श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ “आई आणि तिचा श्याम …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
पक्ष्यांची, प्राण्यांची पिलं मोठी झाली की घरटं सोडतात आणि त्यांच्या जन्मदात्यांनाही ! पण मानवप्राण्याची पिलं जन्मत:च परावलंबी. त्यांना जन्मानंतर कित्येक वर्षे सांभाळावं लागतं,भरवावं लागतं तेंव्हा कुठं ती चालू लागतात. सुरूवातीची कित्येक वर्षे आयता चारा खात राहतात आणि कित्येक वर्षांनी स्वत:चा चारा स्वत: कमावू लागतात. पक्षी-प्राण्यांची आयुर्मर्यादा मानवापेक्षा बरीच कमी असते, पण मानव अनेक वर्षे जगतो आणि मुख्य म्हणजे जरजर्जर होतो. त्याला आयुष्याच्या सायंकाळी पुन्हा बालपण प्राप्त होतं. आणि या बालकांना पुन्हा आई-बाप हवे असतात! यासाठी मनुष्य मुलांनाच आपले उतारवयातील आईबाप म्हणून घडवत राहतो…..हरप्रकारची दिव्यं पार पाडून. म्हातारपणी चालताना जाणारा तोल सांभाळता यावा म्हणून माणूस आपल्या मुलांच्या रूपात काठीची योजना करून ठेवतो. त्यापेक्षा अंतसमयी मुखात गंगाजलाचे दोन थेंब तरी पडावेत यासाठी देवाकडे अपत्यांची याचना करीत असतात. ज्यांच्या पदरात ही फळं पडत नाहीत त्यांचे पदर सदोदित पेटते राहतात. निदान आपल्याकडे तरी असंच आहे आणि बहुदा भविष्यातही असेल !
मुलांना जन्माला घालून त्यांचे संगोपन, ती आपलेही आपल्या वृद्धापकाळी असेच संगोपन करतील या भावनेने करणे हा विचार वरवर जरी एक व्यवहार वाटत असला तरी या व्यवहाराला किमान आपल्याकडे तरी काळीजकिनार असते. काळीज आणि काळजी हे दोन शब्द उगाच सारखे वाटत नाहीत ! पोटाला चिमटा काढणे, खस्ता खाणे, काळीज तिळतीळ तुटणे, हे वाक्प्रचार मराठीत निव्वळ योगायोगाने नाहीत आलेले. अनेक काळजं अशी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निखा-यांवर चालत आलेली आहेत. पण सर्वच काळजांना त्यांच्या उतारवयात पायांखाली वात्सल्याची, कृतज्ञतेची फुलवाट गवसत नाही, हे ही खरेच !
पुरूष असूनही आपल्या आईचं काळीज आपल्या उरात बाळगून असलेले साने गुरूजी म्हणजे मातृ-पुत्र प्रेमाचा जिवंत निर्झर ! शाम आणि आई ही दोन नाती किमान मराठी मानसात साने गुरूजींमुळेच चिरस्थापित झालीत. शाम या नावापासून ‘शामळू’ असं शेलकं विशेषण जन्माला आलं असलं तरी या शाममुळे कित्येक मातांच्या पुत्रांना जन्मदातापूजनाचं पुण्य प्राप्त करण्याची सदबुद्धी झाली, हे कसं नाकारता येईल?
फादर फ्रान्सिस दिब्रिटो एकदा परदेश भेटीत असताना एका कुटुंबात मुक्कामी राहिले होते. मध्यरात्री त्यांना बालकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. त्या बालकाचे पालक आता त्या आवाजाने जागे होतील आणि त्याला शांत करतील ही त्यांची कल्पना होती. पण पंधरा मिनिटे उलटून गेली तरी काहीच हालचाल नाही असं पाहून त्यांनी त्या बाळाच्या खोलीत जाऊन त्या एकट्या झोपलेल्या बालकाला उचलून घेतलं, छातीशी धरलं….आणि मग ते बाल्य निद्रेच्या कुशीत शिरून शांत झालं ! सकाळी त्या बालकाच्या आईबापाशी संवादात असं समजलं की, त्यांच्याकडे पोरांनी स्वत:च रडायचं आणि स्वत:च आपली समजूत काढून झोपी जायचं ! या वृत्तीचे परिणाम विलायतेतील समाज भोगतो आहेच. आपल्याकडेही असे विलायती कमी नाहीत. आपल्या मुलांना “ श्यामची आई “ ही साने गुरुजींची कथा सांगणे आजही अगत्याचे वाटते ते यासाठीच…कारण आजही हा विषय कालसुसंगत आहेच.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈