सौ. सुनीता पाटणकर
मनमंजुषेतून
☆ मैत्री… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
मैत्री मैत्री मैत्री,
काय असते ही मैत्री ? .. नातं कोणतं हे?
नात्याच्या पार पल्याड काहीतरी…. जिवलग, सखी, मैत्रीण, मित्र …. हीच खरी मैत्री.
या मनीचं त्या मनाला सहज, चटकन, उमगतं, भावतं .. ही मैत्री.
शब्दांच्या पलीकडील उमगतं .. ही मैत्री….. डोळ्यातून कळतं ही मैत्री.
आवाजातून समजतं ही मैत्री,…. हालचालीतून जाणवतं ही मैत्री.
… मनाच्या गाभाऱ्यात घट्ट रुतून बसते ही मैत्री,
आनंद, दुःख, समाधान, असमाधान, राग, प्रेम,जळफळाट, तडफड.. यातलं काहीही ..
.. .. व्यक्ततांना आत बाहेर नाही,ही मैत्री,
भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना …. हात देते ही मैत्री,
सल्ला, मसलत, मार्गदर्शन करते, ही मैत्री. …
सप्तसुर छेडताना,अलवार मिंड देणारी ही मैत्री,
प्रेम, धमकी, योग्य-अयोग्य हे समजवणारी ही मैत्री,
चूक घडता,सावरायला येणारी ही मैत्री,
मदत मागणारी आणि मदत करणारी…. ही मैत्री.
हक्काने रागावणारी, झटकन राग विसरून जाणारी ही मैत्री,
मैत्रीची व्याख्या नाही,
भावभावनांचे रेशीम धागे, म्हणजे मैत्री !
ओढ भेटीची म्हणजे मैत्री ! गुज सांगते,असते मैत्री !!!!
आयुष्यात माझिया, मोल तिचे अनमोल,
तारले तिनेच मला, …. या संसार सागरातून…
© सौ. सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈