतातील कलाकार इतर गायकांना कौतुकाच्या बाबतीत जरा दूरच ठेवतात. परंतु धोंडूताईंनी माझ्या शास्त्रीय गायनाचं मनापासून केलेलं कौतुक ऐकून, मला धन्य धन्य वाटलं ! त्या रात्री परमेश्वराचे, आईवडिलांचे व गुरूंचे आभार मानत मी एका वेगळ्याच तरल आनंदात झोपी गेले….!
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈