श्री विश्वास विष्णु देशपांडे
मनमंजुषेतून
☆ निसर्गरुपे : दुपार… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
निसर्गाची विविध रूपे मला भावतात. सगळीच रूपे तशी मनोहर असतात. अर्थात तशी दृष्टी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दुपार सुद्धा आवडेल. पौर्णिमेची रात्र तर सर्वांना आवडतेच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना अमावास्येची रात्र सुद्धा तेवढीच आवडते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाश प्रकाशमान करतो. समुद्राला भरती येते. रुपेरी चंद्रप्रकाश अवघे विश्व व्यापून टाकतो. कवी, लेखकांच्या प्रतिभेला बहर येतो. पण अमावास्येची रात्रही तेवढीच सुंदर असते. त्यावेळी आकाश म्हणजे जणू चंद्रकळा ल्यालेली एखादी घरंदाज गृहिणी वाटते. चांदण्याची नक्षी तिच्या साडीला जडवलेली असते. हा जरीपट खूप शोभून दिसतो.
खरा निसर्गप्रेमी कोकिळेवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम कावळ्यावर आणि घुबडावर सुद्धा करतो. अशीच निसर्गाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुपार हे निसर्गाचेच रूप आहे हे समजून त्याचा आनंद घेते. गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुले मला आवडतातच पण सदाफुली आणि गवतफुलासारखी फुलंसुद्धा मन मोहून घेतात. तेही निसर्गाचेच सुंदर अविष्कार आहेत.
बहुतेक सगळ्या कवी, लेखकांनी पहाटेच्या वेळेचं रम्य वर्णन केलं आहे. संध्याकाळ आणि रात्रीचंही केलं आहे. पण दुपारचं वर्णन फारसं कोणी केल्याचं वाचनात आलं नाही. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रसंगांचं वर्णन करणारी शेकडो गाणी आहेत पण दुपारच्या वेळेवर लिहिलेली गाणी मला कुठे आढळली नाहीत. या अर्थानं दुपार म्हणजे ‘ अनसंग हिरोईन ऑफ द डे ‘ असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही मला एखाद्या वेळी विचारलं की पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या दिवसांच्या वेळांना तुम्ही स्त्रियांचीच उपमा का देता आहात ?तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण आपल्या मराठीत आपण हे शब्द स्त्रीलिंगीच वापरतो ना ! ती रम्य पहाट, ती प्रसन्न हसरी सकाळ, ती दुपार, संध्याकाळ, रात्र वगैरे. ‘ ती ‘ ऐवजी एखादा पुल्लिंगी शब्द वापरून पहा बरं. तो पहाट, तो सकाळ,तो रात्र वगैरे… सगळी मजा गेली ना !
कधी कधी फोनवर बोलणारी ती बाई अशा शब्दांची फार गल्लत करते, त्या वेळी असं वाटतं की ही समोर असती तर काही तरी सांगता आलं असतं. आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्या व्यक्तीनं फोन उचलला नाही तर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं. ‘ ज्या व्यक्तीला आपण फोन केला आहे, तो व्यक्ती आपला फोन उचलत नाही किंवा उत्तर देत नाही. आता ‘ व्यक्ती ‘ हा शब्द सुद्धा स्त्री लिंगीच वापरला जातो. मग ‘ तो ‘ व्यक्ती कशाला ? पण जाऊ द्या विषय दुसरीकडेच चालला. आपल्या मूळ विषयाकडे येऊ या.
तर पहाटेचा आणि सकाळचा उल्लेख आधीच्या लेखात आपण पहाट म्हणजे अल्लड तरुणी आणि त्यानंतरची सकाळची वेळ म्हणजे वेणीफणी, गंधपावडर करून आलेली सुस्नात तरुणी असा केला. त्यानंतर जेव्हा सकाळचे अकरा वाजण्याचा सुमार होतो, तेव्हा दुपारचे वेध लागू लागतात. आता सकाळच्या या तरुणीचे रूपांतर तीस चाळीस वर्षांच्या गृहिणीत झालेलं असतं. तिला घरच्यांची काळजी असते. सकाळपासून आपापल्या कामात मग्न असलेल्या आपल्या पतीला, मुलाबाळांना भूक लागली असेल, याची जाणीव होऊन ती स्वयंपाकाला लागलेली असते. दुपारी साडेबारा एकच्या सुमारास ती त्या सगळ्यांना मोठया प्रेमाने बोलावते आणि जेवू घालते.
इथे दुपार येते ती आईचे रूप घेऊन. आई जशी आपल्या मुलांची काळजी करते,त्यांना वेळच्या वेळी खाऊपिऊ घालते, तशीच दुपार दमलेल्या, थकलेल्याना चार घास भरवते. आणि चार घास खाल्ल्यावर म्हणते, ‘ अरे लगेच नको लागूस कामाला. जरा अंमळ विश्रांती घे ना. ‘ त्या दुपारच्या कुशीत काही क्षण माणसे विश्रांती घेतात, ताजीतवानी होतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. गाई, गुरं सुद्धा एखाद्या झाडाखाली विश्रांती घेताना दिसतात.
सकाळ आणि संध्याकाळ यांच्या मधली वेळ म्हणजे दुपार. शेतकरी, कष्टकरी, मजूर हे सगळे सकाळपासूनच कामाला जुंपलेले असतात. दुपारी ते एखाद्या झाडाच्या सावलीत बसतात. आपल्या सोबत जी काही चटणी भाकरी आणली असेल ती खातात, दोन घोट पाणी पितात. आपल्या बरोबरच्या व्यक्तींशी गप्पा, हास्यविनोद करतात आणि ती ऊर्जा सोबत घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. या अर्थानं दुपारी ही एक प्रकारची ‘ होरेगल्लू ‘ आहे. ती मनावरचा ताण कमी करते.
जसा ऋतू असेल किंवा जसं हवामान असेल, तशी दुपारची रूपं वेगवेगळी असतात. ग्रीष्मातली दुपार अंगाची लाही लाही करते. कधी कधी तर वाराही बंद असतो. डोंगरावरील, जंगलातील झाडं एखाद्या चित्रासारखी स्तब्ध असतात. अशा वेळी दुपार तुम्हाला सांगते, ‘ बाबारे, बस थोडा. अंमळ विश्रांती घे. उन्हात विनाकारण फिरू नकोस. ‘ ती जणू सांगत असते, ‘ जरा विसावू या वळणावर…’ दुपार आहे म्हणून तर थोड्या वेळाने तुला हवीहवीशी वाटणारी सांज येईल, रात्र येईल आणि पहाटही उगवेल. थोडा धीर धर.
वसंतातली दुपार त्या मानाने जरा प्रसन्न असते. वसंत हा तर कवी, लेखकांचा आवडता ऋतू. मुबलक फळे, फुले उपलब्ध असतात. झाडांना नवी पालवी फुटलेली असते. दसरा दिवाळीला आपण जसे नवीन कपडे परिधान करतो, तशी वसंत ऋतूत निसर्गाचीही दिवाळी असते. जुनी पालवी टाकून देऊन झाडं नवीन पालवी धारण करतात. गुलाबी, पोपटी, हिरवी अशी विविध रंगछटा असलेली पानं दृष्टीस पडतात. या ऋतूत झाडांना मोहर आलेला असतो. त्याचा मंद दरवळ सगळीकडे पसरलेला असतो. या ऋतूत निसर्ग भरभरून रूप, रस आणि गंध प्रदान करतो. अशा ऋतूतली दुपारही छान वाटते. ऊन असतेच पण शीतल वाऱ्याच्या लहरी अंगावर जणू मोरपीस फिरवतात. उन्हाची तलखी कमी करतात.
वर्षा ऋतूतली दुपार बऱ्याच वेळा ढगांच्या छायेनं आच्छादलेली असते. अशा वेळी उन्हाचा तडाखा जाणवत नाही. वर्षा ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी बऱ्याच वेळा हमखास पाऊस असतोच. पण दुपारही कधी कधी पाऊस घेऊन येते. पावसात भिजलेलं तिचं हे रूप आल्हादकारक वाटतं. दुपारी कधी कधी सोसाट्याचा वारा सुटतो. ‘ नभ मेघांनी आक्रमिले ‘ असेल तर अशा वेळी ऊन सावलीचा आणि ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असतो. निसर्गाच्या कॅनव्हासवरचं चित्र सारखं बदलत असतं. अशा वेळी तुमच्यात दडलेला रसिक, कलाकार या निसर्गचित्राला दाद देतो.
अशी ही दुपारची विविध रूपं. तऱ्हेतऱ्हेची आणि मजेमजेची. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीसारखीच मनमोहक रूपे. तिलाही भेटू या. तिचंही स्वागत करत राहू या. तिला म्हणू या…
‘ हे दुपार सुंदरी, तू अवश्य ये
येताना तू नेहमीच चारदोन निवांत क्षण घेऊन येतेस.
दिवसाच्या धामधुमीत तू आम्हाला चार घास प्रेमाने भरवतेस.
विश्रांती देऊन ताजेतवाने करतेस.
तू ये. तू अवश्य ये. तुझं स्वागत आहे. ‘
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈