डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक होता गरुड…! नावाप्रमाणेच आकाशात उंच भरारी घेणारा… ! 

साजेशी बायको पाहून याने एका पक्षीणीशी लग्न केलं… 

हा दररोज सकाळी कामावर जायचा, संध्याकाळी घरी यायचा, दिवसभर काबाड कष्ट करायचा…  जमेल तितकं पक्षिणीला आनंदात ठेवायचा…! 

कोल्हापूर जिल्ह्यातलं याचं छोटंसं एक गाव… गरुडच तो … याने स्वप्न पाहिलं, बायकोला म्हणाला, “ मी पुण्यात जाऊन आणखी कष्ट करतो, म्हणजे आपल्याला आणखी सुखाचे दिवस येतील… !”

पुण्या मुंबईच्या आकाशात हा गरुड उंच झेप घेऊ लागला…  मिळेल तो दाणापाणी बायकोला घरी पाठवू लागला, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला… ! 

“माझी ती पक्षीण” इतकंच त्याचं आयुष्य होतं… ! तिनं सुखी आणि आनंदी राहावं इतकंच त्याचं माफक स्वप्न होतं…. त्यासाठी तो स्वतःच्या शक्तीबाहेर काम करू लागला…. प्रकृती ढासळली… पंख थकले… आता दाणापाणी कमी मिळू लागलं …. ! हा स्वतःच्या मनाला खायचा, तरीही काम करतच होता… !  पक्षिणीला जास्तीत जास्त सुखी कसे ठेवता येईल, याचाच तो सतत विचार करायचा… ! याने आणखी चार कामे धरली आणि प्रकृती आणखी ढासळत गेली…. 

मधल्या काळात पक्षिणीला एका धष्टपुष्ट श्रीमंत “गिधाडाने” साद घातली, ती भुलली, तिला मोह झाला आणि ती त्याच्याबरोबर भूर्र उडून गेली…. ! मनापासून प्रेम करणाऱ्या गरुडाला ती सोडून गेली… ! 

गरुड असला तरी चालता बोलता जीवच तो… हा धक्का त्याला सहन झाला नाही… ! तो  पूर्ण खचला…. 

‘आता कमवायचं कोणासाठी ?’  हा विचार करून रस्त्यात वेड्यासारखा तो फिरायला लागला…. होती ती नोकरी गेली, तेव्हापासून पुण्यातल्या रस्त्यावर विमनस्क अवस्थेत तो फिरू लागला…. याला बरीच वर्षे लोटली… तरुणपण सरलं… डिप्रेशनच्या याच अवस्थेत एके दिवशी एक्सीडेंट झाला, उजव्या पायाची तीन हाडे मोडली… जिथे एक्सीडेंट झाला तिथेच पुण्यातल्या एका नामांकित रस्त्यावरच्या फुटपाथवर तो गरुड पडून राहिला… घायाळ जटायू सारखा…! 

पक्षिणीला याबद्दल माहीत असण्याचे काही कारण नव्हते…. कळवणार कोण ? आणि कळलं असतं तरी ती थोडीच येणार होती ? कारण तिच्यासाठी ते श्रीमंत “गिधाड” हेच तिचं सर्वस्व होतं… ! 

 

प्रसंग २

मी पुण्यातल्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो, रस्त्यावर पडलेल्या लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. माझे एकूण 60 स्पॉट आहेत.  यात जवळपास पुणे पिंपरी चिंचवड असे सर्व भाग कव्हर होतात. 

मला नेहमी असं वाटतं, की मी जे काही काम करतोय ते मी करतच नाही… कोणीतरी माझ्याकडून हे करवून घेतंय, माझ्याही नकळत….. कोण ???  ते मलाही माहीत नाही !!!  मी पण शोधतोय त्याला….

तर ..

एकदा १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी मला एक फोन आला, संध्याकाळी माझा त्यांनी सत्कार ठेवला होता. त्यांनी पत्ता सांगितला, संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेलो. जाताना आजूबाजूचा परिसर पाहिला, मला हा परिसर थोडा नवीन होता. परिसर चकाचक असला तरी फुटपाथवर अनेक निराधार लोक मला दिसले. 

या नवीन ठिकाणी पुन्हा यायचं, असं मी मनाशी ठरवलं आणि २२ सप्टेंबर २०२३ म्हणजे शुक्रवारी, मी या परिसरात फेरफटका मारला. अनेक जीवाभावाचे लोक भेटले, अंध आणि अपंग…. माझ्या परीने मला जे जे शक्य होतं, ते ते मी त्यांच्यासाठी त्या दिवशी केलं आणि तिथून अत्यंत समाधानाने परत फिरलो. 

परत निघालो , पण अचानक एका ठिकाणी माझी मोटरसायकल बंद पडली. किक मारून, बटन स्टार्ट करून थकलो, गाडी काही केल्या सुरू होईना… ! पेट्रोल पण भरपूर होतं…. मग झालंय काय हिला ??? 

घामाने निथळणारा मी ….आता थंड पाण्याची बाटली कुठे मिळते का ? म्हणून शोधत फुटपाथवरून चालत, चरफडत निघालो…. 

फुटपाथ वर कुणीतरी एक भिजलेलं गाठोड टाकलं होतं… आधीच वैतागलेला मी…. वाटेत पडलेल्या त्या भिजलेल्या गाठोड्याला रागाने लाथ मारून बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला…. !  

मला वाटलं तेवढं ते गाठोड हलकं नव्हतं….माझ्या पायाने ते सरकवलं गेलं नाही …. मी रागाने त्या गाठोड्याला अजून जोराने लाथ मारली आणि मला त्याच्यातून “आयो” म्हणून किंचाळल्यासारखा आवाज आला…! .. मी दचकलो… घाबरलो … मलाही काही कळेना ! 

भिजलेल्या त्या बोचक्यातून आधी एक दाढीवाला चेहरा बाहेर आला, त्यानंतर मला एक हात दिसला, मग दुसरा हात दिसला, दोन्ही हाताने त्याने ती चादर खाली केल्यानंतर मला त्या व्यक्तीचे पोट आणि पाय दिसले…. ! 

डॉक्टर म्हणून अनेक बाळंतपण आजवर पाहिली…. पण बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येताना आज पहिल्यांदाच पहात होतो…. !  गर्भातून लहान बाळ जन्माला येणं हे नैसर्गिक…. परंतु बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येणं हे अनैसर्गिक… ! …. फेकलेल्या बोचक्यातून म्हातारे आई बाप हल्ली रस्त्यावर जन्माला येतात, ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे ! 

तर, भिजलेल्या बोचक्यातून बाहेर पडलेल्या त्या बाबांची मी पाया पडून माफी मागितली आणि त्यांची चौकशी केली आणि समजले …. हो…. हाच तो पाय तुटलेला तो गरुड !!! 

हा “गरुड” पाय तुटल्यापासून पाच महिने याच जागेवर पडून आहे. दया म्हणून कोणीतरी याला ब्लॅंकेट दिलं होतं, या ब्लँकेटमध्ये तो स्वतःला गुंडाळून घेतो… भर पावसात  हे ब्लॅंकेट भिजून आणि कुजून गेलं आहे… त्याच्या आयुष्यासारखं….! 

खूप वेळ पाण्यात बोटं भिजल्यानंतर, पाणी त्वचेच्या आत जातं, बोटं पांढरी फटक होतात, त्यावर सुरकुत्या पडतात…. ! जवळपास सर्वांना हा अनुभव कधीतरी आला असेल…. पण कपाळापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत यांचं संपूर्ण शरीर पांढरंफटक पडलं होतं….शरीरातल्या प्रत्येक भागाच्या त्वचेच्या आत पाणी गेलं होतं… पाण्यात भिजून स्पंज जसा फुलतो तसं संपूर्ण शरीर फुललं होतं… फुग्यासारखं…! जिथे पाय तुटला होता तिथल्या जखमांमध्ये किडे वळवळ करत होते…. थंडीने ते कुडकुडत होते, दात वाजत होते, हात थरथरत होते, डोळे निस्तेज पडले होते….टेबलाच्या अगदी कडेला एखादी वस्तू ठेवावी आणि ती कधी पडेल असं वाटावं, तसं डोळे खोबणीतून कधी बाहेर पडतील असं वाटत होतं…. 

एखादयाला असं पाहणं खूप त्रासदायक असतं…. ! पहिल्यांदा ती ओली घाणेरडी ब्लँकेट काढून मी फेकून दिली… आणि घाणेरड्या वासानेही शरमेनं लाजावं इतकी दुर्गंधी त्यावेळी मला जाणवली… !

” पॅन्ट नावाचं जे वस्त्र त्यांनी घातलं होतं, त्यात पाच महिन्यांची मल मूत्र विष्ठा होती…” या एका वाक्यात दुर्गंधीची कल्पना यावी ! पण ते तरी काय करणार ? पायाचे तीन तुकडे झालेला माणूस जागेवरून हलेल कसा ? 

खरं सांगू ? बाबांच्या आधी, मी या पँटचा विचार करायला लागलो….कारखान्यात जेव्हा हे कापड तयार झालं असेल, तेव्हा या कपड्याला काय वाटलं असेल… ? मी आता एका प्रतिष्ठिताच्या अंगावर सफारी म्हणून जाईन किंवा नवरदेवाचा कुर्ता होईन किंवा एखाद्या नवरीचा शालू होईन… ! मग माझ्या अंगावर सुगंधाचे फवारे उडतील आणि मला जपून ते कपाटात ठेवतील…! अहाहा….!!! 

पण झालं उलटंच…. या कपड्याची पॅन्ट शिवली गेली आणि ती नेमकी या गरुडाच्या पदरी पडली…!

तेव्हापासून हे कापड … पँट होवून, त्या गरुडाची मलमूत्रविष्ठा अंगावर घेऊन सांभाळत आहे… !

किती स्वप्नं पाहिली होती आयुष्यात, आणि आता अंगभर एखाद्याची मलमूत्रविष्ठा, तोंडावर फासून घेताना काय वाटत असेल या कपड्याला ? कुणी विचार केलाय ??

देवाच्या पायाशी पडलेल्या फुलांचे कौतुक मला नाही… त्यांना सन्मान मिळतोच ! एखाद्या चितेवर आपण फुलं उधळतो… आपल्या इच्छेसाठी…..  मनात नसूनही ती फुलं मात्र चितेवर सहज जळून खाक होतात… आपल्या आनंदासाठी…. मला त्या फुलांचं कौतुक आहे…. !!!  कुणाच्या आनंदासाठी असं सहज जळून खाक होणं… इतकं सोपं असतं का ? .. जळून खाक झालेल्या त्या फुलांपुढे मी मात्र नतमस्तक आहे… ! 

पण …. काहीतरी स्वप्नं घेऊन जन्माला आलेल्या त्या कपड्याला मात्र आज कुणाची तरी मलमूत्रविष्ठा सांभाळावी लागते… आता माझी नजर बदलते… मी त्या पॅन्टकडे कृतज्ञतेने बघू लागतो… नमस्कार करतो…. !  पॅंटीचे ते कापड मला यावेळी कानाशी येऊन म्हणतं…. , “ डॉक्टरसाहेब एकाच खाणीत अनेक दगड सापडतात…. त्यातले काही पायरी होतात …कोणी मूर्ती होतात… तर कोणी कळस होतात… 

आमच्यासारखे काही दगड मात्र  “पाया” म्हणून स्वतःला जमिनीखाली गाडून घेतात… कळस दिसतो… मूर्ती दिसते …पायरीलाही लोक नमस्कार करतात…! ते मंदिर…तो कळस… ती आरास… धान्याची ती रास… ती मूर्ती… ती आकृती… हे सगळं जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आमच्यासारख्या दगडांमुळे उभं असतं साहेब…. !” 

मी शहारून जातो…. अंगावर काटा येतो ! 

काही गोष्टी अव्यक्त राहतात …. आणि म्हणूनच सारं व्यक्त होतं…. !!! 

.. आयुष्यभर जगून हे सत्य मला कधी कळलं नाही… आज मलमूत्रविष्ठा धारण केलेल्या या निर्जीव कपड्याने मला कानात येऊन मात्र हे सगळं सांगितलं… !!! तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments