श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

एक काळ असा होता की, धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत – रस्त्यात, शेतात, नदीच्या काठावर, नाही तर हिरव्यागार कुरणातून चालण्या-भटकण्याचा – मनसोक्त आनंद लुटत होतो.

ते दिवस तर आता संपले. आता तोच आनंद लुटत असतो, उघड्या पडवीत आरामखुर्चीत निवांत बसून – धो धो पाऊस, थोडीशी थंडी, भीमाण्णांचे मल्हाराचे सूर, कांद्याची भजी, आल्याचा चहा – या सगळ्यांचे कथ्थक नर्तन अवलोकून!

या पावसाच्या चालू हंगामामध्ये – पाऊस भजी चहा – असे अपूर्व त्रिवेणी योग तीन-चार वेळा जुळून आले आणि मानस तृप्त जहाले !!

आजही पाऊस पडतोच आहे. पण संतत धार नव्हे. एकदाच पडला. अगदी धो धो नसला, तरी बऱ्यापैकी सरी कोसळल्या. पण आज मला फक्त पाऊसच हवा आहे. बाकी काहीच नकोय्.  दर क्षणांला स्वत:ला आकाशातून झोकून देत पृथ्वीकडे झेपावणारे पाण्याचे लाखो थेंब – शुद्ध, सात्विक आणि पवित्र – मी नजरेने पीत आहे – किती तरी वेळ! आता मला त्यासोबत इतर कुठले अर्कही नकोयत आणि दर्पही नकोयत.

कारण आजचा पाऊस, हा अष्टमीचा पाऊस. अष्टमीचा पाऊस म्हणजे कृष्णाचा पाऊस! त्याच्या जन्मकाळी  पडला तोच हा पाऊस. वसुदेवाचा पाऊस, देवकीचा पाऊस, यशोदेचा  पाऊस – आणि माझा पाऊस !!

हा पाऊस माझ्यासाठी घडवून आणील दुर्मिळ दर्शन श्रीमुखाचे, अलभ्य श्रवण वेणूनादाचे, अलौकिक स्पर्श चरणकमळांचे आणि उन्मनी गंधवेड ‘ अवचिता परिमळूचे ‘ !!

जसे इच्छिले तसेच घडले

मनिचे हेतू पूर्ण जाहले

 

थेंबाथेंबातून जाहले

दर्शन श्रीहरिचे

धारांच्या नादातुन आले

गुंजन मुरलीचे

 

मोरपीस लेवून मस्तकी

प्रभुजी अवतरले

अष्टमीच्या धारांतून दैवी

इंद्रधनू प्रकटले

लेखक : सुहास सोहोनी. 

दि. ७-९-२०२३ – कृष्ण जन्माष्टमी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments