श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे

(शिक्षक दिनानिमित्त)

तिच्याबरोबर काही वेळेला मॉलमध्ये जाणे घडते. ती शिक्षकी पेशातली. बऱ्याचदा अचानक ३० ते ४५ या वयोगटातले तरुण जवळून जातांना थबकतात आणि म्हणतात,  “आपण मोघे मॅडम ना ! मॅडम ओळखलत? मी १९९३ बॅचचा… मी १९९६ बॅचचा…. ” आणि काही बोलायच्या आत ते वाकून नमस्कार करतात. “ मॅडम अजूनही तुम्ही शिकवलेला धडा आठवतो.” कुणाला शिकवलेली कविता आठवते, कुणाला केलेली आर्थिक मदत आठवते, तर कुणाला दिलेला आत्मविश्वास… तो दिवस हिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, धन्यतेचा दिवस असतो. तिच्या शिक्षकी पेशापुढे मला माझे अधिकारीपण थिटे वाटायला लागते. जगातल्या कुठल्याच क्षेत्रात, शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे असा सन्मान आणि धन्यता  लाभत नाही.  ते पवित्र नाते पाहून परमेश्वराने पुढच्या जन्मी शिक्षक करावे, असे का कुणास ठावूक त्याक्षणी वाटू लागते.

हे असे बऱ्याच ठिकाणी घडते. प्रसंग मॉलमधला सांगण्याचे कारण एव्हढेच, की या नात्याच्या भेटीसोहळ्यात वेशभूषाही आडवी येत नाही, एव्हढे हे नाते पक्के असते. ही तिथे साडीमध्येच असते असेही नाही आणि तोही विद्यार्थ्यांच्या पेहरावात असतोच, असे नाही. पण या नात्यात आदरयुक्त भावनेचे प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यांच्या मेंदूत कायमचे झालेले असते आणि ‘लाईफटाईम ॲन्टी व्हायरस कीट’ या नात्यात “इनबिल्ट” असते.अगदी आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यातही दुराव्याचा,गैरसमजाचा व्हायरस आल्याचे काही ठिकाणी दिसते.पण या नात्यात ते अपवादाने नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्या प्रेमयुक्त आदराची आहे, याबाबत मन, बुद्धी आणि देहाचे कधी नव्हे ते क्षणात ऐक्य होते आणि नमस्काराची कृती होते. आपल्या शिक्षकांबाबतही आपले असेच होत असते.

परवाच माझे एक स्नेही, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. मित्रगोत्रीसर घरी मुक्कामाला होते. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते ठाण्यात येणार हे कळताच ,परिसरातल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे फोन सुरु. स्टेशनवर स्वागत, घरी घेऊन जाणे, पुन्हा स्टेशनवर पोहचविणे, प्रेमाचा आग्रह, भेट होताच सर्वांचा वाकून नमस्कार, या सर्व गोष्टी पाहून शिक्षकी पेशातल्या व्यक्ती खरेच नशिबवान असे वाटले,.त्यांचा हेवाही वाटला.

या मंडळींना स्वत: ऐश्वर्यवान होण्यापेक्षा विद्यार्थी ऐश्वर्यवान झालेले पाहणे आवडते. पंखात बळ देऊन, भरारी घेण्याचा आत्मविश्वास देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा, पुन्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना घडवत राहायचे. हे ज्ञानदानाचे,विद्यार्थी घडविण्याचे अग्निहोत्र प्रज्वलित ठेवण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या सर्वच शिक्षकांना वंदन.

आजचा दिवस शिक्षणपद्धती, शिक्षक यांच्या दोषांविषयी बोलण्याचा नक्कीच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या समस्या, गरजांमध्ये झालेले बदल, तात्विक अधिष्ठानात झालेले बदल हे तुमच्या आमच्यात, डॉक्टर, वकील इत्यादी सर्वच पेशात झालेले आहेतच. तेव्हा यात ‘सर्व बदलले ते ठीक, पण शिक्षकांनी तरी बदलायला नको, त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यागी, तत्वनिष्ठ रहावे,’ असे म्हणून त्यांच्यावरच नैतिकतेचा, तत्वनिष्ठतेचा बोजा टाकणे, योग्य वाटत नाही. तीही माणसेच आहेत. आपण बदललो, तीही बदलली आहेत.

अजूनही चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. चांगले शिक्षक, प्राध्यापक आहेत. जे चांगले आहेत, तेच पुढे आठवणीत राहतील…मनाशी मनाचे नाते  जुळलेले राहील आणि खूप वर्षांनी जरी अशा शिक्षकांना विद्यार्थी भेटले, तरी ते तेव्हाही निश्चितच त्यांना वाकून नमस्कार करतील. 

सर्व आदरणीय शिक्षकांविषयी अशाच भावना आहेत:

 कधी तर नाहीच,

कधीतरी क्वचित

होते त्यांची भेट

जावून बसले

असतात मात्र

 आपल्या काळजात थेट !

सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा आणि वंदन…

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments