श्री मंगेश मधुकर

स्वपरिचय

शिक्षण –B A, MSW, PGDPC

  • व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करीत आहे.
  • वाचन आणि लेखनाची आवड. विविध नामवंत वर्तमान पत्रामध्ये सामाजिक प्रकल्पा विषयी लेखन प्रसिद्ध तसेच सामाजिक आशय असलेल्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • २०१६ मध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश या नावाने लघुकथा लिहिली. ती व्हॉटसपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजतागायत सलग 373 रविवार विविध विषयांवरच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • संडे डिश या रजिस्टर ब्रॅंड नावाने दर रविवारी सकाळी प्रसिद्ध होणारी लघुकथा वाचणं हा अनेक रसिकांसाठी रविवारचं नवं रुटीन झालयं.
  • अभिवाचन,ऑडिओ,व्हिडीओ,पुस्तक या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वाचकांपर्यंत पोहचलेल्या संडे डिशचं पुस्तकही प्रसिद्ध झालंय.

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर

साल १९८६…

पावसाळ्याचे दिवस,मी सातवीत असतानाची गोष्ट.संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट,लाईट गेलेले,सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.

’काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………

……. माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना,नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. 

“ नाना,तुम्ही रडताय ”

“ नाही रे.पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला..  असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.

—- 

साल २०२3 

पावसाळ्याचे  दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम,जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …. ..चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला  पाहून बायको प्रसन्न हसली.

“देवाची कृपा !! सुखरूप आलात”

“काय भयानक पाऊस आहे. ”

“हो ना.तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार,फार भीती वाटत होती.”

“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”

“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”

“एवढ्या पावसात फिरायला??”

“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत.”

“छत्री??”

“नाही नेली. मी सांगितलं,जाऊ नका, तरीही बाहेर पडले.” 

“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”

“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते.  मग जा”

“नको.जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा !!!” 

अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत,रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं…..   ‘ काही गरज नव्हती.एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.

मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना  दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.

“ नाना,नाना मी बोलतोय.कुठे आहात ”..  काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो,हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील, ..  ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.

पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा  फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची  रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना,नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला. 

“नाना !!!” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.

“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.

“मी आहे काळजी नको” 

“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती.वाटलं की आता……” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.

“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”

“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास.”

“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता.” नाना फक्त हसले….. 

… घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.

काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं.  फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार …..

सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले…. 

“बाबा,फोन का रिसिव्ह करत नाही”

“पाऊस होता म्हणून…”

“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो” . 

नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments