सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
” परातभर लाह्या त्यात बंदा रूपया” असं कोडं सासूबाई माझ्या मुलीला घालत असत आणि मग त्याचे उत्तर त्याच देत असत, “आकाशभर चांदण्या, मध्ये असलेला चांदोबा!”
मनाच्या कढईत या आठवणींच्या लाह्या फुटायला लागल्या की त्या इतक्या भरभरून बुट्टीत जमा होतात की ती बुट्टी कधी भरून ओसंडून वाहू लागते ते कळतच नाही!”
नागपंचमी जवळ आली की आमच्या घरी लाह्या ,तंबिटाचे लाडू,मातीचे नागोबा तयार करणे, या सगळ्या गोष्टी सुरू होत असत ! त्यामुळे पंचमीच्या लाह्या म्हटल्या की मला सासूबाई डोळ्यासमोर येतात. आपुलकीने, उत्साहाने सर्वांसाठी लाह्या घरी करणाऱ्या ! सांगली- मिरजेकडे घरी लाह्या करण्याचे प्रमाण बरेच होते. आषाढी पौर्णिमा झाली की लाह्या करण्याचे वेध आईंना लागत असत !
सांगलीत असताना आमच्या घरी लाह्या बनवणे हा एक खास सोहळा असे. शनिवारच्या बाजारातून खास लाह्यांची यलगर ज्वारी मी आणत असे. ती ज्वारी आणली की मग लाह्या केव्हा करायच्या तो वार ठरवून आई तयारीला लागत. त्यासाठी मोठी लोखंडाची पाटी बाईकडून घासून घ्यायची. ज्या दिवशी लाह्या करायच्या, त्याच्या आदल्या दिवशी रात्री चाळणीत ज्वारी घेऊन त्यावर भ रपूर गरम पाणी ओतले जाई. याला ‘उमलं घालणं ‘ असं म्हणतात. ते पाणी निथळले की त्यावर पंचा किंवा सुती पातळ दाबून ठेवत असत ! हे सर्व त्यांच्या पद्धतीने चालू असे. सकाळी उठून ती ज्वारी जरा कोरडी होण्यासाठी पसरून ठेवायची. लाह्या फोडायच्या म्हणून चहा, आंघोळ वगैरे कामे लवकर आटपून त्या तयारी करत असत !
गॅसच्या शेगडीवर मोठी लोखंडी पाटी ठेवली जाई. एका रवीला कापड गुंडाळून त्याचे ढवळणे केले जाई. तसेच लोखंडी पाटीवर टाकण्यासाठी एक कापड घेतलेले असे. शेजारीच एक बांबूच्या पट्ट्यांची टोपली (शिपतर) लाह्या टाकण्यासाठी ठेवले जाई. एवढा सगळा जामानिमा झाला की आई लाह्या फोडायला बसत. लोखंडी पाटी चांगली तापली की, चार ज्वारीचे दाणे टाकून ते फुटतात की नाही हे बघायचे आणि मग मूठभर ज्वारी टाकून लाह्या फोडायला सुरुवात करायची ! मुठभर ज्वारी टाकून रवीने जरा ढवळले की ताडताड लाह्या फुटायला सुरुवात होई आणि त्या बाहेर पडू नयेत म्हणून त्यावर छोटे फडके टाकले जाई. त्या लाह्यांचा फटाफट आवाज येऊ लागला की माझ्या मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटत ! घरभर लाह्यांचा खमंग वास दरवळत असे. एक किलो ज्वारीत साधारणपणे मोठा पत्र्याचा डबा भरून लाह्या होत असत ! मग काय आनंदी आनंदच ! लाह्या सुपामध्ये चांगल्या घोळून घ्यायच्या. खाली राहणारे गणंग वेगळे काढायचे. लाह्या गरम असताना मिक्सरवर लाह्यांचे पीठ करायचे. तरी बरं आमच्या घरी ‘जाते’ नव्हते, नाहीतर माझ्या आजोळी लाह्यांचे पीठ लगेच जात्यावर काढले जाई !
मग सासुबाई दिव्याच्या अवसेला समयीसाठी आणि नागपंचमीच्या नागाच्या पूजेसाठी लाह्या वेगळ्या काढून ठेवत. मग तो मोठा लाह्यांचा डबा आमच्या ताब्यात येई. भरपूर शेंगदाणे घालून फोडणीच्या लाह्या, तर कधी तेल, मसाला, मीठ लावलेल्या लाह्या, आंब्याचे लोणचे लावून लाह्या, दुपारच्या खाण्यासाठी असत. त्या किलोभर ज्वारीच्या लाह्या खा ण्यात आमचे आठ पंधरा दिवस मजेत जायचे !
आता गेले ते दिवस ! अजून कदाचित सांगली मिरजेकडे हा लाह्या फोडण्याचा कार्यक्रम होत असेल, पण पुण्यात आल्यापासून गेली ती यलगर ज्वारी आणि त्या पांढऱ्या शुभ्र, चुरचुरीत खमंग लाह्या ! दुकानातून छोट्या पुडीतून लाह्या आणायच्या नैवेद्यासाठी । आत्ताच्या मुलांना मक्याचे पॉपकॉर्न आवडतात, पण आपले हे देशी पॉपकॉर्न फारसे आवडत नाहीत बहुतेक ! त्यामुळे लाह्या घरी कशा बनवतात तेही त्यांना माहित नाही ! असो …. कालाय तस्मै नमः!!
श्रावणाचा सुरुवातीचा सण म्हणजे नागपंचमी ! त्यादिवशी नागोबाला लाह्यांचा नैवेद्य दाखवतात .म्हणून या लाह्या फोडण्याचे महत्त्व ! निसर्गाशी जवळीक दाखवणाऱ्या आपल्या अनेक सणांपैकी नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण ! सांगलीजवळ बत्तीसशिराळा येथे नागपंचमीला मोठी यात्रा असते. तिथे नाग, साप यांची मिरवणूकच काढली जाते. आम्ही पूर्वी बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव पाहिला आहे .
श्रावणातील सणांची लगबग या दिवसापासून सुरू होते. झाडाला झोका बांधून मुली मोठमोठे झोके घेतात, फेर धरून गाणी म्हणतात. हाताला मेंदी लावतात, नवीन बांगड्या भरतात. माहेरवाशिणी नाग चवतीचा उपास करतात. चकल्या, करंज्या फराळाला बनवतात. ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर उभे राहते. आत्ताही माझे मन त्या जुन्या आठवणींबरोबर श्रावणाची गाणी गात फेर धरू लागले आहे !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈