सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने… 🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
“फाळणीमुळे भारत- पाकिस्तान हे दोन देश फक्त भौगोलिक दृष्ट्या विभक्त झालेत असे नाही, तर हजारो वर्षांपासून नांदत असलेली संस्कृती विभागली गेली. या दोन देशात एक दिलाने राहणाऱ्या कोट्यावधी नागरिकांची मने दुभंगली, त्यामुळे फाळणी ही अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे भळभळणारी एक जखम म्हणून या विशाल खंडप्राय देशात राहणाऱ्या लोकांच्या काळजात ठसठसत राहिली आणि त्याचे प्रतिबिंब सहाजिकच साहित्यात उमटले. कृष्णाजी वामन पेंडसे हा सव्वाशे वर्षांपूर्वी कोकणात जन्मलेला माणूस, तारुण्यात धाडसाने कराचीला नोकरीसाठी जातो. आपल्या कर्तबगारीने तेथे अधिकार पद मिळवतो, पण फाळणीच्या जबरदस्त तडाख्याने कोकणात माघारी येतो. या दैव दुर्विलासात त्याला त्याची सहधर्मचारिणी खंबीरपणे साथ देते.” —–
— प्रदीप गांधलीकर यांनी मंगला काकतकर यांच्या “आनंदाचे डोही आनंद तरंग” या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.
(कै) मंगला काकतकर ही माझी आत्त्या, जन्मापासून कराचीत राहिलेली आणि फाळणीनंतर भारतात येऊन जिने खडतर आयुष्याला तोंड दिले. संगमनेर येथे शिक्षिकेची नोकरी केली व राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कार मिळवला ,अशी अतिशय कर्तृत्ववान ! तिच्या सांगण्यातून आणि लेखनातून त्यांनी अनुभवलेली फाळणी आम्ही पाहिली !
एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणाऱ्या व फाळणी झाल्यावर अचानक राहायलाही जागा नाही अशी परिस्थिती ! पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो त्याप्रमाणे सर्व कुटुंबाने भरारी घेतली व नव्या आयुष्याला सुरुवात केली.
तिच्या पुस्तकाची सुरुवातच “8 फेब्रुवारी 1947 ,या दिवसाची !” गौरी सदन “कराची येथे नवीन घराची वास्तुशांती ! पण वास्तुशांतीला फक्त घरचे लोक व दोन भटजी ! देशातील वातावरणच अस्थिर होते. तेव्हा जे अनुभवले ते तिने शब्द रूप केले, पुढील पिढीला ते कळावे म्हणून !
“फाळणी नंतरचे काव्य” या लेखात ती सांगते, ” आमच्या जन्मापासून कराचीचे आणि आमचे नाते होते. कराची कधी सोडावी लागेल असे मनातही आले नव्हते. कराचीत दंगली उसळल्यावर सर्व कुटुंब मनोरा (कराची पासून जवळच असलेले बेट,जिथे आजोबांनी observatory त नोकरी केली ! ) येथे उदास व खिन्न मनस्थितीत गेले, केवळ दोन बॅगा बरोबर घेऊन ! त्यानंतर मिळेल तसे हे सर्व कुटुंब भारतात परतले. आत्त्या सांगायची, ” वडिलांना फाळणीमुळे असे काही घडेल याची कल्पनाच आली नव्हती. इंग्रजी राजवट गेली, पाकिस्तानची येईल !सर्वसामान्य लोकांना काय त्रास होणार?” पण घडले भलतेच ! पाकिस्तानी लोकांनी त्यांना घराबाहेर काढले । सामानाची लुटालूट केली. त्यानंतर सर्व कुटुंब जसं येता येईल तसा प्रवास करून (पाच दिवस बोटीचा) मुंबईला आले, तिथून पुण्याला आले आणि काही काळाने कोकणात जाऊन स्थिरावले !
७५ वर्षे होऊन गेली या कालखंडाला ! पण माझ्या माहेरच्या पेंडसे कुटुंबाने भोगलेल्या फाळणीच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी जाग्या होतात आणि नकळत आपण हे सगळे भोगणाऱ्या कुटुंबाच्या साखळीची एक कडी आहोत ही जाणीव मनाला बोचत राहते !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈