डॉ.सोनिया कस्तुरे
मनमंजुषेतून
☆ दाभोळकर सर, विनम्र अभिवादन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
दाभोळकर सर .. विनम्र अभिवादन..!!
दाभोळकर सर तुमचा खून होऊन आज १० वर्षे झाली.
अनावश्यक रुढी-रिती-रिवाज, परंपरा लादल्या गेलेल्या, उपास-तापास मुकाटयाने सहन कराव्या लागणाऱ्या,.. अंधःश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आवाज होता..!
तुम्ही देव वा देवावरची लोकांची श्रध्दा कधीच नाकारली नाहीत. तरीही तुमची भीती वाटली इथल्या काहींना.
विवेकनिष्ठ, विज्ञानवादी समाजाचं स्वप्न तुम्ही पाहिलं..सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न केला..!
मायेचं छत्र हरविल्यानंतर, आईवडील गमावल्यानंतर, निराधार झाल्यावर जेवढं दुःख होतं ना…
त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख झालं… तुम्ही गेल्यावर..!
तुम्ही कळला नाहीत, रुचला नाहीत, पचला नाहीत,
तुमची भीती वाटली म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या..!
….. पण .. .. कितीही गोळ्या घातल्या तरी तुम्ही मरणार नाहीत.
कारण गांधी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश
मरत नसतात… हेच त्यांना कळत नाही.
विचारांची लढाई विचारांनी लढणाऱ्या प्रत्येक माणसांत तुम्ही आहात..तुमच्या विवेकनिष्ठ विचारांनी, तुम्ही केलेल्या प्रत्येक परिवर्तनवादी लढाईतील आठवणीत तुम्ही जिवंत आहात…
तुम्ही मांडलेल्या विचारांच्या रुपात,
तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांच्या रुपात,
तुम्ही उभा केलेल्या चळवळीच्या रुपात,
तुम्ही अजूनही जिवंत आहात.
आणि कायम जिवंत राहणार..!
तुमच्या डोळ्यातील विवेकी तेज .. अल्प का होईना इथं अनेकांच्या डोळ्यात उतरलं..!
तुमच्या रक्तातील विज्ञाननिष्ठता आमचं रक्त रंगवू पाहातेय..!
तुमच्या बोलण्यातील वादळी पण तितकीच संयमी लय, इथल्या मनामनात उसळू लागलीय..!
तुमच्या नसानसातून वाहणारा कार्यकारणभाव, तर्कशुद्ध विचार, थोडा का होईना समाजात ही रुजू लागलाय..
तुमचे श्रम, तुमचे बलिदान अजिबात वाया गेले नाहीत आणि जाणारही नाहीत.
झिरपत राहतील या मातीतच…. उद्याच्या उभ्या पिकात त्याचा डौल नक्की दिसेल अशी आशा आहे..!
… दाभोळकर सर …. तुम्हाला मनोमावे सलाम..! विनम्र अभिवादन
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈