श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : पहाट…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 

‘प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती… ‘ ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ‘ पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ‘ असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्यावर शिंपडले जाते. मरगळलेल्या मनाला हे अमृतस्वर संजीवनी देऊन ताजेतवाने करतात. या भूपाळीमध्ये अप्रतिम असे निसर्गाचे वर्णन आले आहे. 

सकाळी आपण जशी परमेश्वराची पूजा करतो, तशीच पूजा निसर्गही पहाटेच्या रूपाने त्या परमात्म्याची बांधत असतो. त्याच्या पूजेसाठी विविध रंगांची, गंधांची फुले निसर्ग तयार ठेवतो. नदीचं, झऱ्याचं खळाळणारं संगीत असतं, वाऱ्याची बासरी आसमंतात लहरत असते, पक्ष्यांचं कूजन म्हणजे जणू मंत्रघोष ! अशी सगळी स्वागताला तयार असतात. त्यातच पूर्वेचं आकाश स्वागतासाठी गुलाबी वस्त्र परिधान करून तयार असतं. अशाच वेळी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन या निर्गुण निराकाराच्या आरतीला जणू प्रकाशाची निरांजन घेऊन हजर होतात. पाहता पाहता या निरांजनाच्या ज्योती अधिकाधिक प्रकाशमान होऊन अवघे विश्व उजळून टाकतात. पूर्वेचा गुलाबी रंग आता सोनेरी रंगात बदलतो. रात्रभर प्रकाशाच्या प्रतीक्षेत असलेली झाडं, वृक्षवेली आपले हात पसरून या प्रकाशाचं स्वागत करतात. अशा वेळी भा रा तांब्यांच्या कवितेतील ओळी सहजच ओठांवर येतात. ‘ पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर…’ या कवितेतलं वर्णन कवीनं जरी सायंकाळचं केलेलं असलं तरी सकाळच्या वेळेलाही ते चपखल लागू पडतच. ‘ फिटे अंधाराचे जाळे…’ या गीतात म्हटल्याप्रमाणे अंधाराचे जाळे नाहीसे होऊन स्वच्छ दिवस उजाडलेला असतो. अशा वेळी परमेश्वर म्हणा की निसर्ग म्हणा मानवाला, पशुपक्ष्याना आणि अवघ्या सृष्टीला जणू म्हणतो, ‘ बघ, तुझ्यासाठी एक अख्खा सुंदर दिवस घेऊन आलो आहे. आता त्याचा कसा वापर करायचा ते तू ठरव. ‘

पहाटेच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भासतात. पण मला सगळ्यात जास्त आवडते ती जंगलातील पहाट. या पहाटेसारखी सुंदर वेळच नाही. रात्र संपून दिवस उगवण्याच्या सीमारेषेवर ही पहाट उभी असते. अशा वेळी निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं. रात्र संपून पहाट होतानाची वेळ इतकी सुंदर असते की अशा वेळी शहरातले भगभगीत दिवे नकोसे वाटतात. पहाटेला तिच्या नैसर्गिक रूपातच पाहावं, फुलू द्यावं, खुलू द्यावं. आकाशातल्या रात्रीच्या मुक्कामाला असणाऱ्या तारे आणि तारका आपल्या घरी हळूहळू परत जायला निघालेल्या असतात. हळूहळू त्या दृष्टीआड होतात. त्यांना अदृश्य होताना आणि पहाटवेळा उमलताना पाहण्यात एक वेगळाच अनोखा आनंद आहे. तो अनुभवावा. 

पहाट मला एखाद्या अल्लड तरुणीसारखी भासते. कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ती आपल्या नैसर्गिक रूपातच येते. तिचं हे नैसर्गिक रूपच मनाला जास्त भावतं. जातीच्या सुंदराला जसं सगळंच शोभून दिसतं, तशीच ही पहाट असते. रम्य, देखणी. अशा वेळी जंगलातून एखादा फेरफटका मारावा. निसर्गाची भूपाळी अनुभवावी. रंग, रूप, रस, गंध सगळं सगळं असतं त्यात. फक्त ती अनुभवता आली पाहिजे. निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपल्याशी बोलत असतो पण ते ऐकता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही साधना आवश्यक असते. सगळ्या कवींना, महाकवींना, लेखकांना या पहाटेनं स्फूर्ती दिली आहे. अनेक सुंदर काव्य पहाटेच्या मंगल वेळेनं प्रसवली आहेत. अनेक ऋषी मुनी, लेखक, कवी यांना प्रतिभेचं देणं या पहाटेनच दिलं आहे. 

आपल्या घराजवळ एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी असेल तर पहाटे जरूर जावं. नसेल तर कधीतरी मुद्दाम वेळ काढून अशा ठिकाणी जावं. ही पहाट अनुभवावी. ही पहाट अनुभवण्यासाठी सध्या तरी कोणतंच शुल्क आकारलं जात नाही. काही चांगल्या गोष्टी अजूनही मोफत मिळतात. त्यातील पहाट, पहाटेचा गार वारा, नयनरम्य निसर्ग आपल्याकडून काही घेत नाही. देतो मात्र भरभरून ! ‘ आपल्याला ते घेता आलं पाहिजे. नाहीतर ‘ देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था व्हायची ! ‘ 

या पहाटेच्या प्रसंगी रानवाटा जाग्या होऊ लागतात. झाडे, वेली जाग्या होतात. आपण जंगलातून तर फेरफटका मारणार असू तर झाडांचा एक अनोखा गंध आपलं स्वागत करतो. अशा वेळी खोल श्वास घेऊन हा गंध, ही शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यावी. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानावर पडत असतात. त्यांच्यातली विविधता, माधुर्य अनुभवावे. पूर्वेकडून होणाऱ्या सुवर्णप्रकाशाची उधळण अनुभवावी. तो प्रकाश अंगावर माखून घ्यावा. तळ्यात फुलणारी कमळे,उमलणारी फुले आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर जणू हजर होतात. त्यांचं निरीक्षण करावं. त्यांचं रूप नेत्रांनी प्राशन करावं, श्वासावाटे गंध मनात साठवावा. पाण्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. तो दिवसभरात नंतर पुन्हा दिसत नाही. नदीचा, झऱ्याचा खळखळाट ऐकू येतो. आपण समुद्रकिनारी असू तर, समुद्राची गाज ऐकू येते. त्याच्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर येऊन जणू आपल्याला पवित्र करत असतात. तुम्ही पहाटेला कुठेही असा. नदीकिनारी,समुद्रावर,डोंगरावर किंवा जंगलात. पहाट आणि तिचं मोहक रूप तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणारच नाही. ही पहाटवेळा तुम्हाला दिवसभराची ऊर्जा प्रदान करेल. 

पहाटेनंतरची वेळ म्हणजे सकाळ. आता दशदिशा उजळलेल्या असतात. साऱ्या सृष्टीत चैतन्य भरून राहिलेलं असतं. माणसाचा, पशु पक्ष्यांचा दिवस सुरु होतो. जो तो आपापल्या कामाला लागलेला असतो. अवघ्या सृष्टीत लगबग सुरु असते. मंदिरातली आरती, धूप दीप आदी सारे सोपस्कार होऊन मंदिरातील मूर्ती प्रसन्न वाटतात. बच्चे कंपनी तयार होऊन शाळेला निघण्याची गडबड असते. गृहिणीची घरातली आणि कामावर जाणाऱ्यांची  वेगळी धांदल सुरु असते. सकाळचे हे रूप वेगळेच असते. पहाट कोणताही मेकअप न करता नैसर्गिक रूपात आपल्यासमोर येते तर नंतर येणारी सकाळ मात्र छानपैकी सुस्नात आणि वेणीफणी करून आलेल्या तरुणीसारखी प्रसन्न भासते. ती जणू आपल्याला सांगते, ‘ चला, आता आपल्या कामांना सुरुवात करू या. दिवस सुरु झालाय. ‘ मग प्रभात समयीचे हे सूर हे हळूहळू मंद होत जातात. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments