श्री मकरंद पिंपुटकर
मनमंजुषेतून
☆ आमची सरोजखान…! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
Is fat really the worst thing a human being can be ? लठ्ठ असणं हाच माणसाचा सगळ्यात मोठा दोष असू शकतो का ? हॅरी पॉटर पुस्तकमालेच्या प्रख्यात लेखिका जे के राऊलिंग यांना पडलेला प्रश्न.
आणि या प्रश्नाची आठवण होण्याचं कारण होती शाळेतली आमच्या नववीच्या वर्गात असलेली मोहिनी. ती शब्दशः खात्यापित्या घरची होती, मस्त गुबगुबीत, गोलू गोलू होती. आम्ही सगळे तिला मोहिनी नव्हे तर गोलिनीच म्हणायचो.
वर्गातली, शाळेतली सगळीच मुलं तिला वेगवेगळ्या टोपणनावांनी चिडवायची. एवढंच काय, कधी कधी तर वर्गात शिक्षकही तिच्या वाढत्या वजनाची टिंगल करायचे.
या सगळ्याचा परिणाम म्हणून ती कोशात जात गेली, कोणाशी मिसळत नसे, कोणत्या ॲक्टिविटीत सहभागी होत नसे, ना स्पर्धक म्हणून ना प्रेक्षक म्हणून.
पण यंदा नववीचे वर्ष होते, बहुधा पुढच्या वर्षी मान मोडून अभ्यास करायचा म्हणून असेल, या वर्षी स्नेहसंमेलनात तिनं चक्क वैयक्तिक नृत्य (सोलो डान्स) सादर करणार म्हणून नाव नोंदवलं.
मी स्वतः निवेदक असणार होतो, त्यामुळे सरावापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत मला सगळ्याच गोष्टी जवळून न्याहाळता येणार होत्या.
ज्यांना ज्यांना मोहिनी डान्स करणार आहे हे कळलं ते सगळेच तिने सरावासाठी नोंदवलेल्या वेळी, सगळं कामधाम टाकून तिथे उपस्थित होते.
स्टेजवर लाईट होता, बाकी प्रेक्षागृहात अंधार होता. स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारेच प्रेक्षागृहात आपल्या सरावाची पाळी येण्याची वाट पाहत बसले होते.
मोहिनी स्टेजवर आली, त्या प्रखर प्रकाशाला ती adjust होत होती तोवरच अंधारातून आवाज आला, “स्टेजचा विमा उतरवला आहे ना रे ? आज तुटणार ते.”
ती गोरीमोरी झाली.
“नाही रे, त्याच्या आधी ही जाडी अम्माच फुटेल.”
मोहिनीला या कुचेष्टा सहन झाल्या नाहीत, ओक्साबोक्शी रडत, चेहरा ओंजळीत लपवत ती तिथून जी पळून गेली ती परत सरावाला आलीच नाही.
माझ्या दृष्टीने तिच्या सहभागाचा तो the end होता.
प्रत्यक्ष स्नेहसंमेलन आमच्या शहरातील प्रख्यात नाट्यगृहात होते. अगदी बाल्कनीसुद्धा खचाखच भरली होती. विद्यार्थी – पालक सगळेच आले होते. कार्यक्रम सुरू झाले. हशा, टाळ्या, हुर्रे, हुर्यो – सगळं पूर्ण जोशात होतं. आणि माझं लक्ष कार्यक्रम पत्रिकेतील पुढच्या नावाकडे गेलं. चक्क मोहिनीचं नाव होतं. मी चक्रावलो, सरांना म्हटलं, ” सर, ती नंतर कधीच सरावाला आली नाही. ती आज तयारी न करता स्टेजवर आली, तर फार फजिती होईल तिची, सर.”
सर काही उत्तर देणार एवढ्यात चालू असलेला कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या निवेदकानं मोहिनीचं नाव घोषितसुद्धा केलं.
आणि सरावाच्या वेळचीच पुनरावृत्ती झाली. मोहिनी स्टेजवर येताच प्रेक्षकांत एकच खसखस पिकली. काहींनी उपहासाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, हुर्यो उडवायला सुरुवात केली.
मी बारकाईने मोहिनीचं निरीक्षण करत होतो. हे सगळं सुरू झाल्यावर, आजही सुरुवातीला क्षणभर तिचा चेहरा पडला. पण आज ती बावरली नाही, ठामपणे जागेवर उभी राहिली.
लोकांना जेव्हा हे लक्षात आलं की ही पळ काढत नाहीये, तेव्हा आश्चर्याने – अचंब्याने क्षणभर शांतता पसरली, आणि मोहिनीने तोच क्षण नेमका पकडला आणि तिच्या नृत्याला सुरुवात केली.
उडत्या चालीचं एक लोकप्रिय हिंदी गाणं होतं ते, लोकांनी त्यांच्याही नकळत ठेका धरला. मोहिनी लयबद्ध नृत्य करत होती. तिच्या शरीरयष्टीमुळे तो डान्स ती वेगळ्या प्रकारे सादर करत होती पण अतिशय आत्मविश्वासाने पेश होत होती.
सुरुवातीला टर उडवण्यासाठी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांचं रुपांतर कौतुकाच्या टाळ्यांमध्ये कधी झालं हे प्रेक्षकांनाही कळलं नाही.
Veni, Vidi,Vici – मोठ्ठे युद्ध जिंकल्यावर ज्युलियस सीझर म्हणाला होता, तेच आज मोहिनी म्हणू शकत होती.
ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली.
आणि हे सोपं नव्हतं. सगळे तिची टर उडवायला टपून बसले आहेत हे तिला ठाऊक होतं. तिलाही आतून भीती वाटत असेलच. तिनं कसून मेहनत घेतली होती आणि खमकेपणाने, खंबीरपणाने सगळ्यांच्या समोर उभी राहिली होती.
तिला इतरांच्या प्रशस्तीपत्रकांची, प्रमाणपत्रांची गरज नव्हती, पण तिचं तिलाच सिद्ध करायचं होतं की आपण हे करू शकतो.
आपल्याच प्रश्नाचं उत्तर देताना जे. के. राऊलिंग म्हणतात, ‘ Is fat worse than being vindictive, jealous, shallow, vain, evil or cruel?’ .. सूडवृत्ती, मत्सर, उथळपणा, गर्विष्ठपणा, दुष्टपणा, क्रूरता – हे सगळे तर लठ्ठपणापेक्षा कितीतरी वाईट आहेत.
आता आमच्या मोहिनीला कोणी गोलिनी म्हणत नाही. आम्ही आता तिला आमची सरोज खान म्हणतो.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈