सौ. मंजुषा सुनीत मुळे
☆ माझ्या प्रिय भारतियांनो… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मु. पो.- ६८⁰ द. अक्षांश
दक्षिण ध्रुव, चंद्र
उपग्रह – चंद्र
ग्रह – पृथ्वी
दि. २३ ऑगस्ट २०२३
माझ्या प्रिय भारतीयांनो,
सर्वांना माझा स. न. वि. वि.
मी इकडे चांदोमामाच्या घरी सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आजची चंद्रमोहीम फत्ते केली न् भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अगदी भारावून गेलोय मी! तब्बल ४० दिवसांचा अथक प्रवास…. लाख्खो किलोमीटरचा! तसं पाहिलं तर, मी खूप दमलोय…. पण तुम्ही सर्वजण माझी खुशाली जाणून घ्यायला उत्सुक असाल आणि काही चांगली गोष्ट झाल्यावर ती आपल्या माणसांना शेअर केली की, आनंद अजून वाढतो ना! म्हणून पोहोचल्याबरोब्बर हे पत्र लिहीत आहे.
दि. १४ जुलैला अवघ्या भारतीयांच्या साक्षीने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. उण्यापुऱ्या दीडशे कोटी शुभेच्छांचे गोड ओझं सोबतीला होतेच. हुरहूर, उत्सुकता, भीती आणि आपणां सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा…. यामुळे थोडं दडपण आलं होतं खरं! त्याचबरोबर चांदोबाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान ‘आपल्याला’ मिळणार म्हणून जाम खूष पण होतो !
पृथ्वीमातेपासून दूर जाताना पाय निघत नव्हता. थोडे दिवस तिच्याभोवतीच घुटमळत होतो खरा… पण दि.१ ऑगस्टला मनाचा हिय्या केला आणि चांदोबाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. त्याच्याभोवती फिरत फिरत थोडा अंदाज घेतला. माझा दादा चंद्रयान-२ ने केलेल्या चुका (चुका नव्हे…. थोडा चुकीचा अंदाज) टाळत हळूहळू चांदोबाच्या जवळ जाऊ लागलो. आणि आश्चर्य…. चांदोबाच्या अगदी जवळ गेल्यावर तिथे दादानं, चंद्रयान-२ ने ‘welcome buddy’ म्हणत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दादाने केलेल्या स्वागतनं मला अजूनच स्फूरण चढलं. योग्य अशी जागा शोधून soft landing करत अलगदपणे चांदोबाजवळ गेलो. अगदी प्रेमभरानं स्वागत केलं त्याने माझं! इतका लांबचा प्रवास हिरीरीने पार पाडल्याबद्दल जवळ घेऊन कौतुकानं माझी पाठ थोपटली. त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं. आत्ता तिथे पृथ्वीवर तुम्ही सर्वजण माझ्या यशस्वी landing चा सोहळा ‘ Yesssssssss, we have done it ‘ म्हणत जल्लोष करताहात. हळूच डोळ्यांच्या कडांचं पाणी टिपत एकमेकांना wish करता आहात. हे मी इतकं लांबवर असूनही अनुभवतोय. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मी पूर्ण केलंय, याचं मला खूप खूप अभिमान वाटतोय. आपला भारत- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ! एकदम भारी वाटतंय बुवा! भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, हे नक्की…. अर्थात यामागे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांंचे अपार कष्ट आहेत आणि तुमच्या सदिच्छाही !
आणि अरे हो ! रशियाचे चंद्रयान Luna-25 फक्त १० दिवसच प्रवास करुन चंद्रावर पोहोचणार होतं…. तेही माझ्यानंतर निघून माझ्याआधी ! पण उतरताना त्याचं क्रॅश लॅंडिंग झालं. So sorry ! मग माझा ४० दिवसांचा प्रवास ससा-कासवाच्या गोष्टीसारखा ’ slow but steady wins the race ‘ प्रमाणे झालाय; असंच म्हणायला हवं, नाही का ?
असो…. आता थोडा फ्रेश होऊन लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत करायच्या कामांची भली मोठ्ठी यादी आहे. विक्रम व प्रज्ञान यांच्या मदतीने प्रयोग, अभ्यास, निरीक्षणेही करायची आहेत. इथं पाणी आहे का? हे पहायचं आहे. विविध नमुने गोळा करायचे आहेत. जमलं तर चंद्रयान-२दादाला भेटणार आहे मी. अर्थात इथे घडणारी प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी पृथ्वीवर कळवत राहणार आहे. एक गंमत सांगू? इथं गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. त्यामुळे अगदी तरंगत तरंगतच चालल्यासारखं वाटतं इथे ! मज्जाच मज्जा वाटतीय….
फावल्या वेळात चांदोबाशी गप्पा मारायच्या आहेत. ‘ तू एक उपग्रह नाही, आमचा नातलग आहेस. बालगोपाळांचा चांदोमामा आहेस. ते ‘चांदोमामा, चांदोमामा भागलास का?’ म्हणतच जेवतात. अंगाईगीतात तू आहेस. आमची आई तुला भाऊ मानते. तुला पाहिल्यानंतरच आमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुटतो. तुझ्या वाटचालीनुसार भारतीय महिन्याची तिथी, सणवार साजरे होतात. युवतींच्या सुंदर चेहऱ्याला तुझी उपमा देतात( ते कितपत योग्य? इथं आल्यावर मला ते सत्य कळ्ळलं बरं) प्रेमीजन तुझीच साक्ष ठेवून आणाभाका घेतात. अनेक गाण्यांतही तू गुंफला आहेस….’ अशा खूप खूप गोष्टी त्याला सांगणार आहे.
फारसं लिहीत नाही. बाकीचं नंतर सविस्तरपणे लिहीन. कामासंदर्भातील माहिती व फोटो updates पाठवत जाईन ! एक सांगू….. हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर कितीतरी वेळा रोमांच उभे राहिलेत आणि पत्र वाचताना तुमच्याही अंगावर उभे राहणार, हे नक्की !
पुन्हा एकदा …. I am proud to be an Indian! 🇮🇳
कळावे,
आपल्या सर्वांचा लाडका,
चांद्रयान -३
पत्ता –
मु. पो. – प्रत्येक भारतीयाचे हृदय
देश – भारत
खंड – आशिया
ठळक खूण – कर्क वृत्त
(हिंदी महासागराजवळ)
ग्रह – पृथ्वी (सूर्यमालेतील तिसरा ग्रह)
मंदाकिनी – आकाशगंगा
लेखक : अज्ञात.
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈