श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “कंडक्टर…” भाग-२ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.) इथून पुढे — 

नेहमीप्रमाणे वाशीच्या बस स्थानकात वेलचीचं बाजकं घेऊन उभा होतो. आज पुण्यात लवकर पोचायचं म्हणून मिळेल त्या पहिल्या बसनं जायचं ठरवलं होतं. नेमकी कर्नाटकची बस आली,  बस कोथरूड वरून जाते याची खात्री करून घेतली आणि बसमध्ये बसलो. वेलचीचं बाजकं सिटखाली ठेवलं. कंडक्टर आला, तिकीट देताना त्याला वेलचीचा वास जाणवला असणार, त्यानं मला एकदा निरखून पाहिलं आणि मला म्हणाला काही वर्षापूर्वी तुम्ही एका बाईला तिकीट काढायला पैसे दिले होते का? माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हिच ती बस आणि हाच तो कंडक्टर. मी हो म्हणालो.

तो काही न बोलता पुढे निघून गेला. सर्व प्रवाशांची तिकीटं झाली आणि नंतर तो माझ्या बाजूला येऊन बसला. आणि म्हणाला, “अहो साहेब मी तुम्हाला किती शोधत होतो. तुम्ही बुधवारी इथूनच पुण्याला जातो असं  म्हणाला होता म्हणून कितीतरी वेळा बस वाशी स्टॅंडवर थांबवत होतो. खाली उतरून तुम्ही कुठे दिसताय का बघत होतो, आणि आज दोन वर्षांनी भेटलात.”

 नंतर त्यानं जे सांगितले ते ऐकून अक्षरशः थक्क झालो. 

त्यानं सांगितलेली ती घटना अशी होती….

त्यादिवशी ज्या बाईला मदत केली होती तिला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून दिलं आणि थोडेफार पैसे पण खर्चासाठी दिले. आणि त्याचं दिवशी दुपारी ती बाई आपल्या वडिलांना घेऊन स्टॅंडवर आली आणि या कंडक्टरला शोधून काढलं. हातात ४००/- रू. असलेलं पाकीट आणि शेतातील भुईमूगाच्या शेंगांची पिशवी त्याच्या हातात दिली आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या “अण्णाला ” म्हणजे मला द्या असं विनवू लागली. कंडक्टर म्हणाला, “ अहो, असा पॅसेंजर काय रोज रोज भेटत 

नसतोय “ . पण त्यांनी आग्रह करून दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या आणि “ माझा नवरा पण आज येणार आहे आणि आम्ही परत भांडणार नाही. एक दोन दिवसांनी मी पण परत मुंबईला जाणार आहे नव-याबरोबर, हे पण त्या अण्णाला सांगा “  असं बोलून आणि नमस्कार करून तिच्या गावाकडे परत गेली. 

आता त्या कंडक्टर पुढे धर्मसंकट उभं राहिलं. कसं शोधायचं मला ? मग वर सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी तो माझा शोध घेत राहिला. महिनाभरानंतर त्या शेंगा त्याने इतर प्रवाशांमधे वाटून टाकल्या. 

एवढं बोलून तो उठून उभा राहिला आणि त्याच्या सिटकडे गेला, वर ठेवलेली त्याची बॅग काढून उघडली आणि काहीतरी घेऊन पुन्हा माझ्याजवळ आला आणि एक मळकट खाकी पाकीट माझ्याकडे दिलं.

‘हे काय आहे ‘ असं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो तेव्हा तो जे म्हणाला ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला, ” साहेब, ही तुमची अमानत आहे, गेली दोन वर्षे मी सांभाळून ठेवली होती, आता तुमची तुम्ही घ्या आणि मला मोकळं करा.” ते ऐकून मला काय बोलायचं हेच सुचेना. मी ते पाकीट फोडून बघितलं तर काय….. आत मध्ये १०० च्या चार नोटा….. बरेच दिवस पाकीटात बंद असल्याने चिकटून गेल्या होत्या. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आवंढा गिळून एवढंच म्हणालो  की ‘ नाही नाही हे पैसे मी घेऊच शकत नाही.’ त्यावर कंडक्टर एवढंच म्हणाला की “ अहो त्या बाईला मी कबूल केलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन, आता तुम्हीच सांगा या पैशांचं करायचं काय ….”  नंतर लगेच तो म्हणाला की 

“एखाद्या संस्थेला मदत करू किंवा एखाद्या देवळात देवापुढे ठेवून देवू .’  मग मीच तोडगा काढला. त्याला सांगितलं की पुढे मागे एखाद्या पॅसेंजरला अशी अडचण आली तर तू हे पैसे वापरून टाक. बोलेबोलेपर्यंत माझा थांबा आला म्हणून मी उतरण्याआधी त्या कंडक्टरला घट्ट मिठी मारली. आणि आभाळभरल्या डोळ्यांनी खाली उतरलो. त्या सुहृद कंडक्टरचं नाव चिदानंद हेगडे.  गुलबर्गा डेपो . त्यांचा फोटो त्यांनी काढू दिला नाही किंवा मोबाइल नंबर पण दिला नाही.

या गोष्टीला आता ८/९ वर्षं झाली. पण अजून माझा गोंधळ होतो की , सचोटी आणि प्रामाणिकपणा जर उणे अधिक करायचा असेल तर तो कुणाचा करायचा….. कबूल केल्याप्रमाणे तिकीटाचे पैसे न विसरता परत करणा-या त्या माऊलीचा, की ते पैसे मिळाल्यावर अफरातफर न करता २ वर्षं व्यवस्थित सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन करणा-या चिदानंद हेगडे यांचा…

तुम्हीच सांगा…

– समाप्त – 

लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे. 

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments