डॉ. प्राप्ती गुणे
☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆
लहान असतो तेव्हा इतकं अप्रूप असतं ना ‘फ्रेंडशिप डे’ चं…
फ्रेंडशिप बँड निवडताना माझी अमुक रंगाची लेस फिक्स म्हणजे फिक्स. सगळ्यांना कळायला हवं आणि लक्षात राहायला हवं की हा फ्रेंडशिप बँड मी बांधलाय. पण माझ्या बेस्ट फ्रेंडला मात्र हा स्पेशल बँड हां ! यात मणी आहेत, ह्यात तिचं नाव ओवून घेतलंय, तिच्यासाठी स्पेशल अंगठी घेतलीये, वगैरे वगैरे.
लहानपणीचे दिवस, नजरेसमोर आता बसलेल्या चिमणीने भुर्रकन उडून जावे, तसे पटकन निघून जातात. मोठे झाल्यावर बालपणीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आपण जणू लहानपणीच्या स्वतःलाच शोधत असतो. त्यांच्या डोळ्यात आपल्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे प्रतिबिंब आपल्या आठवणींना उजाळा देत राहतं.
शाळेतून कॉलेजात, कॉलेजमधून ऑफिसमध्ये जाताना काही जणांची आपल्या आयुष्यात भर पडते, तर काहीजण नकळत वजा होतात. ही बेरीज वजाबाकी होता होता काही जण मात्र या हिशेबात नेहमी आपल्या सोबत राहतात. ही शिल्लक म्हणजेच आपली खरी मिळकत असते, बरं. हा आपला खजिना म्हणजेच आपले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !
… कधी आपण एकाकी बसल्यावर हलकेच पाठीवर हात ठेवणारे…
… आपण इतक्यात रडणारच की तितक्यात पांचट जोक मारून हसवणारे….
… एकाच गोष्टीवरची वारंवार चर्चा, थोडीशी नापसंतीने, पण हजार वेळा मन लावून ऐकणारे….
… टेन्शनमध्ये असलो की ‘ सब ठीक हो जाएगा ‘, ‘ ऑल इज वेल, जस्ट चील ‘, असे टिपिकल डायलॉग मारणारे….
… व्हाट्सअप वरच्या एका रिप्लाय वरून तुमचा मूड ओळखणारे….
… तुमचं दिखाऊ हसू आणि तुमचं खळखळणारं गडगडाटी हास्य तोंडपाठ असलेले….
… असे हे आयुष्यातले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !
मोठे झाल्यानंतर मैत्रीची परिभाषा बदलत जाते. कारण वयापरत्वे माणूस अधिक गुंतागुंतीचा होतो
पण जर कोणती गोष्ट तशीच राहत असेल तर ती असते ” भावना “!…
… प्रत्येक संकटात मित्रासोबत खंबीर उभं राहायची भावना….
… मित्राला काहीतरी दुखावत असेल तर त्या गोष्टीपासून मित्राला प्रोटेक्ट करायची भावना….
… मित्राला मनसोक्त व्यक्त होण्यासाठी त्याचा आधार बनायची भावना….
… मित्राचे सुखदुःख ऐकून त्याला ‘ एक्सपर्ट ॲडव्हाइस ‘ द्यायची भावना…
… मित्र जास्त हवेत उडायला लागला तर त्याला जमिनीवर आणायची आणि मित्र अंधारात असेल तर त्याला प्रकाशात खेचून आणायची भावना…..
… आणि ह्या भावनेलाच तर “मैत्री” म्हणतात.
… हा लेख माझ्या सगळ्या ‘ स्पेशल फ्रेंडशिप बँडस ‘ साठी समर्पित…
© डॉ. प्राप्ती गुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈