मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

देव जरी मज कधी भेटला। माग हवे ते माग म्हणाला…..हे गाणं मला फार आवडायचं.

अजुनही आवडतं…तेव्हां विचार करायची, खरंच देव भेटला तर…?नियोजन हा माझा स्थायी स्वभाव असल्यामुळे मी अगोदरच मागण्यांची यादी करुन ठेवली होती…कारण ऊगीच देव घाईत असला तर ऊशीर नको व्हायला…. आपली तयारी असलेली बरी…!! पण देव काही भेटला नाही.जगाचा कारभार सांभाळण्यात इतका गुंतला की माझ्यासारख्या सूक्ष्म जीवासाठी त्याला वेळच मिळाला नाही…

माझी यादी वर्षानुवर्षे तशीच पडून आहे….

आणि आता अलीकडे माझ्या मनात सहज विचार आला, देव नाही तर नाही, त्याचा एखादा सचीव भेटला तर….

शंकराच्या देवळांत नाही का..? आधी नंदीला पुजावे लागते…

मानवाच्या बाबतीतही कुणा स्टारची भेट हवी असेल तर अगोदर सेक्रेटरीशीच बोलावे लागते…..

मग आठवलं…कल्पवृक्ष…!! स्वर्गातला देवांचा सहकारी…तो भेटला तर…?

मी जपून ठेवलेली ती यादी बाहेर काढली…एकेका मागणीवरुन नजर फिरवली……

तशी म्हणा मागण्यांची सवय माणसाला जन्मजातच असते….मानवाचा पहिला ट्याँहा च मुळी मातेच्या दूधाची मागणी करण्यासाठी असतो….कळत नकळत तो आयुष्षभर मागतच असतो….माझ्यासारख्या सरकारी नोकरीतल्या व्यक्तीला तर संप, मागण्या हे नवीन नाहीच….मागण्या पुर्‍या झाल्या तर आनंद …

मागण्या फिसकटल्या तर पुन्हां संप…

पण कल्पवृक्ष एकदाच भेटणार…संधी वाया घालवायची नाही…एका आंधळ्या गरीब बेघर निपुत्रिक दरिद्री माणसाला देव भेटतो…एकच वर देतो ,म्हणतो माग…

तो मागतो, माझ्या विद्याविभूषित पुत्रपौत्रिकांना सुवर्णाच्या माडीवर, रहात असलेले मला पहायचे आहे…..एकाच वरात त्याने सरस्वती ,लक्ष्मी ,संतती  वैभव दीर्घायुष्य, दृष्टी सगळं मागितलं….

कल्पवृक्ष भेटला तर असेच बुद्धीचातुर्य आपल्याला दाखवावे लागेल…

पुन्हा एकदा यादी ऊलट सुलट वाचली….आणि लक्षात आले ही तर पन्नास वर्षापूर्वीची यादी…आता आपण पैलतीरावरचे …संध्यारंग पाहणारे ..एकेका मुद्यावर फुली मारत गेले…हे कशाला..? हे तर आहे.हेही नको.

याची आता काहीच गरज नाही..नव्वद टक्के यादी तर आपली पुरीच झाली आहे.. मग कल्पवृक्ष भेटला तर काय मागायचे?? बघु. करु विचार.

टी.व्ही लावला.

जगभराच्या बातम्या…कुणा कृष्णवर्णीयावर गोळ्या झाडल्या…. चॅनल बदलला. अल्पवयीन दलित बालिकेवर अत्याचार….मी चॅनल बदलत राहिले … संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून…. शेतकर्‍याची आत्महत्या…  करोनाचे बळी… दुष्काळ. .महापूर, अपघात. शैक्षणिक राजकीय सामाजिक भ्रष्टाचार… आरक्षण वाद… सर्वत्र नकारात्मक वातावरण….. मन सुन्न झाले…टी.व्ही. बंद केला…

सर्वत्र द्वेष, मत्सर, चढाओढ…. कल्पवृक्ष भेटलाच तर काय मागायचे?

विंदांची कविता आठवली… घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत…. बस् ठरलं…. कल्पवृक्ष भेटला तर मागायचे….

“बा कल्पवृक्षा, मला तुझे हातच दे…!!!”

© सौ. राधिका भांडारकर

 

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

स्वच्छ सुंदर सकाळ! निळे निरभ्र आकाश! हवेतील तापमानही १९/२० डिगरी सेलसियस्,त्यामुळे सुखद गारवा! आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर लोकांना चालण्यासाठी जवळ जवळ पांच मैल लांबीचा ट्रेल बांधला आहे. दुतर्फा उंच, हिरव्यागार वृक्षांच्या रांगा! त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालायला जा सतत शीतल सावली.

परवा अशीच चालत असतांना मनांत विचार आला वर्षानुवर्ष्ये हे वृक्ष उन्हांत उभे राहून आपल्याला सतत सावली देत असतात, मधूर फळे देत असतात, त्यांच्यावर उमलणार्‍या फुलांच्या सुगंधाने वातावरणांत प्रसन्नता निर्मीत असतात. परोपकार म्हणजे काय ते निसर्गाकडूनच शिकावे. दुसर्‍याच्या जीवनांत आनंद निर्माण करणे हेच यांचे महान कार्य!

मग स्वर्गातील कल्पवृक्ष आणखी वेगळे कसे असतात? असे म्हणतात की कल्पवृक्षाखाली बसून मनांतली एखादी इच्छा व्यक्त केली तर ती ताबडतोब पूर्ण होते. इच्छांची यादी तर खूपच लांबलचक आहे. कधीही न संपणारी. खरोखरच असा कल्पवृक्ष असतो का? आणेल का कोणी त्या वृक्षाला भूतलावर? दिसेल का तो आपल्याला?

चालता चालता माझ्या विचारांची साखळी लांबतच गेली. आता हळूहळू मन बेचैन झाल्यासारखे वाटू लागले. मग walking trail वर अंतरा अंतरावर ठेवलेल्या एका बाकड्यावर मी जरा डोळे मिटून शांत बसले.

काय सांगू ? मला एकदम डोळ्यासमोर लक्ष्मी~विष्णू उभे असल्याचा भास झाला आणि काय आश्चर्य त्या जोडीत मला माझे आई बाबाच दिसले. बाबा विचारत होते,” काय हवं आहे बेटा तुला? तुला जे पाहीजे ते देतो.” मला साक्षात्कारच झाला.

खरेच! आजपर्यंत काय केले नाही माता पित्यांनी आपल्यासाठी?अनेक खस्ता खाल्या, कष्ट केले, आपले सगळे हट्ट पुरविले, आजारपणांत रात्री रात्री जागवल्या. आज समाजांत आपल्याला जे मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांनी दिलेल्या उच्च शिक्षणाने, त्यांनी घातलेल्या सुविचारांच्या खत पाण्याने, उत्तम संस्कारांने!

खाडकन् डोळे उघडले. खूप आनंद झाला.

अरे! कुठला कल्पवृक्ष शोधतो आहोत आपण?

कल्पवृक्षाच्या छत्र छायेतच तर आपण वाढलो!

धन्यवाद!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈