श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

(मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले. आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले.) — इथून पुढे — 

माझ्या घरात सगळीकडे फ्रेम करून लावलेली चित्रे होती. ती त्याने प्रामाणिकपणे व्यवस्थित पाहीली पण त्याची नजर काही तरी वेगळे चित्र शोधत होती. मग मी माझी नुकतीच पूर्ण केलेली पावसाची, दाट धुक्याची, जलरंगातील चित्रे दाखवली. आणि अर्शद एकदम खुष झाला. 

येस, येस, 

आय वाँट धिस टुडेज रेनी सिझन ॲटमॉसफियरीक वंडरफूल पेंटीग्ज.

दिस वील बी गुड मेमरीज फॉर मी. 

असे म्हणत त्याने ती तीन चित्रे सिलेक्ट केली. माझा अकाऊंट नंबर ऑनलाईन पेमेंटसाठी  विचारला पण माझ्याकडे तशी त्यावेळी सुविधा नव्हती. मग तो क्रेडीटकार्डची सुविधा उपलब्ध आहे का? असे विचारु लागल्यावर मी नकार दिला. कारण मी त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे एवढे सुरक्षित नव्हते.मग एटीएम मधून रोख पैसे देण्याचा पर्याय नक्की झाला.  बबल रोलच्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेली व्यवस्थित पॅक केलेली चित्रे त्याच्या गाडीतून अर्शदने मागच्या सीटवर ठेवली व आम्ही पाचगणीच्या शॉपींग सेंटरच्या पोस्टाशेजारच्या स्टेट बँकेच्या एटीएमला गेलो. त्याने पेमेंट काढून रक्कम हातात दिली.मग कितीतरी दिवस मनात साचलेले एक मोठे ओझे दूर झाल्याने मी रिलॅक्स झालो. कारण ती रक्कम पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतकी होती.आणि एटीएम शेजारच्याच पुरोहीत नमस्ते या हॉटेलमध्ये आम्ही निवांतपणे कॉफी पिण्यासाठी गेलो.

मला तर  फारच आश्चर्य वाटत होते की इतक्या धुवांधार पावसात हा माणूस माझ्याकडेच चित्र घ्यायला का आला असावा ? त्याला कोणी रेफरन्स दिला ? त्याला चित्रेच का घ्यावीशी वाटली ? तो या गावात शिकला,त्याचा व पाचगणीचा काय संबंध ? माझे अनेक प्रश्न मी त्याला विचारले. पण अर्शदने थोडक्यात प्रश्नांची उत्तरे दिली. 

आज खूप वर्षानंतर मी पाचगणीला आलो. शाळेत असताना हा वादळी पावसाचा दिवस, कडाक्याची थंडी, हे धुके मला सतत आठवत असते. आज सध्यांकाळी मी लॅपटॉपवर सहज पाचगणी पेंटीग्ज या नावाने सर्च मारला तर तुमच्या पेंटिंगचे फोटो दिसले. कुठूनतरी अचानक एक अज्ञात शक्तीने सुचवले किंवा मनात विचारांचे वादळच उठले की आताच जावून या चित्रकाराला भेटलेच पाहीजे. मी आता परदेशात स्थायिक झालो आहे.मनातल्या साचलेल्या या पावसाच्या धुक्याच्या आठवणी  चित्ररुपाने मला नेहमीच या परिसराची,तुमची व येथील पाचगणीच्या या भेटीची आठवण करून देत राहतील. प्रेमाने गळाभेट घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि माझी प्रत्यक्ष अनुभवलेली,घडलेली खरी  गोष्ट इथे संपली. 

डोक्यावर हुडी घालून चाललेला पाठमोरा अर्शद त्यादिवशी मला देवदूतासमान वाटला. कित्येक वर्ष ह्या नखशिखान्त पावसात ओलाचिंब झालेल्या या देवदूताची प्रतिमा मनाच्या अज्ञात पोकळीत स्वस्थ बसून राहिली होती आज या थिंक पॉझिटिव्हच्या लेखामूळे पुन्हा जागृत झाली, पुन्हा आठवली.

खरं तर मी नास्तिकही नाही व आस्तिकही नाही. मी नियमित देवपूजा व मंदिरानां भेटीही देणारा धार्मिक माणूस नाही. पण गेले कित्येक वर्ष  मला हा प्रश्न सतावतो की हे अज्ञात देवदूत मला का भेटत गेले ?  या देवदूतांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या वर्णाचे, स्त्री किंवा पुरुष असो वेगवेगळ्या रुपाने अडचणींच्या वेळी हजर कसे होतात ? आणि ते कधीकधी परत भेटतात किंवा कधी आयुष्यात भेटतही नाहीत. आपण कोणाला मदत केली किंवा मार्गदर्शन करून नवा रस्ता  दाखवला याचा त्यानां कधी अभिमान वाटत नाही. ते कुठे याचा नामोल्लेखही करत नाहीत. त्यांच्या भावविश्वात मी आता मदत केली आहे तर तुमच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा आहे असे त्यांचे वर्तन कधीही असत नाही.

मी हिंदू आहे व अर्शद मुस्लीम आहे म्हणून आमच्यामध्ये कधी असा दुजाभाव, दुराचाराचा विचार आला नाही. देवदूतानां कुठे धर्म,जात असते

आपल्या आयुष्यातील कठीण काळात सर्वतोपरी छोटी असो वा मोठी मदत करणाऱ्यानां देवदूतच म्हणावे लागेल ना ? 

म्हणजे देवदूतानां जात, धर्म, पंथ नसतो. मग आपण का जात,धर्म, पंथ व हिंदूत्व कवटाळून बसतो. मी तर मंदिराच्या परिसरात चित्र रेखाटण्यासाठी जात असूनही कधी आत जात नाही. देवाच्या दर्शनाला रांग दिसली की लांबूनच हात जोडतो. आणि देवाला मनातूनच सांगतो बाबा रे ! तुला तर माहीतच आहे की तुझ्यापासून काहीही लपवू शकत नाही.तू तर सर्वज्ञ आहेस, सगळीकडे तुझा वावर असतो मग रांगा लावून तुझ्याकडे येण्यासाठी वेळ कशाला घालवू ? रांगेत फुकट वेळ घालवायचा याला काय अर्थ आहे ? तू जे अडचणींच्या काळात मनुष्यरूपी देवदूत पाठवतोस ते काय कमी आहे का ? मग मनातूनच माझा नमस्कार स्विकार कर. 

यु नो एवरीथिंग अबाऊट मी.

आजही कधीतरी  मोठी अडचण आली की मला परत कधीही न भेटलेल्या हुडीवाल्या देवदूताची प्रतिमा आठवते. माझा तीस पस्तीस वर्षांचा चित्रकलेचा प्रवास अशा ज्ञात अज्ञात देवदूतांनी सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या मार्गाने अचानक प्रकट होवून भरघोस यशाशक्ती मदत केली. आमची चित्रकला बहरली, फुलली संपन्न झाली त्या या देवदूतांमूळेच. या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या मानवी सजीव देवदूतानां आज यानिमित्ताने मी नतमस्तक होऊन सप्रेम नमस्कार करतो.

मन, शरीर, बुद्धी व आत्मा या चार जीवनातील गोष्टींचे योग्य संतुलन असले की देवदूत भेटतातच, किंवा भेटले नाही तर कधी कधी आपणच कोणाचा तरी देवदूत बनून समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला, त्याची चिंतामग्न अवस्था समजून हातभार लावला, खरी मदत जर केली तर या जन्मात आपणही एक छान कर्म केल्याचे मानसिक समाधान नक्की मिळेल.

मी जरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी कधीही गेलो नाही तरी त्यांचे दोन शब्द मला नेहमीच प्रेरणा देतात. 

‘श्रध्दा’ और ‘सबुरी’.

आपल्या कामावर असलेली निस्पृह  निष्ठा,मनात असलेली प्रामाणिक इच्छाशक्ती व आपल्या जोपासलेल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक काम असो किंवा तुमच्या आवडत्या कलेवर असलेले निर्व्याज सच्चे  प्रेम असेल तर ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती करायला एक दिवस  देवदूत नक्की भेटायला येतो.तो नवनव्या वेषात येतो. कधी तो सरकारी अधिकारी म्हणून येईल, तर कधी शिक्षकाच्या, मित्राच्या रुपाने प्रकट होईल. कधी काळ्या कोटात वकीलाच्या रुपाने येईल तर कधी पांढरा कोट घालून डॉक्टरांच्या रुपाने येईल. कधी साध्या वेशात येईल, कधी टाय सुटबुटातील पोशाखात उद्योजकाच्या रुपाने येईल तर कधी हुडीवाला पोशाख घालून शांतपणे सुखाची पखरण करत व मदत करून निघून जाईल.

पण पक्का विश्वास ठेवा स्वतःवर 

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

🌟 🌟 🌟 🌟

(माझ्या चित्रकलेच्या अडचणीच्या संघर्षाच्या प्रवासात या हुडीवाल्या देवदुताला मी पार विसरूनच गेलो होतो. लेख लिहील्यानंतर त्या रात्री कित्येक वर्षांनी देवदूताचा गुगल, फेसबूक अशा समाज माध्यमांवर शोध घेतला तर देवदूत सापडला. मेसेंजरवर रात्री त्याला उशिरा मेसेज पाठवला तर देवदूताने मोठ्या उत्स्फूर्तपणे लगेच मला प्रतिसाद दिला. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात देवदूताना विसरतो पण देवदूत कधीच आपल्याला विसरत नसतात. या देवदूताचा चेहरा मला आठवत नव्हता. आज खूप वर्षानंतर त्या देवदूताचा बायोडाटा पाहीला तर हा स्मार्ट देवदूत त्यावेळी जागतिक बँकेचा प्रेसिडेंट होता.त्यांचा फोटो सुरुवातीला मुद्दाम दिला आहे.) 

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments