श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

प्रिय नदीमाय, आज तुझ्या अत्यल्प वाहत्या पाण्यात मी एक कागदी नाव सोडली आहे. इतरांच्या नजरेतून लपवण्यासाठी कागदाची नाव केलेली आहे पण ती कागदी नाव नसून तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. सध्या तुझं वाहणं थांबलेलं असल्यामुळे निवांत वाच. मराठवाड्यात मान्सुन आगमनाचा पाऊस झाला नाही, परतीचा पाऊस चार दिवसांनी परतलेला असेल. पुढच्या हाहाकाराची चाहूल दिसतेय. माझ्या बालपणी तुझं खळाळतं रूप पाहिलेलं असल्यामुळे तुझी खंडमयता बेचैन करत आहे.

प्रिय नदीमाय, तुला वाटलं असेल की हे पत्र आजच का लिहिले असेल ? तर तुला सांगतो आज जागतिक नदी दिन आहे. नाही कळलं ? कळणार कसं गं तुला ?माझी भोळी माय. अगं आम्ही माणसं स्वतःचा जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा करतो. साधुसंतांचे, महापुरूषांचे, नारीरत्नांचे, वीरगाथांचे स्मरण  म्हणून जयंती पुण्यतिथी दिन साजरे करतो. निसर्ग शक्तीची पूजा म्हणून सण उत्सव साजरा करतो. तुझेही आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणून तुझाही दिवस साजरा करावा म्हणून जागतिक स्तरावर आम्ही ‘नदी दिन‘ साजरा करतो.

आता तुला प्रश्न पडला असेल की हे जग म्हणजे  काय आहे ? ती कथा खरेच खूप मोठी आहे. पण हीच कथा तुझ्या चित्तरकथेची पटकथा आहे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इतक्या लांबच्या वर्षाची आहे की एकवेळ ऋषीचे कुळ सापडेल, तुझेही मुळ सापडेल पण मनुष्य जन्माचा नेमका आरंभ बिंदू काळाच्या मापन चौकटीत मांडणं कठीण आहे. हवा, पाणी, जमीन हे पृथ्वीचे आरंभीचे घटक. या घटकांनीच जैविक व अजैविक उपघटकांची निर्मिती केली. नव जीव-निर्मितीचे वरदान लाभलेल्या पृथ्वीवर मानव नावाचा जीव आला. गुहेचा ,डोंगरकपारीचा आधार घेत हा माणूस सुरुवातीला जीव मुठीत घेऊन राहत असे. अन् आता मानवामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा जीव मेटाकुटीला आला आहे. पशूपालन व शेतीसाठी माणसाला स्थिर पाणवठ्याची गरज निर्माण झाली. ही गरज नदीमाईने पुरविली‌. म्हणून आरंभीच्या मानवी वसाहती नदीच्या आधारानेच उभ्या राहिल्या. स्थिर जीवनामुळे माणसाची अन्नासाठीची भटकंती थांबली व थांबवलेल्या वेळेत त्याने विकास, प्रगती नावाखाली इतक्या उचापती केल्या आहेत की त्यातून निसर्गाला अपरिमित झळ पोहोचली आहे. नदीमाय तू सुद्धा त्यातून सुटली नाहीस. तुझ्याही ते लक्षात आलेच असेल. माय म्हणून तू आम्हाला माफ करत असशील, हे मातृत्व म्हणून ठीक असलं तरी आता तुझ्या नरडीभोवती फास आवळला गेला आहे. शेवटच्या घटकेत तुझी सुटका झाली नाही तर पुढची मानवी पिढी तुझ्या कोरड्याठाक काठावर मरून पडलेली असेल.

नदीमाय, किती गं सुंदर तुझा जन्म. उंच पठारावर, डोंगरपर्वतावर, बर्फाच्या साठ्यातून तुझा जन्म. पृथ्वीच्या पृष्ठावर पावसाच्या आगमनाने ओढलेली तू एक साधी रेषा. पण अशा अनंत रेषा, अनंत प्रवाह एकत्र येत तू नदी होतेस. घनदाट जंगलातून, भयानक दरीखोऱ्यातून, धबधब्यातून ओसंडून वाहत तू विशाल रूप घेत धावत मानवी वस्तीत येतेस. केवळ शेती व पशुपालन या आमच्या प्राथमिक गरजा होत्या तोपर्यंत आपलं नातं माय नदी व पुत्र मानव असंच होतं. आमच्या घरात जन्मलेल्या मुलींना नदीची नावं आहेत. नदीचे उत्सव आहेत. चित्रपटाची गाणी, नावे यांतसुद्धा नदी आहे. नदी व मानव एकरूप आहेत. पृथ्वी हे जर एक मानवी शरीर मानलं तर नदी ही पृथ्वीची रक्ताभिसरण संस्था आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगीकरण, कारखानदारी, व्यवसाय, अर्थाचा हव्यास इत्यादी कारणांमुळे मानवाने नदीच्या नरडीला नख लावले. जमिनीवरील भूखंड माफियांची एक शाखा वाळू माफिया म्हणून उदयास आली. नदीमाय, हे वाळू माफिया कुणी परग्रहावरील एलिएन्स नसून धरतीच्या लेकरातीलच हव्यासी लोकांचा कंपू आहे, जो सातत्याने नदीमायीच्या थेट गर्भात लोखंडी खोऱ्यांचा मारा करून शेकडो वर्षांनंतर तयार होणाऱ्या वाळू कणांची भ्रुणहत्या करून चोरी करत आहे.

जंगलातील वनस्पतींच्या मुळातून, मृदागंध खडकातून तू आमच्यासाठी अमृत चवीचे पाणी आणलेस. 

पण नागरी वस्तीत येताच आम्ही तुला काय दिले- तर न विरघळणारे प्लास्टिक, किळसवाणे घाणेरडे पदार्थ, दुर्गंधीयुक्त सांडपाणी, कारखान्यातील विषारी जल, अपरिमित कचरा, किती किती म्हणून सांगावं ? असं सांगितलेलं पण काही माणसांना आवडत नाही म्हणून तर गुपचूप पत्र लिहिले आहे.

नदीच्या आश्रयाने आमची कथा लिहिली आहे, पण आम्ही मात्र तुझी चित्तरकथा केली आहे. पण काही माणसं खूप चांगली असतात. ब्रिटनचा एक नागरिक आहे ,मार्क ॲंजोलो– त्यानेच तब्बल पंचवीस वर्षे थॉम्पसन नदीवर स्वच्छता मोहीम राबविली. नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम जगाच्या नजरेत आणून दिले. 

त्याने ही समस्या व उपाय जगाच्या नजरेत आणून दिले. नदी स्वच्छतेसाठी व नैसर्गिक जलस्त्रोत मोकळे करण्यासाठी हा ‘ नदी दिन ‘ आहे.नदीच्या आयुष्याचा गोंडस पट विस्कटून टाकणाऱ्या चित्रपटाचे सर्व कलाकार मानवी वंशाचे आहेत. आमच्यातीलच काहींनी तुझी चित्तरकथा केली आहे म्हणून तर मी तुझी उपकारक कथा आमच्या बांधवांना सांगण्याचे मनावर घेतले आहे.

‘ सिंधु ‘सारखी प्रगत संस्कृती तुझी देणगी आहे. एवढेच नव्हे तर मानवी संस्कृतीचा उदय, विकास व प्रगतीचा तूच आधार आहेस. अन्नासाठी मासेमारी, पोटासाठी शेती, उद्योगासाठी वीज, निवाऱ्यासाठी वाळू, वाहत्या पाण्यामुळे वनस्पतींचा बीजप्रसार, या सर्वांचे मूळ तू आहेस. म्हणून नदीमाय तू जगले पाहिजेस.

जलस्त्रोताबाबत उपकार , जनजागृती व नदी संवर्धन करणारा एक सेवक पुत्र म्हणून मी तुझ्या कामावर असेन .हा शब्द तुला देतो  नदीमाय….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments