सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठलनामाचा रे टाहो ॥)

‘विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो ‘ असं म्हणणार्‍या नामदेवांनी आणि त्यांच्या बरोबर सर्वच संतांनी विठुरायाला अभंग ,भारुडं ,विरहिणी, गवळणी आरत्या ,भूपाळ्या असे अनेक शब्दालंकार घातले .. पण पहाटेच्या अंधारात विठुरायाच्या अंगावर आपल्या जीवनानुभवांची रंगीबेरंगी ठिगळं लावलेली मायेची वाकळ पांघरली, ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घरोघरच्या मालनींनी ! 

त्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्यांतून त्यांच्या साध्यासुध्या जगण्याचे सारे रंग दिसून येतात .

लग्न होऊन अजाणत्या वयात आईचा पदर नि बापाची मायेची पाखर याला अंतरलेली ही सासुरवाशीण .पहाट फुटायच्या आधी ही उठायची .कुटुंबाच्या मुखात घास घालणारं जातं हा तिचा देवच ! त्या देवापुढं मिणमिणता दिवा लावून हिची श्रमसाधना सुरु व्हायची .घासामागून घास जात्याच्या मुखात सारल्यावर जात्यातून पीठ झरावं तशा तिच्या मुखातून ओव्या झरु लागायच्या.

तिच्या मनाच्या बारीक सारीक दुखापती ,तिला असलेली माहेराची ओढ ,कंथाचं (पतीचं),दिराचं, लेकरांचं कवतिक ,तिच्या गावचं निसर्गवैभव, सूर्य चंद्र नदी पाखरं अशा तिच्या सार्‍या निसर्गदेवतांचं वर्णन ,असं सारं त्या ओव्यांमधे ती सहज गुंफायची .अंगावर लपेटलेला पदर कमरेशी घट्ट खोचून, ओचा आवरून ,एक पाय लांब पसरून ती  जात्याशी बसायची ..जात्याचा नि त्या बरोबर फिरणार्‍या  हातातल्या काकणांचा नाद आणि तिचं पुढं झुकून त्या लयीशी एकरूप होणं ..तीच लय पकडून दळदार शब्दफुलं तिच्या मुखी यायची . एकामागून एक तिच्या सहजसुंदर स्वरात त्यांना ओवताना तयार व्हायच्या त्या ओव्या ! महदंबा, जनाबाई यांच्या आोव्यांवर श्रेयाचा टिळा लागला .पण महाराष्ट्रातल्या आदिमायांनी पिढ्यानपिढ्या जे ओव्यांचं पीक काढलं ते अनामच राहिलं .त्या काळातल्या स्त्रीजीवनाचं प्रातिनिधिक रूप ओव्यांमधे बंद झालं .कुरुंदाच्या दगडाचं जातं हा त्यांच्या भावविश्वाचा,त्यांच्या साहित्यिक जाणिवांचा साक्षीदार .प्रगती गिरण्या घेऊन आली तसा तो साक्षीदारही मूक झाला .पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातल्या घराघरांमधे पिढ्यानपिढ्या ज्याच्या नावाची आळवणी झाली तो मालनींचा पिता- भ्राता- सखा विठुराया मात्र अजूनही त्या मायेच्या गोधडीची ऊब विसरला नसेल ! 

ओव्यांमधे विठ्ठल ,पंढरी ,वारी याला फार जिव्हाळ्याचं स्थान आहे .इंदिरा संतांनी दीर्घकाळ, परिश्रमपूर्वक  ओव्या गोळा केल्या व त्याच्या भावानुसार गाथाही बांधल्या. महाराष्ट्राचा एक अमूल्य ठेवा त्यांच्यामुळं जिवंत राहिला .मालनींच्या नि विठ्ठलाच्या अनेकपदरी नात्याचं सुरेख वर्णन इंदिराबाई करतात ..

“भाऊ ,बाप, दैवत ,प्रियकर अशा सर्व नात्यांच्या पाकळ्या नि त्याच्या गाभ्यात मैतरभाव असलेल्या फुलाचे , अशा स्नेहाच्या अविष्काराचे नाव ‘सखा ‘ . पांडुरंगाला वाहिलेले हे फूल मालनींच्या हृदयात परिमळत असते .याच्या परिमळात सर्व जिव्हाळे एकवटून दरवळत असतात !” 

पंढरी हे मालनींचं माहेर .बाप विठ्ठल ,आई रखुमाई , पुंडलीक भाऊ नि चंद्रभागा भावजय ! 

जीवाला वाटईतंऽ   

पंढरीला जावं ऽ जावं ऽ ऽ

आईबापा भेटू यावं 

कुंडलिकालाऽ लूटावं ऽ ऽ

त्यांना जशी माहेराची ओढ तशी तिकडं विठुरायालाही यांच्या भेटीची आस .मग तो पुंडलीकाला मुराळी पाठवतो ..

पांडुरंगऽ पीता ऽ    

रुकमीन माझी बया ऽ ऽ 

आखाडवारीला गऽ  

कुंडलीक ऽ आला ऽ नेया ऽ ऽ

तो तिची येण्याची सोय करतो .रोज घरी कष्टणार्‍या मालनीला दिंडीत आयतं खायला मिळेल असं पहातो .

पंढरीला जाते ऽ             

कशाचं ऽ पीठऽ कूऽटऽऽ

न्याहारी काल्याला गं ऽ      

देव खजिन्याचा ऊठं ऽ ऽ 

पण कुणी एक मालन अगदी अंथरुणाला खिळलीय .ती मुळीही हलू शकत नाहीय , पण त्याच्या भेटीची तळमळ काही कमी होत नाहीये ! तिला कोण नेणार ? मग ती त्यालाच हक्कानं साकडं घालते.

“ बाबारे, मला काही येववत नाही पण तुला पाहिल्याबिगर मी डोळे मिटायची नाही .मग तूच ये कसा !” आणि तो तिचा भावसखा तिच्याकरता गरुडावरुन येतो .तिच्या मनात चांदणं पसरतं .आणि विठूच्या अंगच्या कस्तुरीगंधानं या भाबड्या मालनीचं जिणं गंधाळून जातं ! 

माझ्या जीवाला जडभारी ऽ  

कूनाला घालू वझ्झ्ं ऽ ऽ

इट्टला देवा माझ्या ऽ            

तातडीनं ऽ येनं ऽ तूझं ऽ ऽ

जीवाला जडभारी ऽ           

उभी मीऽ खांबाआड ऽ ऽ 

इटूबा ऽ देवाजीऽलाऽ         

विनवीते अवघऽडऽ

जीवाला माझ्या जड ऽ     

न्हायी कूनाला माया येतऽ ऽ

सावळ्या पांडुरंगाऽ         

यावं गरुडासहीतऽऽ

आला गंऽ धावतऽ     

माझा पंढरीचा हरीऽ ऽ

चंद्रावाचून ऽ गऽ       

उजेड पडला माझ्या घरीऽ ऽ

कस्तूरीचा ऽ वासऽ    

माझ्या अंगाला ऽ कूठूला ऽ ऽ

इट्टल सावळा गऽ      

मला भेटूईनऽ गेला ऽ ऽ 

या मालनीचा हेवा वाटतो .तिच्या अंगाच्या तुळशी कस्तुरीच्या दरवळात मन गुरफटून रहातं .वाटतं पळभर तरी तिचा निर्मळ ,निर्हेतुक, निर्व्याज भाव आपल्या व्यवहारी मनात उजळावा .ते सख्यत्वाचं फूल आपल्याही मनात कधीतरी उमलावं ! 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments