डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!!) – इथून पुढे — 

भिजलेलं ते ब्लॅंकेट आणि कुजलेली ती पॅन्ट यांना मी आता मनोमन नमस्कार केला…. आणि काय जादू झाली … त्यातला दुर्गंध कुठल्या कुठे पळून गेला… !!! 

आता बाबांच्या मी शेजारी बसलो…. ! चौकशी केली आणि सुरुवातीला सांगितलेली सर्व कर्म कहाणी समजली. मी त्यांना अत्यंत नम्रपणे विचारलं, “ बाबा मी तुमच्यासाठी काय करू ? “ 

ते सुद्धा हात जोडून तितक्याच नम्रतेने म्हणाले, “ तुम्ही माझा जीव घेता का जीव ? “

“ माझं काम जीवदान द्यायचं आहे बाबा “ मी म्हणालो.

ते क्षीणपणे हसले, म्हणाले, “ घ्या हो जीव… एखादं औषध द्या आणि मारून टाका…. कंटाळलो आहे मी आता…. आडबाजूच्या फुटपाथ वर एखाद्याला असं औषध दिलं तर कोणाला कळणार आहे ??? “

बाबांचं आयुष्यातलं मन उडून गेलं होतं …गाण्यातले सूर हरवतात तेव्हा फक्त ते गाणं बेसूर होतं, पण जीवनातलं मन हरवलं की ते आयुष्य भेसुर होतं… ! 

“ बाबा तुमची बायको तुमच्याशी अशी का वागली ?” मी चाचपले…. 

“ जाऊ द्या हो डॉक्टर…  पाऊस संपला की छत्रीचं सुद्धा ओझं होतं…! “

“ म्हणजे ? “

“ अहो तिची माझी साथ तितकीच होती… “

“ तिच्या वागण्याचा त्रास नाही होत तुम्हाला ? “

“ अहो, तिने त्यावेळी जी साथ दिली ती मी प्रसाद म्हणून घेतली… प्रसादाची चिकित्सा करायची नसते… जे मिळालं ते समाधानाने ग्रहण केलं मी…. !  प्रसाद हा जीव शमवण्यासाठी असतो… भूक भागवण्यासाठी नाही… ! “

“ मला नाही कळलं बाबा… “

… “ माझ्या पडत्या काळात तिने मला खूप साथ दिली, खरं तर मी तिचा आभारी आहे डॉक्टर … 

आपण मंदिरात जातो …. गाभाऱ्यात आपण किती वेळ असतो ? दोन पाच मिनिटं …परंतु तीच दोन पाच मिनिटं पुढे कितीतरी दिवस जगायला ऊर्जा देतात… तिची माझी साथ सुद्धा अशीच दोन पाच मिनिटांची… 

गाभाऱ्यात जाऊन आपल्यासोबत कोणी देवाची मूर्ती घरी घेवून येत नाही… तिथं अर्पण करायची असते श्रद्धा आणि परतताना घेवून यायचा, “तो” सोबत असल्याचा विश्वास ! डॉक्टर माझी मूर्ती फक्त हरवली आहे… श्रद्धा आणि विश्वास नाही… ! “

माझ्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले…

“ जाऊद्या हो डॉक्टर…तुम्ही जीव घेणार आहात ना माझा ?”  विषय बदलत ते म्हणाले. 

“ होय तर… मी तुमचा जीव घेऊन, तुमचे विचार सुद्धा घेणार आहे बाबा…” माझ्या या वाक्यावर कुडकुडणारे हात एकमेकावर चोळत ते गूढ हसले. 

आता शेवटचा प्रश्न ..  “ तुम्हाला तिचा राग नाही येत ? “

ते पुन्हा क्षीणपणाने हसत म्हणाले,.. “ डॉक्टर मी तिला “बायको” नाही, “मुलगी” मानलं…  जोवर माझ्यासोबत होती, तोपर्यंत तिने माझी सेवा केली… आता ती दुसऱ्याच्या घरी गेली… मुलगी शेवटी परक्याचीच असते ना ? “

हे बोलताना त्यांनी मान दुसरीकडे का वळवली… हे मला कळलं नाही… !  मान वळवली तरी खांदयावर पडलेले अश्रू माझ्या नजरेतून सुटले नाहीत…. 

“ मी नवरा नाही होवु शकलो, पण मग मीच तिचा आता बाप झालो….”  ते हुंदका लपवुन बोलले…. ! “ मी तिला माफ केलंय तिच्या चुकीसाठी…” 

मी अवाक झालो… ! 

“ बाबा… ? अहो…. ??  तुम्ही …??? “ माझ्या तोंडून शब्द फुटेनात….“ इतक्या सहजी तुम्ही माफ केलं तिला ? नवरा होता होता, बाप झालात तीचे ??? “

“ डॉक्टर क्षमा करायला काहीतरी कारण शोधावंच लागतं ना हो ? “ ते हसत म्हणाले… 

मी पुन्हा एकदा शहारलो… ! .. एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी मुद्दामहून कारण शोधलं जातं… आणि  ते माफ करण्यासाठी कारण शोधत होते… ! 

ते पुन्हा हसले…. !  त्यांचं हे एक हसणं,.. हजार रडण्याहून भीषण आणि भेसूर होतं…! 

आता माझे शब्द संपले होते… सर्व काही असूनही मी गरीब होतो, आणि .. आणि  हातात काहीही नसलेले… रस्त्यावर पडलेले ते बाबा खरे श्रीमंत ! 

मनोमन त्यांना नमस्कार करून मी जायला उठलो. 

मला त्यादिवशी पाणी मिळालंच नाही… पण बाबांच्या अश्रूत मी चिंब भिजून गेलो…. ! 

पाणी न पिताही माझी तहान शमली होती… गाडी जवळ आलो…. गाडी गपगुमान चालू झाली… अच्छा…  म्हणजे हा सुध्दा कुणीतरी खेळलेला डाव होता तर….! 

मी घरी आलो…. डोक्यात बाबांचेच विचार…

‘ प्रेम म्हणजे क्षमा… ! ‘ .. आज प्रेमाची नवी व्याख्या समजली…. 

‘ स्वतःसाठी काहीतरी मागणं म्हणजे प्रार्थना नव्हे… जे मिळालंय, त्याबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजे प्रार्थना !’ .. आज प्रार्थनेचीही नवी व्याख्या समजली… 

‘ जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश… परंतु जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान !!! ‘

सर्व काही हरवूनही, समाधानी राहून, वर तिलाच दुवा देणाऱ्या बाबांचा मला हेवा वाटला !!! 

जगावं तर सालं अस्स…. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही…. ! 

त्यांच्या “मनात” सुरू असलेलं युद्ध “पानावर” कधीही लिहिले जाणार नाही… 

इथं तेच दुर्योधन होते….तेच अर्जुन होते …आणि कृष्णही तेच होते…! 

…. आयुष्याच्या रणभूमीवर आजूबाजूला सर्वजण असूनही ते बाबा एकटेच होते. 

श्वास चालू असतात, तोपर्यंत एकट्यालाच चालावं लागतं…. श्वास थांबले की मगच लोक आपल्या आजूबाजूला रडत गोळा होतात… आणि आपल्या जाण्याचा हा “सोहळा” पाहायला आपणच शिल्लक नसतो…. ही खरी शोकांतिका  !!! 

आज २३ तारखेला शनिवारी सकाळी पाय आपोआप बाबांकडे वळले… 

…. त्याच ओल्या गाठोड्यात ते तसेच पडले होते… भीष्मासारखे मौन धारण  करून, थंडीनं कुडकुडत…  ! 

त्यांचे डोळे बंद होते… मी गाठोड उघडलं…. अंगावरचं भिजलेलं एक एक कापड काढून टाकलं… आता मला ते ‘ दिगंबर ‘ भासले ! .. उघड्या फुटपाथवर, नागड्या आकाशाखाली मी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला… अंगावरचा मळ हाताने साफ केला….आता अजून कुठली पूजा मांडू ?? .. जखमेतले किडे काढले… दाढी कटिंग केली… पँटमध्ये केलेली मल-मुत्र-विष्ठा साफ केली…. आणि मीच खऱ्या अर्थानं सुगंधित जाहलो…. ! 

मग त्यांना लंगोट बांधला… उघड्या बंब त्या बाबांनी, माझ्या डोक्यावर मायेनं हात ठेवला आणि खऱ्या अर्थाने माझ्या स्टेथोस्कोपचा आज सन्मान झाला…! 

उघडले डोळे जेव्हा त्यांनी, गाईच्या नजरेत मला वासरू दिसले…..  

.. आणि नुकत्याच हातात आलेल्या या वृद्ध बाळामध्ये मला माझेच पिल्लू दिसले…. रस्त्यावरच मग त्याला न्हाऊ घातले….! 

इतक्यात माझ्या कानावर ढोल ताशाचा अगडबंब आवाज आला… आमच्या बाळाच्या जन्माचा सोहळा कोण साजरा करतंय, हे बघायला मी मान वळवली…. पाच दिवसाच्या गणपतीची ती विसर्जन मिरवणूक होती ! 

इकडे बाबांचंही जुनं आयुष्य आम्ही विसर्जित करत होतो…!!!  यानंतर त्यांना स्वच्छ पुसून नवीन पांढरे शुभ्र कपडे घातले. कपडे घालता घालता ते म्हणाले, “ डॉक्टर, आज पुन्हा इकडे कसे आलात ?”

आता मी हसत म्हणालो, “ अहो बाबा, तुमचा जीव घ्यायचा होता ना ? जीव घ्यायलाच आलोय…!”

यावर अत्यंत समाधानाने ते हसले….! 

बाबांना ऑपरेशनसाठी एका हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ऍडमिट केलं आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना एखादा व्यवसाय टाकून देऊ किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू… ! 

अरे हो… आता तुम्हाला सांगायला हरकत नाही… पण, बाबांच्या इच्छेनुसार शेवटी मी त्यांचा “जीव” घेतलाच आहे… ! आणि आता हा “जीव” मी माझ्या जिवात जपून ठेवला आहे…!! 

कुठवर ??? …. माझ्या जिवात जीव आहे तोवर… !!! 

— समाप्त— 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments