सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज माझ्या स्वप्नात आलं आमचं घर, आमचं अंगण ! दारासमोर दिसला पारिजातकाचा सडा ! शुभ्र पांढऱ्या रंगाची ,केशरी देठाने सजलेली, नाजूक इवली इवली फुले सगळीकडे चांदण्यासारखी पसरली होती. नारळाच्या झाडाच्या साथीला होते प्राजक्ताचे झाड ! एरवी तसं रिकामंच दिसणारं ! पण पावसाची चाहूल लागली की बहरून येणारं ! डावीकडे होती इतर छान फुलांची झाडे ! एक मोठा कुंदाच्या झाडाचा पसारा बाजूला होता. काही वर्षे इतकी सुंदर कुंदाची पांढरी आणि मागून थोडीशी जांभळी झाक असलेली कुंदाची फुले येत होती .संध्याकाळी त्याच्या कळ्या टपोऱ्या फुगलेल्या दिसत. पण काही वेळा झाडाला दृष्ट लागते ना तसं झालं ! एवढं फुलणारं झाड.. त्याला फुलेच येईनाशी झाली ! राहिला तो मोठा झाडाचा पसारा !
बाजूलाच होता जुईचा वेल ! छोटी छोटी सुवासिक फुले ! वरच्या माडीपर्यंत वाढत गेलेला तो वेल पावसाचे दोन-चार महिने डोळ्याला आनंदित, सुगंधित करून जायचा ! त्याची इवली इवली फुले वेलीवरून घरंगळत खाली यायची आणि ती पहाताना मन मोहरून जायचे ! एक वर्ष तर अधिकाच्या महिन्यात रोज जुईचा गजरा देण्याचा नेम केला होता. सवाष्ण अगदी सुहास्य वदनाने ते वाण घेत असे. मोगऱ्याची दोन-चार झाडे उन्हाळ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी वातावरण आनंदित, प्रफुल्लित करून जायची ! देशी गुलाबाचं एक झाड असेच एखाद्या वर्षी बहरून जायचे ! जवळपास एखादा निशिगंधही असे. त्याचा एखादा तुरा मोरासारखा डोलत असे ! ब्रह्म कमळाचे खोड वर्षभर दिसे न दिसे, पण या पावसाच्या काळात ब्रह्मकमळाची पाच दहा फुले तरी मनाला आनंद देत असत ! तुळशी वृंदावनातील तुळस मनाला प्रसन्न करत असे. अधून मधून छोटी बटन शेवंती रुजवलेली असे तर दसऱ्याच्या दरम्यान मिळावीत म्हणून झेंडू वाढवलेला असे ! गौरीच्या दिवसात तेरडयाची पाने मिळावी म्हणून एखादं गौरीचे रोपही बागेत असे. जांभळी, गुलाबी गौरीची फुलं काही दिवसच येत, पण बागेची शोभा वाढवत ! छोटीशी जागा पण किती तऱ्हेतऱ्हेची फुले देत असे !
मागच्या अंगणात माझ्या दिरांनी सुंदर गुलाबाची कलमे वाढवलेली होती. तसेच पेरू, चिकू, पपई यांचे एकेक झाडे होते. विशेष म्हणजे आमच्या प्लॉटवर एक आंब्याचे, एक फणसाचे, एक जांभळाचे आणि तीन नारळाची अशी मोठी झाडेही होती. घराभोवतीचा सर्व परिसर हिरवा गार केलेला होता. छान वाटायचे झाडांच्या आणि घराच्या सावलीत !
या घराच्या सावलीत तीस-पस्तीस वर्षे राहिलो. हळूहळू मुले बाहेर पडली आणि आम्हीही बाहेर पडलो. मुलांकडे आलो. पण जेव्हा जेव्हा घराची आठवण येते तेव्हा हेच स्मरणातील घर डोळ्यापुढे येते आणि तेथील स्वप्न फुले स्वप्नासारखी मनामध्ये उमलू लागतात !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈