डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या लोकांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. सध्या एकूण १०० सेवेकरी या टीममध्ये आहेत.
या महिन्यातही खराटा पलटणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
रस्त्यावर वृद्ध याचक पावसात भिजत आहेत, त्यांना रेनकोट देणे गरजेचे आहे…. परंतु सरसकट हे रेनकोट न वाटता, हे जिथे बसतात तिथली स्वच्छता यांच्याकडून करून घेऊन यांना सन्मानाने रेनकोट दिले आहेत.
…. हे रेनकोट देताना मी त्यांना सांगितलं आहे की ही रेनकोट भीक म्हणून देत नाही, तुमच्या कष्टाची मजुरी म्हणून देत आहे.
…. आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा “मजुरी” म्हणून द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे.
दोन पाच रुपये देऊन पुण्य मिळवण्याच्या मागे लागू नका, पुण्य इतके स्वस्त नाही…! दोन पाच रुपयात पुण्य विकत घ्यायची लोकांची सवय सुटली, तर भीक मागणाऱ्या लोकांची भीक मागण्याची सवय सुद्धा नक्की सुटेल…. ! माझं हे वाक्य कदाचित कोणालातरी बोचेल परंतु माझा नाईलाज आहे, सध्याची हीच वस्तुस्थिती आहे….!!!
रस्त्यावर भिक्षेकरी दिसायला नको असतील, तर तुम्ही भीक देणे बंद करा !!!
“एका दिवसात” हे होणार नाही…. परंतु “एके दिवशी” नक्की होईल…
भीक नको बाई शिक
१. मागील दोन वर्षांची फी भरली नाही म्हणून शाळेने ऍडमिशन देण्यास नकार दिला.. या मुलीची दोन्ही वर्षांची फी भरून पुन्हा शाळेत तिला ऍडमिशन घेऊन दिले आहे.
२. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असलेल्या आणखी अनेक मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य दिले आहे. शाळा कॉलेजच्या फी भरून झाल्या आहेत.
दुर्बल घटकातील अशाच आणखी ५२ मुली- मुलांना तुम्हा सर्वांच्या साथीने शैक्षणिक मदत करत आहोत… !
यातील आमच्या एका मुलाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये Bsc Computer Science, साठी मागील वर्षी प्रवेश घेऊन दिला, तो प्रथम वर्षात शिकत आहे, हेच मुळात विशेष… !!
आज रिझल्ट लागला आणि तो A+ ग्रेडने उत्तीर्ण झाला…!
जिचे पालक भीक मागत आहेत, अशी मुलगी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) करत आहे. ती सुद्धा A+ ग्रेडने उत्तीर्ण झाली…!
आनंद व्यक्त करण्यासाठी खरंच माझ्याकडचे शब्द संपले… !!
त्यांचे पालक म्हणून आम्ही जे काही करत आहोत, त्याचे त्यांनी चीज केले… !!!
त्यांना आम्ही जी काही शैक्षणिक मदत केली, खरंतर ती तुम्हा सर्वांकडून आमच्यापर्यंत आली आहे…
…. आपण सर्वजण त्यांचे आणि आमचे सुद्धा पालक झालात… आणि म्हणून त्याचं हे यश आपल्या पदरात घालत आहे…
…… आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत.
भिक्षेकरी ते कष्टकरी
१. भीक मागणारं संपूर्ण एक कुटुंब… कुटुंबातील प्रौढ महिला पूर्णतः अपंग. या ताईला नवीन व्हीलचेअर देऊन, या कुटुंबाला रस्त्यावर खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.
२. अनेक वर्षे आजारी असणारी एक प्रौढ व्यक्ती …यांनाही या महिन्यात खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.
३. पॅरालीसीस झालेली एक प्रौढ व्यक्ती… यांचा पूर्वी सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय होता…. पुढे आयुष्याचं चाकच पंक्चर झालं…! ‘ मला सर्व साहित्य घेऊन द्या, मी मला जमेल तसं पुन्हा काम सुरु करतो ‘, – त्यांच्या या जिद्दीला सलाम करत सायकल रिपेअर करण्याचं सर्व साहित्य यांना घेऊन दिलं आहे. बाणेर रोड येथे हा व्यवसाय रस्त्यावर सुरू आहे…! एकदा त्यांची कर्मकहाणी सांगत असताना ते मला कळवळून म्हणाले होते, ‘ माज्याच लोकांनी माजे पायओढले हो…! ‘
मी म्हणालो होतो, ‘ हरकत नाही बाबा, आपण आनंद यात मानायचा की, पाय ओढण्यासाठी का होईना… पण शेवटी आपल्या पायापाशीच बसावं लागलं ना त्यांना… !’
– यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून, नव्या दिवसाची सुरुवात करणारा, “सूर्योदय” वाटला मला तो चेहरा…. !!!
घर देता का घर ?
रेनकोट आणि छत्री —- रस्त्यावर वृद्ध निराधार याचक पावसात भिजत आहेत यांना छत्री किंवा रेनकोट द्यावेत असं वाटलं. पण अशा सरसकट वाटण्याने आपला हात पुन्हा वर राहणार आणि त्यांचा हात खाली…. एकूण काय एक वेगळ्या प्रकारची भीकच ती… !
आणि मग ते जिथे बसतात त्या परिसराची स्वच्छता करवून घेऊन त्यांना चांगल्या क्वालिटीचे रेनकोट किंवा छत्र्या सन्मानाने देत आहोत. सफाई भी सम्मान भी….. यांना छत्री आणि रेनकोट ची “किंमत” नाही समजली तरी चालेल… परंतु देणाऱ्याच्या भावनेचं त्यांना “मोल” कळावं …
…. हात फक्त भीक मागण्यासाठी नसतात, कष्ट करून सन्मानाने जगण्यासाठी असतात, हे बिंबवण्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम…. !!!
मनातलं काही ….
काम करणाऱ्या सर्वांना रेनकोट वाटून झाले…. एक रेनकोट मी स्वतःसाठी ठेवला…. पुढे गेल्यानंतर मला एकाने रेनकोट मागितला… मी मग माझाच रेनकोट त्याला दिला. यानंतर पुढील स्पॉटवर गेलो, तिथे एक व्यक्ती छत्र्या वाटत होती…. काम करत असताना धो धो पाऊस सुरू झाला…. माझा रेनकोट मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझ्याकडे आता काहीही साधन नव्हते…. ! मी भिजलो…. माझ्याकडचे सर्व साहित्य भिजुन गेले …. !
तेवढ्यात एक भीक मागणारे वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि छत्री माझ्या हातात देऊन ते स्वतः तिथून भिजत निघाले…. !
मी त्यांच्या मागे जात म्हणालो, ‘ अहो, तुम्हाला मिळालेली छत्री तुम्ही मला कशाला देताय ? ठेवा तुम्ही….! ‘
ते बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘ मी भीजलो तर मी एकटाच भीजेल… पण तू भिजलास तर हजार लोक भिजतील… माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे…. !’
आभाळातल्या पावसाशी माझे अश्रू स्पर्धा करू लागले…. !
ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची….. कारण त्या दिवशी कोसळणाऱ्या आभाळाला थोपवणारा मला एक बाप मिळाला…. !!!
प्रणाम…. !!!
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈