डॉ गोपालकृष्ण गावडे
☆ माझ्या प्रिय लेकरा — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
माझ्या प्रिय लेकरा,
(मुलांच्या मनाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था असतील तर पालकांनी तिन्ही अवस्थेत एकच प्रतिक्रिया देऊन कसे चालेल?) – इथून पुढे..
बाहेरच्या निष्ठुर जगात आई-बापाप्रमाणे मुलांला समजून घेणारे वा समजावून सांगणारे फारसे कुणी नसते. मुलांच्या चुकांना बाह्य जगात केवळ शिक्षा मिळतात. अशा शिक्षेनंतर मायेने फुंकर घालायलाही कुणी नसते. या शिक्षांमध्ये मायेचा ओलावा नसल्याने मुलांच्या मनात त्या प्रसंगांविषयी कायमस्वरूपीची कटुता निर्माण होते. पण हेच वय सर्वात जास्त संस्कारक्षम असल्याने याच वयात चांगल्या वाईटाचे धडे दिले गेलेच पाहिजेत. समाजाकडून मुलांना रुक्षपणे जगण्याचे धडे शिकायला मिळण्याऐवजी आई-बापाने कठोरपणावर मायेचा मुलामा देऊन ते मुलांना शिकवावेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होत नाही. कधी चांगल्या कामाचे बक्षिस देवून, कधी समजावून सांगून आणि वेळप्रसंगी शामच्या आईसारखी मायेच्या ओलाव्याने शिक्षा करावी लागते.
श्याम म्हणजे साने गुरुजी. त्यांना लहानपणी पाण्याची फार भीती वाटे. पोहणे शिकणे का गरजेचे आहे हे आईने श्यामला समजावून सांगितले. पोहायला जायचे ठरल्यावर ऐनवेळी श्याम लपून बसला. समजावून सांगूनही शाम पोहायला जात नाही म्हटल्यावर श्यामच्या आईने त्याला फोकाने बडवून काढले. श्यामला मारताना श्यामसोबत आईच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होते. पुढे कधी चुकून लेकरू पाण्यात पडलं तर जीवाला मुकेल या धास्तीने तिने ते सर्व केले होते. तसेच पाण्याच्या भीतीने पोहायाला न शिकलेल्या आपल्या मुलाला समाजात कुणी भित्रा समजू नये म्हणून आईने अडून बसलेल्या श्यामला शिक्षा करून पोहायला धाडले. माराच्या भीतीने श्याम शेवटी पोहायला गेला. पोहून घरी आल्यावर पाठीवरील वळ दाखवत श्याम आईवर रुसून बसला. मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. जेवत असलेली आई भरल्या ताटावरून उठली आणि हात धुवून त्याच्या पाठीवरील वळांना तेल लावू लागली. रडवेल्या स्वरात तिने श्यामला पोहण्याचे महत्व परत समजावून सांगितले. आपल्याला मारून स्वतः रडणा-या आईला पाहून श्यामलाही गहिवरून आले. आईचे आपल्याला मारणे हे आपल्या हिताचेच होते याची ठाम जाणीव श्यामला झाली. या प्रसंगामुळे श्यामच्या मनात कुणाविषयीही कटूता निर्माण झाली नाही. उलट या घटनेतून आईचे श्यामवर असलेले प्रेमच अधोरेखीत झाले. आई आणि श्यामचे नाते अजून घट्ट झाले. श्यामला शिक्षा झाली. पण श्यामच्या मनावर कटूपणाचा ओरखडाही ओढला गेला नाही. श्यामला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळाला. या घटनेला साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक घटना म्हणून लक्षात ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या आईच्या मायेमुळे शक्य झाले होते. आईच्या जागी बाहेरचे कोणी असते तर आपुलकीच्या आभावामुळे आणि भावनिक कोरडेपणामुळे हा प्रसंग साने गुरुजींच्या स्मृतीत दुःखदायक प्रसंग म्हणून नोंदला गेला असता.
पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय पालकांनी मुलांना शिक्षा करू नये. केवळ मुले कमजोर आहेत म्हणून त्यांना पालकांनी आपल्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढायची पंचींग बॕग करू नये. मुलांना शिक्षा केल्यावर पालकांना मुलांपेक्षा जास्त दुःख होत नसेल तर पालक त्या शिक्षेतून असुरी आनंद मिळवत आहेत असा अर्थ होतो. अशा पालकांना मानसिक समुपदेशनाची किंवा कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे असे समजावे.
मुले पटकन मोठी होतात. मग ते ‘Teen’ या असुरक्षित वयात पोहचतात. आजवर अभ्यास, खेळ, कला इत्यादी क्षेत्रात त्यांनी काही ना काही यश मिळवलेले असते. आजवर केलेल्या कर्तुत्वाची एक ओळख मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. मुलांच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा आकार घेत असते. मुलांच्या मनातील स्वतःच्या प्रतिमेच्या आकाराला अहं-आकार वा अहंकार असे म्हटले जाते. बारा-तेरा वर्षांपर्यंत मनात वेगवेगळे अहंकार तयार झालेले असतात. यशाच्या श्रेयावर पोसलेला अहंकार तसा मुलांसाठी आनंदाची जागा असतो. पण या अहंकाराचा एक प्रॉब्लेम असतो. अहंकारावर थोडीशी टीका झाली तरी अहंकार दुखावला जातो. एखाद्या चुकीसाठी बोल लागला वा शिक्षा झाली तर त्या संदर्भातील अहंकार लगेच दुखावला जातो. अहंकार दुखावला की मनात राग उत्पन्न होतो. या त्रासदायक समस्येचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केले तर स्वतःचा गाढवपणा स्वीकारावा लागतो. मग आत्मटीकेचे वाढीव दुःख पदरी पडते. आधीच अहंकार दुखावल्याने दुःखी झालेले मन हे नवीन दुःख स्वीकारायला तयार होत नाही. त्याऐवजी असे दुखावलेले मन अप्रामाणिकपणा स्विकारते आणि स्वतःच्या चुकांचे खापर जगावर फोडून मोकळे होते. त्याने मनाला तात्पुरता आराम मिळाला तरी अप्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे समस्येची खरी कारणे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे अशी समस्या कधीच सुटत नाही. अहंकारी मन एकाच चौकात, त्याच दगडाला वारंवार ठेचा खात राहते आणि त्याबाबत जगाला दोष देत राहते. या समस्येला मानसशास्त्रात “टिन एज आयडेंटिटी इशू” असे म्हणतात. या वयातील मुलांचा स्वभाव रगेल आणि विद्रोही झालेला असतो.
अशा वयात असलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या वागण्यावर टीका करून त्यांचा अहंकार दुखावला तर मुलांच्या वागण्यावर त्याचा विपरीत आणि बहुतेक वेळा विरुद्ध परिणाम होतो. मुलांना क्रिटीसाईज केले वा कधी शिक्षा केल्यास मुले पालकांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याऐवजी हट्टाला पेटून पालकांच्या सांगण्याविरुद्ध वागतात. या वयातील मुलांच्या वागण्याला खरंच वळण द्यावयाचे असल्यास आई-बापाने आपला “पालक” हा अहंकार टाकून मुलांचे “मित्र” व्हावे. आपल्याकडे आजवरच्या अनुभवांनी जमा झालेले ज्ञान फक्त मुलांसमोर मांडून, त्यांना त्यांच्या समस्येचे आकलन करून घ्यायला मदत करावी. शेवटी केवळ मित्रत्वाचा सल्ला द्यावा. तसेही १२-१३ वर्षापुढील मुले त्यांच्या बुद्धीला पटेल तेच करतात. काही पालक मुलांचा अहंकार दुखवून त्यांना वाईट मार्गावर अजून दृढपणे चालण्यास भाग पाडतात. यात कुठलेही शहाणपण नाही.
मुली, तू आता सहाव्या वर्षात पाय ठेवला आहेस. परवा तू सतत हट्ट करत होतीस. तीन-चार वेळा मी तुला समजावून सांगितले. पण तू काही केल्या ऐकेनास. मग नाईलाजास्तव तुला शिक्षा करावी लागली. तुला शिक्षा करत असतांना आणि नंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे केवळ मलाच ठावूक आहे. कोण कुणाला शिक्षा करत होते देव जाणे ! त्या दिवशी तू जितकी रडलीस ना त्याच्यापेक्षा जास्त माझे मन रडले. पण बापाला उघडपणे आसवे गाळायचीही मुभा नसते. परत अशी वागू नकोस गं. तुझा बाबू बापाच्या कर्तव्याने बांधला गेला आहे. कर्तव्य आणि त्याच्यासोबत येणारा मानसिक त्रास मला चुकवता येणार नाही. डंब सेल्फिशसारखी कधीच वागू नकोस ग पोरी. तसाही चाळीशी ओलांडलेला पुरूष रडताना बरा दिसत नाही.
तेव्हा कुठल्याही चुका न करता लवकर मोठी हो पोरी !
तुम्हाला शिक्षा केल्यावर आमच्याच काळजाला डागण्या लागतात गं ! लेकाच्या वेळी ते मी कसंतरी सहन केलं. पण तुझ्याबाबतीत ते सहन होईल असं वाटत नाही.
लवकर शहाणी आणि मोठी हो पोरी !
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..
. . . . तुझा गोपाल बाबू
– समाप्त –
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈